संग्रहित छायाचित्र
मुंबई: सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणामुळं राज्यात नव्या वादाला तोंड फुटले आहे. आमदार सुरेश धस यांच्या वक्तव्याने या हत्या प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे. दरम्यान, अभिनेत्री प्राजक्ता माळी लवकरच याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे समजते. त्यामुळं राजकीय वर्तुळासह राज्यभर प्राजक्ता माळी अन् सुरेश धस यांच्यातील वाद पेटणार असल्याची चर्चा जोरदार रंगली आहे.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाविषयी बोलताना धस यांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधला होता. यावेळी त्यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळीचंही नाव घेतलं होतं. "प्राजक्ताताई माळी सुद्धा आमच्या परळीत येतात. परळीचा हाही एक पॅटर्न आहे." असं धस यांनी म्हटलं होतं. धस यांच्या या वक्तव्यानंतर अभिनेत्रींने पत्रकार परिषद घेत यावर प्रतिक्रिया व्यक्त केली होती.
"सुरेश धस यांनी विनम्रपणे माझी माफी मागावी. मी आज महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. त्यांनी योग्य ती कारवाई करावी. मीदेखील कायदेशीर कारवाई करत राहीन" असं प्राजक्ताने पत्रकार परिषदेत म्हटलं होतं. पण सुरेश धस आपल्या वक्तव्यावर ठाम आहेत. त्यांनी अभिनेत्रीच्या पत्रकार परिषदेनंतर "मी प्राजक्ता माळीची माफी मागणार नाही, माझ्यासाठी हा विषय संपलेला आहे" अस वक्तव्य केलं.
त्यांच्या या वक्तव्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार प्राजक्ता लवकरच मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेणार आहे. भेटीसाठी प्राजक्ताने मुख्यमंत्र्यांची वेळ मागतली असल्याचे समजते. यासंदर्भात प्राजक्ताने घेतलेल्या पत्रकार परिषदेतदेखील भाष्य केलं होतं. तिने यावेळी मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणावर ठोस कारवाई करावी अशी विनंती केली होती.
त्यामुळं आता या प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीस यांची काय प्रतिक्रिया असणार याकडे सर्वांचे लक्ष वेधलं आहे.