परतफेड! - २०१९ च्या पोटनिवडणुकीत शरद पवारांच्या गाजलेल्या पावसातील भाषणाने झालेल्या पराभवाला उदयनराजेंचे उत्तर

शिवाजी महाराजांच्या घराण्याचे वारसदार म्हणून उदयनराजेंना सातारा जिल्ह्यातच नव्हे तर राज्य-देशात आदराचे स्थान आहे. सातारा जिल्ह्यातील बहुतेक जनता त्यांच्याकडे छत्रपतींचे वारसदार म्हणून पाहते. त्यातच त्यांची अदा, जनतेत मिसळण्याची ढब, सहजपणे साधता येणारा संपर्क यामुळे नागरिकांत त्यांचे वेगळे स्थान आहे.

संग्रहित छायाचित्र

शिवाजी महाराजांच्या घराण्याचे वारसदार म्हणून उदयनराजेंना (Udayanraje Bhosale) सातारा जिल्ह्यातच नव्हे तर राज्य-देशात आदराचे स्थान आहे. सातारा जिल्ह्यातील बहुतेक जनता त्यांच्याकडे छत्रपतींचे वारसदार म्हणून पाहते. त्यातच त्यांची अदा, जनतेत मिसळण्याची ढब, सहजपणे साधता येणारा संपर्क यामुळे नागरिकांत त्यांचे वेगळे स्थान आहे. त्यावेळी त्यांची कॉलर उडविण्याची स्टाईल खूप लोकप्रिय झाली होती. एवढेच नव्हे तर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनाही ही स्टाईल उचलण्याचा मोह आवरता आला नव्हता. २०१९ च्या पोटनिवडणुकीतील त्यांचा पराभव त्यांच्या चाहत्यांना धक्का देऊन गेला होता. त्याची परतफेड करण्यासाठी त्यांनी आग्रहाने भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी मागून घेतली होती. त्यासाठी राजधानी दिल्लीत तळ ठोकला होता. त्यांच्या उमेदवारीविषयी भाजपही सुरुवातीला फार अनुकूल असल्याचे दिसत नव्हता. अखेर शेवटच्या टप्प्यात त्यांची उमेदवारी जाहीर झाली. मात्र, त्याआधीच उमेदवारी गृहीत धरून त्यांनी मतदारसंघ पिंजून काढला होता. अखेर राजेंचा आग्रह, त्यांचे व्यक्तिमत्त्व, त्याला मिळालेल्या महायुतीच्या आमदारांची साथ यामुळे उदयनराजेंना त्या पराभवाची परतफेड करता आली.        

सातारा जिल्हा तसा परंपरागत काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणता येईल. १९५६ मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून विजयी झालेले क्रांतिवीर नाना पाटील आणि १९९६ मध्ये शिवसेनेकडून विजयी झालेले हिंदूराव नाईक निंबाळकर यांचा अपवाद केला तर आतापर्यंत काँग्रेस विचारसरणीचा उमेदवार विजयी झाला आहे. १९९६ मध्येही हिंदूराव नाईक निंबाळकर (१ लाख ९० हजार मते ) विजयी झाले होते तेव्हा तिरंगी लढत झाली होती. त्यावेळी काँग्रेसकडून प्रतापराव भोसले (१ लाख ७८ हजार मते ) तर अपक्ष म्हणून उदनराजे भोसले (१ लाख १३ हजार मते )  रिंगणात उतरले होते. उदयनराजेंची ही पहिलीच निवडणूक होती. आता २०२४ मध्ये उदयनराजेंच्या रूपाने तिसऱ्यांदा काँग्रेस पक्षाशिवायचा उमेदवार विजयी झाला आहे. यावेळी भारतीय जनता पक्षाकडून उभे राहणाऱ्या उदयनराजेंना राष्ट्रवादीच्या शशिकांत शिंदे यांनी लढत दिली. काँग्रेस किंवा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या सातारा मतदारसंघाला यावेळी खिंडार पडले. यावेळी उदयनराजेंना ५ लाख ७१ हजार तर शिंदे यांना ५ लाख ३८ हजार मते पडली आणि राजे साधारण ३३ हजारांच्या फरकाने विजयी झाले. २०१९ च्या पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवाचा त्यांनी एकाप्रकारे बदला घेतला असे म्हणता येईल.

२०१९ मध्ये सुरुवातीला उदयनराजे राष्ट्रवादीकडून विजयी झाले तेव्हा त्यांना ५ लाख ७९ हजार मते पडली होती. त्यावेळी त्यांच्या विरोधात शिवसेनेकडून माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांना ४ लाख ८२ हजारांच्या आसपास मते पडली होती. यावेळी राजेंनी लाखांहून अधिक  फरकाने निवडणूक जिंकली होती.या अगोदर २०१४ मध्ये उदयनराजेंनी राष्ट्रवादीकडून विजय मिळवताना अपक्ष पुरुषोत्तम जाधव, आपचे राजेंद्र चोरगे यांना पराभूत केले होते. २००९ मध्ये राष्ट्रवादीकडून विजयी होताना उदयनराजेंनी शिवसेनेचे पुरुषोत्तम जाधव यांना पराभूत केले होते.    

२०२४ च्या निवडणुकीवेळी ४ विरुद्ध २ अशा विषम राजकीय स्थितीत राष्ट्रवादीला निवडणूक लढवावी लागली होती. वाईमध्ये राष्ट्रवादीचे मकरंद पाटील, कराड उत्तरमध्ये राष्ट्रवादीचेच शामराव पाटील, कराड दक्षिणमध्ये काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण, कोरेगाव, पाटणमध्ये महेश शिंदे, शंभूराज देसाई हे दोन शिंदे शिवसेनेचे तर सातारामध्ये भाजपचे शिवेंद्रराजे भोसले असे राजकीय बलाबल होते. वाईत राष्ट्रवादीचे आमदार असले तरी त्यांचा कल अजितदादांकडे असल्याची चर्चा होती. साताराचे भाजपचे शिवेंद्रराजे आमदार असले तरी त्यांचे आणि उदयनराजे यांच्यात ३६ चा आकडा आहे. मात्र, त्यांनी भाजप नेतृत्वाच्या आग्रहाने पक्षाचे काम केले. कोरेगाव हा मतदारसंघ शशिकांत शिंदे यांचा असला तरी ते तेथे पराभूत झाले होते. त्यातच वाशीतील माथाडी कामगार आणि तेथील ठेकेदार व्यापाऱ्यांचा असणारा पाठिंबा मोडून काढण्यासाठी शशिकांत शिंदे आणि वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकवून ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांची कोडी करण्याचा प्रयत्न भाजपने केला होता.      

सातारा मतदारसंघात (Satara Lok Sabha 2024) उदयनराजेंना मताधिक्य मिळणार हे नक्की होते. हेw मताधिक्य वाई, पाटण, कोरेगावमध्ये शिंदेंना तोडता आले नाही. आमदार महेश शिंदे यांनी कोरेगावमध्ये जोर लावल्याने तेथे उदयनराजे यांनाच मताधिक्य मिळाले. सातारा, जावळीमध्ये आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्रचाराची धुरा एकहाती सांभाळल्याचा फायदा उदयनराजेंना झाला. आमदार मकरंद पाटील यांनीही काम केले. वाई-खंडाळ्यातून शशिकांत शिंदेना अनपेक्षित सात हजाराची आघाडी मिळाली. कराड उत्तर मतदारसंघात आमदार बाळासाहेब पाटलांनी शिंदेंना चांगली साथ दिली. पृथ्वीराज चव्हाण यांच्या कराड दक्षिणमध्येही सहाशे मतांनी उदयनराजे आघाडीवर राहिले. महायुतीच्या चार आमदारांनी उदयनराजेंचे मनापासून काम केले. या निवडणुकीमध्ये कराड, वाईला फार महत्त्व होते. तेथे अपेक्षित आघाडी शिंदेंना मिळाली नाही. उदयनराजेंच्या विरोधात वातावरण होते. मात्र, मतांची जुळवाजुळव करणे शशिकांत शिंदेंना शक्य झाले नाही.

रयताव्याच्या जमिनीसाठी पक्षांतर? 
राष्ट्रवादीकडून विजयी झाल्यानंतर २०१९ मध्ये उदयनराजेंनी केलेल्या भाजप प्रवेशाचे एक कारण असे सांगितले जाते की, जिल्ह्यातील ऐतिहासिक जमिनी विकण्याचा मार्ग भाजपच्या मदतीने मोकळा व्हावा. जिल्ह्यातच नव्हे तर देशभर राजेंच्या मोठ्या प्रमाणावर जमिनी असून त्याची निश्चित आकडेवारी उपलब्ध नाही. संस्थानच्या ज्या सरंजामी जमिनी होत्या, त्याचे वाटप हा राजघराण्यातील वादाचा विषय आहे. अभयसिंहराजेंनी मंत्री झाल्यानंतर त्यातल्या बऱ्याचशा जमिनींवर स्वत:च्या नावाचे शिक्के मारून घेतले. त्यानंतर उदयनराजेंनी महसूल राज्यमंत्री झाल्यानंतर राज्य सरकारकडून या संदर्भातला आदेश काढून घेतला. सांगोला, जावळी, वाई, सातारा परिसरातील हजारो एकर जमिनींच्या सातबाऱ्यावर उदयनराजेंच्या 'भवानी ट्रस्ट'चे शिक्के मारले आहेत. यामुळे कसणाऱ्या शेतजमिनीची मालकी उदयनराजेंची आहे. शेतकऱ्यांना जमिनीसंदर्भात व्यवहार करायचा असेल, तर उदयनराजेंचे ना-हरकत प्रमाणपत्र लागते. याला राजेंचे काका अभयसिंहराजे यांनी २००३ मध्ये न्यायालयात आव्हान दिले. २०१७ मध्ये निकालात कोर्टाने असा आदेश दिला की छत्रपती घराण्याच्या सरंजामी, देवस्थान इनाम जमिनी उदयनराजे आणि त्यांच्या मातोश्री राजमाता कल्पनाराजे यांना शासनाच्या पूर्व परवानगीशिवाय विकता येणार नाहीत. याच मुद्द्यावरून २०१२ मध्ये वसईचे आमदार विवेक पंडित यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. त्यावेळी मोर्चा सुरू असताना उदयनराजे मोर्चात शिरले आणि तुम्ही तुमच्या कारणासाठी लढा. आमच्या घराण्यावर घाव घालू नका, असे बजावले. २०१९ मध्ये दिलेल्या प्रतिज्ञापत्रातील माहितीनुसार उदयनराजे भोसले यांची १ अब्ज १६ कोटी ३५ लाखांची शेतजमीन तर १८ कोटी ३१ लाखांची बिगर शेतजमीन, २६ लाख २७ हजारांच्या वाणिज्य इमारती, २२ कोटी ३१ लाख ९२ हजारांच्या निवासी इमारती, अशी एकूण १ अब्ज ५७ कोटी २५ लाखांची  मालमत्ता आहे. राजेंच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार छत्रपती घराण्याला या जमिनी वंशपरंपरागत आल्या आहेत. यातील अनेक जमिनी राजेंनी सार्वजनिक हितासाठी दान दिल्या आहेत. शरद पवार अध्यक्ष असलेल्या रयत शिक्षण संस्थेलाही अनेक जमिनी दिल्या आहेत.

दोन गाजलेल्या निवडणुका  
२०१९ मध्ये राष्ट्रवादीकडून विजयी झाल्यावर लगेच राजेंनी राष्ट्रवादीचा, खासदारकीचा राजीनामा दिला आणि भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. नंतरच्या पोटनिवडणुकीत भाजपकडून निवडणूक लढविणाऱ्या उदयनराजेंना ८७ हजारांच्या फरकाने पराभूत व्हावे लागले होते. विरोधात राष्ट्रवादीने उमेदवारी दिलेले श्रीनिवास पाटील यांनी विजयी होताना ६ लाख ३६ हजारावर मते घेतली होती. उदयनराजेंना त्यावेळी ५ लाख ४८ हजार मते पडली होती. हीच ती गाजलेली शरद पवारांची सभा, त्यावेळी त्यांनी पावसात केलेल्या भाषणाने सारे वातावरण फिरले. एवढेच नव्हे तर त्याचा नंतरच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावरही परिणाम झाला होता. या अगोदर सातारा मतदारसंघात १९८० मध्ये झालेल्या निवडणुकीने साऱ्या राज्याचे लक्ष वेधून घेतले होते. त्यावेळी काँग्रेसमध्ये फूट पडल्यावर देवराज अर्स काँग्रेस आणि इंदिरा काँग्रेस असे दोन गट झाले होते. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पुरोगामी लोकशाही दलाच्या सरकारमुळे यशवंतराव, शरद पवार एका बाजूला तर वसंतदादा पाटील एका बाजूला असे चित्र होते. अर्स काँग्रेसतर्फे यशवंतराव चव्हाण यांनी तर इंदिरा काँग्रेसकडून वसंतदादांच्या पत्नी शालिनीताई पाटील या मैदानात होत्या. काँग्रेसच्याच दोन गटात झालेली निवडणूक अतिशय चुरशीची झाली आणि यशवंतरावांनी विजय मिळवला. त्यावेळी त्यांना २ लाख २३ हजार तर शालिनीताई पाटलांना १ लाख ७० हजारांच्या आसपास मते पडली होती. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest