संग्रहित छायाचित्र
विधानसभा निवडणुकीत महाविकासआघाडीचा(mahavikas aghadi) दारुण पराभव झाला. विशेष म्हणजे, या निवडणुकीत पवारांच्या पक्षाला केवळ 10 जागांवर समाधान मानावे लागले. पक्षाचा झालेला हा पराभव शरद पवारांच्या(sharad pawar) जिव्हारी चांगलाच लागल्याचे दिसून येत आहे. राजकीय वर्तुळात शरद पवारांच्या राष्ट्रवादीत मोठं बदल पाहायला मिळणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.
विधानसभेच्या पराभवानंतर शरद पवार अॅक्शनमोडमध्ये आले आहेत. पक्षात अनेक महत्त्वपूर्ण बदल करण्याच्या तयारीत पवार असल्याचे बोलले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार शरद पवारांच्या पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. तसेच पक्षात अनेक बदल करण्याची मागणीदेखील जोर धरत असल्याचे समजते.
मुंबईत 8 आणि 9 जानेवारीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाची मॅरेथॉन बैठक होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. पक्षाच्या युवा अध्यक्षा, महिला अध्यक्षा, विद्यार्थी अध्यक्षा, महिला प्रदेशाध्यक्षांसह विविध सेलचे प्रमुख बदलणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. याशिवाय प्रदेशाध्यक्ष बदलाबाबतही चर्चा सुरु आहे. मात्र, पक्षातील एक गट जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्ष करण्यावर ठाम आहे.
मिळालेल्या माहितीनुसरा, 8 जानेवारीला सेल, आमदार, खासदार आणि विभागप्रमुखांची बैठक होणार आहे. जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्षांनाही 9 जानेवारीच्या बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आले आहे. या दोन दिवसीय बैठकीत शरद पवार आपल्या पक्षातील बदलांबाबत सर्वांची मते घेणार असून त्यानंतर विविध पदांवरील प्रमुख बदलले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
राष्ट्रवादीच्या या बैठकीमुळं राज्याच्या राजकारणाला नेमंक कोणतं वळणं लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलं आहे. तसेच, पक्षाच्या कार्यकारिणीत बदल केल्यास राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील (Jayant Patil) कायम राहणार की त्यांच्या जागी दुसऱ्या कोणाची वर्णी लागणार हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.