संग्रहित छायाचित्र
२३ नोव्हेंबर २०१९ रोजी भल्या पहाटे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. योगायोग असा की, आज याच दिवशी २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार असल्याने ‘२३’ तारखेची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
२३ नोव्हेंबर २०१९ ला देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी एकत्र येत सरकार स्थापन केले होते. हे सरकार फक्त ८० तास टिकले. महाराष्ट्राच्या इतिहासात 'पहाटेचा शपथविधी' अशी या घटनेची नोंद झाली.
२०१९ सालच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात सत्ता कोण स्थापन करणार, असा पेच निर्माण झाला होता. बरेच दिवस चर्चेचं गुर्हाळ चालल्यानंतर अनपेक्षित राजकीय घडामोडी घडल्या. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी २३ नोव्हेंबर २०१९ रोजी भल्या पहाटे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदांची शपथ घेतली होती. महाराष्ट्राच्या राजकारणात पहाटेचा शपथविधी हा सर्वाधिक नाट्यमय घडामोडींपैकी एक मानला जातो.
पण शरद पवार यांनी अजित पवारांच्या बंडाला आपला पाठिंबा नसल्याचे जाहीर केले. त्यानंतर अवघ्या ८० तासातच फडणवीस यांना राजीनामा द्यावा लागला. पुढे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्र येत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. त्यानंतरच्या काळात एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि महायुतीचे सरकार सत्तेत आले. तसेच २ जुलै २०२३ ला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून अजित पवार राज्याच्या सत्तेत सहभागी झाले
आता पुन्हा एकदा २३ नोव्हेंबर तारीख महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाची ठरलीय. यंदा २० नोव्हेंबर या दिवशी विधानसभा निवडणुकींतर्गत मतमोजणी होणार आहे.