मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य सुरु झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी त्यांची नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे. त्यांच्या नाराजीवर मार्ग काढण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 8 -10 दिवसांचा वेळ मागितला आहे. दरम्यान, नाराज असलेले भुजबळ कुटुंबासह परदेश दौऱ्यावर निघाली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळं त्यांच्या नाराजीला आता वेगळं वळण लागलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भुजबळ नविन वर्षाच स्वागत कुटुंबासह परदेशात करणार आहेत. त्यांच्या या दौऱ्यामुळं राजकीय वर्तुळात वेगळीच कुजबुज पाहायला मिळत आहे. एकिकडे फडणवीसांनी मार्ग काढण्यासाठी काही कालावधी मागितला आहे तर दुसरीकडे भुजबळ परदेश दौऱ्यावर निघाले आहेत. त्यामुळं नविन वर्षात भुजबळ नेमकी कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष वेधलं आहे.
भुजबळ आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या 40 मिनिटांच्या भेटीत नेमकं काय घडलं?
नाराज भुजबळांच नक्की मत आहे तरी काय?
नागपूरमध्ये झालेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर भुजबळ यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं रहना, असे सूचक वक्तव्य त्यांनी काहीदिवसांपूर्वी केलं होतं. यानंतर मुंबईमध्ये नुकतच म्हणजे रविवारी (22 डिसेंबर) ओबीसी बहुजन आघाडीची बैठक झाली. या बैठकीत छगन भुजबळ यांना पाठिंबा देण्याचा निर्धार ओबीसी नेत्यांनी केला. या बैठकीनंतर भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधताना अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला होता.
मी लोकसभेची तयारी केली होती. पण त्यावेळी मला थांबवण्यात आले. त्यानंतर राज्यसभेच्या दोन जागांवर संधी होती. पण त्यावेळीही मला तुमची राज्यात गरज आहे असं सांगत थांबवण्यात आले. मग आता गरज संपली का? मंत्रिमंडळात तरुणांना संधी देण्यासाठी आपल्याला थांबवण्यात आल्याचं म्हटलं जातंय. पण तरुणपणाचे वय काय आहे? तरुणांना संधी द्या पण काही जागा सिनिअर लोकांसाठी ठेवायला हव्यात ना. आधीच सांगायचं ना विधानसभेला उभे राहू नका. राज्यसभेवर जा म्हणणे म्हणजे विधानसभेचा राजीनामा द्यावा लागेल. मग उभे केलंच कशाला? असा संतप्त सवाल भुजबळ यांनी अजित पवारांना केला.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.