संग्रहित छायाचित्र
पुणे लोकसभा मतदारसघाच्या अंतर्गत येणाऱ्या वडगावशेरी विधानसभा मतदारसंघात ४ लाख ५७ हजार ७५० मतदार आहेत. यापैकी दोन लाख ३७ हजार ९१७ पुरूष, दोन लाख १९ हजार ७३१ महिला मतदार आहेत. तर १०२ तृतीयपंथी मतदार आहेत.
मतदारसंघात ४५३ मतदान केंद्रे असून सर्व मतदान केंद्रे तळमजल्यावर आहेत. एकूण ६४३ ईव्हीएम व ६६८ व्हीव्हीपॅट मशीन आहेत. वडगावशेरी मतदार संघात एकही संवेदनशील मतदान केंद्र नसल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन बारावकर यांनी ‘सीविक मिरर’ दिली.
वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ हा पुणे लोकसभा मतदार संघातील सर्वात जास्त मतदारसंख्या असलेला मतदारसंघ आहे. या मतदार संघात ४ लाख ५७ हजार ७५० मतदार आहेत. या विधानसभा मतदारसंघातील पहिले मतदान केंद्र निरगुडी येथे आहे. वडगावशेरीतील ६९ ठिकाणी ४५३ मतदान केंद्रे आहेत. यामध्ये शास्त्रीनगर येथील गेनबा मोझे प्रशालेत महिला संचलित मतदान केंद्र आहे. तर खराडीतील ज्ञानांकुर शाळेत युवा मतदान केंद्र आहे. येरवडा नवी खडकी येथील आचार्य अत्रे शाळेत मुस्लिम महिलांसाठी पडदा नशीन मतदान केंद्र आहे. तर खराडी मुंढवा रस्त्यावरील क्रिस्टल सोसायटीत दोन तर येरवड्यातील कस्तुरबा हौसिंग सोसायटीत पाच मतदान केंद्रे आहेत.
वडगाव शेरी मतदारसंघातील छायाचित्र नसलेले व दुबार नावे असलेली तब्बल ७२ हजार मतदारांची नावे रद्द करण्यात आली. १५ एप्रिलपर्यंत मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करणे, मतदार यादीतून नाव कमी करणे, नावात, पत्त्यात, वयात दुरूस्ती करणे, मतदार ओळखपत्र मिळण्यासाठी अर्ज करणे, मतदारसंघ बदलणे अथवा स्थलांतर करण्याची मुभा होती. आता लवकरच प्रारूप मतदार यादी प्रसिध्द करण्यात येणार असल्याची माहिती बारावकर यांनी दिली. बारावकर म्हणाले, ‘‘वडगावशेरीतील दुबार मतदार असलेल्यांची नावे वगळण्यात आली आहेत. यासह मतदार ओळखपत्रात अनेकांची छायाचित्रे नव्हती. घरोघरी जाऊन त्याची शहानिशा करून मतदार ओळखपत्रात छायाचित्र घेतली गेली आहेत. वडगाव शेरी मतदारसंघात २०२२ मध्ये तब्बल ६८ हजार मतदारांची छायाचित्रे नव्हती. २,२५२ मतदारांची नावे दुबार होती. ’’
अनेक नागरिक कुटुंबातील सदस्यांची नावे मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी पुढे येतात. ही सकारात्मक बाब आहे. मात्र कुटुंबातील सदस्याचा मृत्यू झाल्यास, स्थलांतर अथवा मुलींचे विवाह झाल्यास ही नावे वगळण्यात सात क्रमाकांचा अर्ज भरत नाही. त्यामुळे मतदारयादी वाढत जाते. याचा परिणाम म्हणून प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी मतदानाची टक्केवारी कमी झाल्याचे दिसते. त्यामुळे यावेळी घरोघरी जाऊन मतदार यादीतील नावांची शहानिशा करून यादी अद्ययावत केली गेली असल्याचे बारावकर यांनी सांगितले.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महिला, दिव्यांग, युवक संचलित मतदान केंद्र आहेत. यासह मुस्लीम महिलांसाठी पहिल्यांदाच पडदा नशीन मतदान केंद्र असल्यामुळे त्यांना आत्मविश्वासाने मतदान करता येणार आहे. तसेच यंदा वडगावशेरीतील सात मतदान केंद्र हे सोसायट्यांमध्ये आहेत. त्यामुळे मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता आहे.
- तृप्ती कोलते, अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी