संग्रहित छायाचित्र
शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्राजक्ता माळी यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ही पत्रकार परिषद 'पॉलिटिकली मोटिव्हेटेड' असल्याची टिका केली आहे. त्या एका खाजगी वृत्तवाहिनीशी बोलत होत्या
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने नवीनच वळण घेतले आहे. या प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सुरू असताना एका नवीन वादाला तोंड फुटले आहे. भाजप आमदार सुरेश धस मंत्री धनंजय मुंडेंवर टीका करताना अभिनेत्री प्राजक्ता माळी, रश्मिका मंदाना आणि सपना चौधरी यांचा उल्लेख केला. धस यांनी या अभिनेत्रींचे नाव थेट मंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत जोडले. त्यानंतर वादाला तोंड फुटले. अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी पत्रकार परिषद घेत सुरेश धस यांच्या वक्तव्याचा निषेध केला. तसेच धस यांनी माफी मागावी अशी मागणी केली. त्यानंतर अनेक मराठी कलाकारांनी प्राजक्ता माळी यांना पाठिंबा दिला. अशातच अंधारे यांनी प्राजक्ता माळी यांची पत्रकार परिषद 'पॉलिटिकली मोटिव्हेटेड' असल्याची टिका केली आहे.
सुषमा अंधारे म्हणाल्या, सत्याला स्पष्टीकरणाची गरज नसते. प्राजक्ता माळी यांची पत्रकार परिषद अप्रस्तुत होती. मित्र तुमच्याकडून स्पष्टीकरण मागत नाहीत तर शत्रू तुमच्यावर विश्वास ठेवत नाहीत. असं असूनही तुम्हाला स्पष्टीकरण का द्यावं वाटलं? असा सवाल अंधारे यांनी केला.
अंधारे पुढे म्हणाल्या, करुणा मुंडे यांनी प्राजक्ता माळी यांच्या विषयी खरे आक्षेपार्ह विधान केले होते. मात्र त्यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली नाही. त्यावेळी जसे दुर्लक्ष केले तसेच आताही त्या दुर्लक्ष करू शकल्या असत्या. प्राजक्ता माळी यांनी पत्रकार परिषद घेणे हे पॉलिटिकली मोटिव्हेटेड वाटतं. इथल्या जातपितृसत्ताक व्यवस्थेत बाईचं कर्तृत्व शून्य केलं जातं. पण हे प्राजक्ता माळीसारख्या अभिनेत्रीच्यावेळीच सुचतं का? जेव्हा सुषमा अंधारेंविरोधात बोललं गेलं तेव्हा का सुचलं नाही? जेव्हा प्राजक्ता माळी आरएसएसच्या मुख्यालयात जातात तेव्हा त्या कलाकार राहत नाही. त्यांचा एक पॉलिटिकल स्टँड तयार होतो.
कालच्या मोर्चाला काऊंटर करण्यासाठी प्राजक्ता माळी यांची पत्रकार परिषद झाली. संतोष देशमुख हत्या प्रकरण बाजूला करण्यासाठी जाणीवपूर्वक प्राजक्ता माळी प्रकरण पुढे आणल्याचा गंभीर आरोप सुषमा अंधारे यांनी केला.