'पहाटेच्या शपथविधी' आधी काय घडलं? अजित पवारांनी 'सगळंचं' सांगितलं...

आज (गुरुवार) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इंदापूर येथे सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत शरद पवारांसोबतचा त्यांचा राजकीय इतिहासच उलगडून दाखवला. अजित पवार इंदापूर येथे एका मेळाव्यात बोलत होते. यावेळी २०१९ च्या पहाटेच्या शपथ विधी आधी काय घडलं हे अजित दादांनी विस्ताराने सांगितलं.

संग्रहित छायाचित्र

आज (गुरुवार) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इंदापूर येथे सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत शरद पवारांसोबतचा त्यांचा राजकीय इतिहासच उलगडून दाखवला. अजित पवार इंदापूर येथे एका मेळाव्यात बोलत होते. यावेळी २०१९ च्या पहाटेच्या शपथ विधी आधी काय घडलं हे अजित दादांनी विस्ताराने सांगितलं. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले ही गावकी भावकीची निवडणूक नाही. तर देशाचा पंतप्रधान कोण असेल हे आपल्याला ठरवायचं आहे. तुम्हाला नरेंद्र मोदी पंतप्रधान हवेत की राहुल गांधी हा निर्णय घेण्यासाठी ही निवडणूक असल्याचे अजित पवार यांनी यावेळी सांगितले. 

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, २०१४ ला राष्ट्रवादी आणि पृथ्वीराज चव्हाण यांचं काही जमेना.  त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना वेगवेगळे लढले. प्रत्येकाला आपापला आवाका किती आहे ते लक्षात आलं. त्यानंतर २०१४ ला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. मी मुंबईला पोहोचण्याच्या आत टीव्हीवर बातमी झळकली की प्रफुल्ल पटेल यांनी सिल्वर ओकच्या बाहेर भाजपाला बाहेरून पाठिंबा देणार असल्याचं सांगितलं. तिथे गेल्यावर मी विचारलं हे कसं काय झालं. तेव्हा हे म्हणाले आपली स्ट्रॅटेजी आहे. यांनी केली की स्ट्रॅटेजी मी केलं की गद्दारी. मी केलं की वाटोळं? त्याच्यामध्ये स्ट्रॅटेजी आहे म्हटल्यावर मी गप्प बसलो. कारण मी रिस्पेक्ट देत होतो.  त्यानंतर सगळ्यांना वानखेडे स्टेडियमवर शपथविधीला जायला सांगितलं. त्यासंदर्भात आम्हाला सांगितलं गेलं की पुढील काही महिन्यांत आपल्याला त्या सरकारमध्ये जायचं आहे. आणि त्यामुळे फडणवीसांनीही विस्तार केला नाही. त्यानंतर आमची अलिबागला एक मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये सांगण्यात आलं की भाजपने आमचा पाठिंबा गृहीत धरू नये. आमचा पाठिंबा आता संपलेला आहे. लगेच संध्याकाळी मातोश्रीला मिटींग होऊन शिवसेना सरकार मध्ये गेली. 

अजित पवार पुढे म्हणाले, २०१७ ला भाजपासोबत पालकमंत्री आणि मंत्रीपदं यासंबंधी  चर्चा झाली. दिल्लीत गेल्यावर अमित शहा म्हणाले मी माझा मित्र पक्ष शिवसेनेला सोडणार नाही. तुम्ही (राष्ट्रवादी)  सरकारमध्ये या आपण तिघांचं सरकार करू. यावर साहेब म्हणाले शिवसेना मला अजिबात चालत नाही. शिवसेना जातीवादी पक्ष आहे. त्यामुळे पुन्हा तिथे बारगळलं. 

२०१९ च्या राजकीय घडामोडींबद्दल बोलताना अजित पवार म्हणाले,  २०१९ ला दिल्लीमध्ये एका मोठ्या उद्योगपतीच्या घरी पाच-सहा मीटिंग झाल्या. तिथे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, मी उपमुख्यमंत्री, तसेच मंत्रीमंडळासंबंधी सर्व गोष्टी ठरल्या. नंतर अमित शहा यांनी मला बाजूला घेऊन सांगितलं, तुमच्याबद्दल याआधीचे अनुभव फार काही चांगले नाहीत. दोन-तीनदा चर्चा होते आणि नंतर वेगळंच घडतं. त्यामुळे तुला जसं ठरलं आहे तसं वागावं लागेल. मी म्हटलं वागेन ना. मला काय माहिती पुढे काय होणार आहे. म्हटलं साहेब माझा शब्द आहे. मी शब्दाचा पक्का आहे. त्याच्यामध्ये काही फरक होणार नाही. त्यानंतर मुंबईला आल्यानंतर  पवार साहेब म्हणाले त्यांना सोडायचं आहे आपल्याला. शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार बनवायचं आहे. मी म्हटलं अहो आपण इतके दिवस तिथे घालवले. त्यावर शरद पवार म्हणाले आपली स्ट्रॅटेजी आहे. यावर मी काय बोलणार. नेहरूसेंटरला चर्चा झाली. त्यानंतर एके दिवशी रात्री आठ वाजता मल्लिकार्जुन खर्गे आणि साहेबांचा खटका उडाला. खरगे काहीतरी बोलले आणि साहेब खूप चिडले. तिथून बाहेर पडून मला आणि प्रफुल पटेल यांना सांगितलं तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहे. आम्हाला सांगितलं की तुम्हाला जे करायचे आहे ते करा. काँग्रेस आपल्या सोबत राहत नाही असं मला दिसतंय.  यावर मी म्हटलं चला आता वर्षावर जावू . प्रफुल पटेलांना म्हटलं आता ठरल्याप्रमाणे जाऊन करतो. तेवढ्यात जयंत पाटील बाहेर आले आणि म्हटले दादा वर्षावर जाऊन चर्चा करा. पण दाराला फट ठेवा. दार एकदम पॅक करू नका. वर्षावर गेल्यानंतर दिल्लीला फोन झाले. त्यानंतर सकाळी आठ वाजता शपथविधी झाला. 

अजित पवार पुढे म्हणाले, हे झाल्यानंतर पुन्हा सूत्रे फिरली. सर्व आमदारांना एकत्र केलं गेलं. हे आमदार मला फोन करायचे. दादा गुप्त मतदान आहे तुम्ही म्हणाल तो विधानसभेचा अध्यक्ष होईल. तुम्ही काही काळजी करू नका. त्यानंतर काँग्रेसने सुप्रीम कोर्टात जाऊन गुप्त मतदानाला विरोध करून उघड मतदानाचा निर्णय घेतला. त्यामुळे आम्हाला ते सरकार सोडावं लागलं. त्यानंतरही आमदारांचा रेटा होता. दादांशिवाय पक्ष आणि मतदार सांभाळले जाणार नाही. पुन्हा मला उपमुख्यमंत्री केलं.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest