संग्रहित छायाचित्र
मतदानापूर्वीच काँग्रेस पक्षाचा विजय निश्चित झालेला महाराष्ट्रातील एक लोकसभा मतदारसंघ म्हणून कोल्हापूर मतदारसंघाचा उल्लेख करावा लागेल. प्रवाहाविरोधात मतदान करण्याची या मतदारसंघाची एक परंपरा असून शेतकरी कामगार पक्षाचा कधी काळी हा बालेकिल्ला होता. काळाच्या ओघात हा मतदारसंघ शिवसेनेने आपल्या ताब्यात घेतला आणि या मतदारसंघावर आपली मांड मजबूत केली. शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर जिल्ह्यातील दोन्ही खासदारांनी शिंदे शिवसेनेच्या गटात प्रवेश केल्याने उद्धव ठाकरे यांचा गट मतदारसंघात काहीसा कमकुवत बनला. त्यातच महाविकास आघाडीत जागावाटपावेळी हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला गेला. हे सर्व घडविण्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा यांचे डावपेच कारणीभूत ठरले. जागावाटपाची चर्चा सुरू होण्यापूर्वी शरद पवार यांनी छत्रपती शाहू महाराज यांना निवडणूक लढविण्यास राजी केले. आता हा मतदारसंघ उद्धव ठाकरे गटाच्या वाट्याला जाणारा होता आणि त्यांचा त्यावर ठाम दावा होता. शाहू महाराज मात्र शिवसेनेकडून निवडणूक लढविण्यास तयार नव्हते. त्यामुळे त्यांना त्यांच्या आवडीचा पक्ष निवडण्याचा पर्याय दिला. शाहू महाराजांनी काँग्रेस पक्षाला पसंती दिल्यावर ठाकरे गटालाही या मतदारसंघावरील दावा सोडण्याशिवाय दुसरा पर्याय राहिला नाही. या पहिल्या टप्प्यात महाविकास आघाडीचा विजय निश्चित झाला होता.
दुसऱ्या बाजूला शिंदे शिवसेनेच्या वाट्याला गेलेल्या या मतदारसंघात लवकर उमेदवार ठरत नव्हता. भारतीय जनता पक्षाच्या आग्रहामुळे मंडलिकांची उमेदवारी तळ्यात मळ्यात अशी घुटमुळत होती. शेवटी मंडलिक यांची उमेदवारी निश्चित झाली आणि त्यांचा जीव भांड्यात पडला. त्यांच्या दृष्टीने उमेदवारी मिळाली तरी लढाई खूपच अवघड होती. त्याचे कारण म्हणजे शाहू महाराज यांच्याबाबत मतदारसंघात असलेला कमालीचा आदर. सार्वजनिक जीवनात कार्यरत असलेल्या शाहू महाराजांनी कधीही वादग्रस्त भूमिका घेतली नाही. तसेच कधी तशा प्रकारचे विचारही मांडले नाहीत. शाहू महाराजांच्या विचारसरणीनुसार नेहमी कार्यरत असल्यामुळे त्यांच्या विरोधात प्रचार करायचा तरी कसा, असा प्रश्न महायुतीसमोर होता. अजित पवार गटाचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी तर शाहू महाराज यांनी राजकारणात पडू नये, हे त्यांचे क्षेत्र नव्हे अशा प्रकारचे विधान करत त्यांना निवडणूक लढविण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. विरोधकांनी ओढून ताणून शाहू महाराज कोल्हापूर संस्थानचे रक्ताचे वारसदार नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. हा मुद्दा त्यांच्या अंगावर उलटला आणि विरोधी प्रतिक्रिया पाहून त्यांना त्यापासून माघार घ्यावी लागली. हाच मुद्दा पुढे रेटण्यासाठी कोल्हापूर घराण्याशी संबंध असलेले धुळ्याचे राजवर्धन कदमबांडे यांनाही येथे आणण्यात आले.
कोल्हापूर दक्षिण, उत्तर, करवीर, चंदगड, राधानगरी, कागल या विधानसभा मतदारसंघांचा समावेश असून पहिल्या तीन मतदारसंघात महाविकास आघाडी आणि बाकीच्या तीन मतदारसंघात महायुतीची ताकद दिसत होती. असे असले तरी शाहू महाराज यांच्याविषयी मतदारसंघात असलेल्या कमालीच्या आदरामुळे ते दीड लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने विजयी झाले. शाहू महाराज यांनी ७ लाख ५४ हजारांच्या आसपास तर संजय मंडलिक यांना ५ लाख ९९ हजारांच्या आसपास मते पडली. २०१९ च्या निवडणुकीत शिवसेनेचे मंडलिक यांना ७ लाख ४९ हजार, तर राष्ट्रवादीचे धनंजय महाडिक यांना ४ लाख ८८ हजारांच्या आसपास मते पडली होती. २०१४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे धनंजय महाडिक यांना ६ लाखांवर मते पडली होती, तर शिवसेनेचे संजय मंडलिक यांना ५ लाख ७४ हजारांच्या आसपास मते पडली होती. २००९ मध्ये राष्ट्रवादीने नव्या दमाचे आश्वासक उमेदवार म्हणून युवराज संभाजीराजे यांना उमेदवारी दिली होती. त्यावेळी संजय मंडलिक यांचे वडील सदाशिव मंडलिक यांनी राष्ट्रवादीविरुद्ध बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. त्यावेळी अपक्ष असलेल्या मंडलिकांना ४ लाख २८ हजारांच्या आसपास मते पडली होती. दुसऱ्या बाजूला संभाजीराजे यांना ३ लाख ८३ हजार मते मिळाली होती. त्यावेळी ते ४० ते ४५ मतांच्या फरकाने पराभूत झाले होते. त्यावेळी संभाजीराजेंच्या विरोधात पक्षातील आणि पक्षाबाहेरील सर्व नेत्यांनी काम केल्याने ते पराभूत झाले. त्यावेळी ते निवडून आले असते तर मतदारसंघ त्यांनी किमान २५ वर्षे सोडला नसता या भीतीमुळे सर्व पक्षीय विरोधामुळे संभाजीराजे पराभूत झाले. मात्र, त्यावेळच्या पराभवाची व्याजासह परतफेड शाहू महाराजांनी केली. सदाशिव मंडलिकांच्या मुलाला संभाजीराजेंच्या वडिलांकडून म्हणजे शाहू महाराजांकडून दीड लाखांहून अधिक मतांनी पराभूत व्हावे लागले. विधानसभेची स्थानिक पातळीवरील गणितं आणि ‘मोदी को लाना है’ या निर्धाराने महायुतीने केलेल्या कामामुळे मतदारसंघात अत्यंत चुरशीने मतदान झाले.