‘संसदरत्न पुरस्काराने बारामतीचा विकास होणार नाही’ अजित पवारांची सुप्रिया सुळे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका

मोदी-शाहांवर टीका करून, संसदरत्न पुरस्कार मिळवून बारामतीचा विकास होणार नाही. महिला उमेदवार लोकसभेत गेल्यानंतर त्यांचा नवरा काय पर्स घेऊन मागे-मागे जाणार? आता अजित पवार काय हातात पर्स घेईल का?

Baramati Loksabha Constituency

संग्रहित छायाचित्र

मोदी-शाहांवर टीका करून, संसदरत्न पुरस्कार मिळवून बारामतीचा विकास होणार नाही. महिला उमेदवार लोकसभेत गेल्यानंतर त्यांचा नवरा काय पर्स घेऊन मागे-मागे जाणार? आता अजित पवार काय हातात पर्स घेईल का?  सदानंद सुळे काय पर्स घेऊन जातात का तिथे? असे सांगत उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांनी सुप्रिया सुळे यांचे नाव न घेता निशाणा साधला.

अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या बारामती मतदारसंघातील प्रचाराच्या सांगता सभेत अजित पवार (Ajit Pawar) बोलत होते. महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या प्रचार सभेत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुप्रिया सुळे, रोहित पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला. अजित पवार म्हणाले की,  अरे मला तर अशी उत्तरे देता येतील की, तुम्हाला पळता भई थोडी होईल. तुम्ही मुंबईच गाठाल. दुसरीकडे कुठं थांबणार नाहीत. आपण म्हणतो जाऊ दे, आपलीच बहीण, भावंडं आहेत. आपलीच लोकं आहेत. हे असं चालणार नाही. इथे जर मी खुर्च्या टाकल्या असत्या तर या सभेचे रूप चौपट ते पाचपट झालं असतं. काहींना अशी गर्दी होणार नाही, बारामतीकर प्रतिसाद देणार नाहीत, हे समजल्यामुळे त्यांनी खुर्च्या टाकल्या होत्या.

नौटंकी चालणार  नाही... 

सुळे यांच्या प्रचार सभेत रोहित पवारांना (Rohit Pawar) शरद पवार यांच्या एका वाक्याची आठवण झाली, त्यामुळे त्यांना अश्रू अनावर झाले. त्याचा दाखला देत अजित पवार मोबाईल दाखवत म्हणाले की, 'हे पाहा आमच्या एका पठ्ठ्याने डोळ्यातून पाणी काढून दाखवलं. मग मी पण दाखवतो, मला मतदान द्या. असली नौटंकी बारामतीकर खपवून घेणार नाहीत. तुम्ही काम दाखवा, तुमचं खणखणीत नाणं दाखवा. हा झाला रडीचा डाव. हे असलं नाही चालतं.

साहेबांचे मी ऐकले नाही

 'मी माझ्या कार्यकर्त्यांना सांगत होतो. अरे त्यांना जिल्हा परिषदेची तिकिटे मी दिली. गळ्याची शपथ, मी खोटं बोलत नाही. साहेबांनी सांगितलं, अजिबात देऊ नको, मी त्यांचं ऐकलं नाही, त्याला तिकीट दिलं. त्यानंतर तो म्हणाला हडपसरला उभं राहायचं, म्हटलं तिथे तुला देणार नाही, चेतन तुपेची आम्ही तयारी करत आहोत. तू कर्जत-जामखेडला जा. तिथे आम्ही प्रयत्न करू, सगळे मदत करू, असे रोहित पवारांविषयी अजित पवार यांनी सांगितले. तसेच 'आम्ही तुम्हाला राजकारणाचे बाळकडू पाजलेलं आहे आणि तुम्ही आमच्यावर टीका करताय? अरे तुझ्यापेक्षा कितीतरी जास्त उन्हाळे-पावसाळे मी बघितले आहेत. बारामतीमधील मूलभूत प्रश्न सोडवायचे असतील तर भावनिक होऊन चालणार नाही.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest