नाराज आहात? दत्तात्रय भरणेंनी सांगितलं परदेश दौऱ्याचं कारण
विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले. त्यानंतर मंत्रीमंडळ विस्तार, खातेवाटप आणि पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये बरेच राजकारण तापले. अजित पवारांचे विश्वासू शिलेदार इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे दत्तात्रय भरणे नाराज असल्याची चर्चा होती. भरणे यांना क्रीडा मंत्रालय देण्यात आल्याने ते नाराज असल्याचे म्हटले जात होते. त्यातच भरणे त्यांच्या कुटुंबासह परदेशात सुट्टीवर गेल्याने त्यांच्या नाराजीच्या चर्चांना अधिकच उधाण आले.
दरम्यान, आपण नाराज नसल्याचे स्पष्टीकरण दत्ता भरणे यांनी दिले. तसेच पुढील आठवड्यात मुंबईला जाऊन पदभार स्वीकारणार असल्याचे संकेत त्यांनी दिले. दत्ता भरणे माध्यमांशी बोलत होते.
मी नाराज नाही मी पुढच्या आठवड्यात मुंबईला जाऊन नक्की माझा पदभार स्वीकारणार असल्याचे संकेत आमदार दत्ता भरणे यांनी दिले.
भरणे पुढे म्हणाले, मी अजिबात नाराज नव्हतो. मी परदेशात गेलो होतो. 10 वर्षे मी बाहेर गेलो नव्हतो. आता कुठे गेलो तर लगेच नाराज वगैरे म्हणणे योग्य नाही.
भरणे म्हणाले, मलाही शेवटी भावना आहे. गेली दहा वर्षे मी पण आमदार होतो. मी कुठेही परदेशात गेलो नव्हतो. मलाही वाटतं परदेशात जावं. बाहेर आमचेही मित्रमंडळी आहेत. कॉलेजचे मित्रमंडळी बाहेर आहेत. त्यांचा खूप दिवसांचा आग्रह होता. त्यामुळे मी बाहेर गेलेलो. मी नाराज असल्याच्या कुठल्याही गोष्टीत तथ्य नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात अतिशय चांगल्या प्रकारे राज्याला पुढे घेऊन जाण्याचे काम आम्ही करत आहोत