संग्रहित छायाचित्र
आमदार सुरेश धस यांनी मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीसंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळं राज्यात नव्या वादाला तोंड फुटले आहे. धस आपल्या मतावर ठाम असून अभिनेत्री यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे समजते. अशातच, मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी सुरेश धस यांना खडेबोल सुनावले आहेत.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांना वेठीस धरले आहे. तसेच, या प्रकरणांवर बोलताना धस यांनी मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीचे नाव घेतले आहे. धस यांच्या वक्तव्यानंतर प्राजक्ता माळीने पत्रकार परिषद घेत सुरेश धस यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली. तिच्या या प्रतिक्रियेनंतर भाजप नेत्यांनी अभिनेत्रीला पाठिंबा देत धस यांच्यावर ताशेरे ओढले आहेत.
प्राजक्ता माळी अन् सुरेश धस यांच्यातील वाद पेटणार; अभिनेत्री घेणार मुख्यमंत्र्यांची भेट
राजकीय वादात अभिनेत्रीचं नाव जोडणं सुरेश धसांना शोभत नाहीत असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी धस यांना घरचा आहेर दिला आहे.
नेमकं काय म्हणाले चंद्रकांत पाटील?
आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रीचे चारित्र्य आणि त्यांच्यावर शिंतोडे उडू नये याची नेहमी काळजी घेतली. राजकीय वाद सुरू आहे. यामध्ये सामाजिक आणि संवेदनशीलपणा देखील आहे. या प्रकरणात अभिनेत्रीचं नाव जोडणं सुरेश धस यांना शोभत नाही. सुरेश धस यांना आज मी फोन करणार आहे. सुरेश धस यांनी कोणत्याही महिलेची नाचक्की आणि बदनामी होईल असं बोलता कामा नये. प्राजक्ता माळी यांनी देखील काल प्रेस घेऊन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मी सुरेश धस यांना स्वतः विनंती करणार आहे. पार्टीचा आमदार असून देखील तुम्ही असं काम करत आहे. तुम्ही असं करू नये, असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी सुरेश धस यांना खडेबोल सुनावले आहेत.
तसेच, संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणावर बोलताना, मुख्यमंत्री फडणवीस कोणालाही सोडणार नाहीत. असं चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले.