राहुल गांधी यांच्या 'त्या' आरोपांना अशोक चव्हाण यांचे खरमरीत प्रत्युत्तर; म्हणाले, त्यांचा दौरा राजकीय
राहुल गांधी यांचा दौरा पूर्णत: राजकीय होता. एखादा व्यक्ति तो केवळ दलित होता म्हणून त्याला मारले असा निष्कर्ष चौकशीच्या आधी काढणे हे चुकीचे असल्याचे खासदार अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. ते नांदेड येथे माध्यमांशी बोलत होते.
सोमवारी लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी परभणी येथील आंदोलनातील आंदोलक सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली होती. सोमनाथ सुर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला होता. राहुल गांधी यांनी ही शंभर टक्के कस्टोडियल डेथ असल्याचे म्हटले होते. तसेच सूर्यवंशी हे दलित होते म्हणून त्यांना मारले असा गंभीर आरोप त्यांनी केला होता.
खासदार अशोक चव्हाण म्हणाले, असला निष्कर्ष काढणे अत्यंत चुकीचे आहे. राहुल गांधी यांचे वक्तव्य पूर्णपणे राजकीय आहे. एखादी घटना झाल्यानंतर त्याची चौकशी करण्यात आली आहे. चौकशी नंतर स्पष्ट होईल. परंतु व्यक्ति एका समाजाची आहे म्हणून त्याची हत्या मुद्दामून केली गेली असा निष्कर्ष चौकशीच्या आधीच काढणे हे उचित नाही. राहुल गांधी यांचा दौरा पूर्णत: राजकीय होता. त्या दौऱ्याच्या माध्यमातून राजकारण करण्याच्या उद्देशाने त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर बोलताना चव्हाण म्हणाले, कोणत्याही प्रकरणाला जातीय वळण न देता चौकशीअंती जे स्पष्ट होईल त्यातूनच निष्कर्ष काढता येतील. कुठल्याही समाजाला एका व्यक्तीमुळे बदनाम करणे हे चुकीचे आहे. चौकशीमध्ये जे स्पष्ट होईल त्याप्रमाणे कारवाई करता येईल.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.