संग्रहित छायाचित्र
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वाढदिवसानंतर दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येण्याची चर्चा सुरु आहे. अशातच अजित पवार गटाचे आमदार चेतन तुपे यांनी शरद पवार यांच्या भेटीनंतर केलेल्या वक्तव्यामुळं राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे. पुन्हा काका पुतणे एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
आज राष्ट्रवादीचे हडपसर विधासभा मतदारसंघाचे आमदार चेतन तुपे हे शरद पवार यांच्या पुण्यातील मोदीबाग या निवासस्थानी त्यांना भेटण्यासाठी गेले होते. या भेटीमागचा नेमका उद्देश काय होता हे समजू शकले नाही. मात्र, शरद पवारांच्या भेटीनंतर तुपे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सगळ्या महाराष्ट्राची जी इच्छा आहे ते दोन्ही पवार करतील, असं मोठं विधान केलं. त्यांच्या या विधानंतर राजकीय गोटात चांगलीच खळबळ माजली आहे.
चेतन तुपे नेमकं काय म्हणाले?
शरद पवार हे सर्वांचे साहेब आहेत. साहेब आमच्या घरातील व्यक्ती असल्यासारखं आहेत. त्यामुळं प्रत्येक भेट ही राजकीय असेलच असे नाही. साहेबांच्या मार्गदर्शनाखाली माझे वडील विठ्ठल तुपे असतील किंवा अजित दादांच्या नेतृत्वाखाली मी असेच शिकलो आहे की राजकारण हा केवळ एक महिन्यापुरता विषय असतो. एवढा एक महिन्यापूर्वी राजकारण करायचं असतं आणि त्यानंतर विकासाच्या दृष्टीने पाऊल टाकायचे असतात. त्यामुळे साहेबांची माझ्या वडिलांची आणि दादांची जी शिकवण आहे त्यानुसार प्रत्येक गोष्टीत आम्ही राजकारण पाहत नाही.
दोन राष्ट्रवादी एकत्र यावेत हा निर्णय मोठ्या पातळीवरचा आहे. मी एक छोटा कार्यकर्ता आहे. दोन्ही पवार नेहमी सांगतात, एकमेकांना भेटतात वाढदिवसाच्या एकमेकांना शुभेच्छा देतात त्यामुळे सगळ्या महाराष्ट्राची इच्छा आहे ती ते करतील. असं देखील तुपे म्हणाले आहेत.