माझा नेता पलटूराम निघाला!

बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे असा सामना येणाऱ्या काळात रंगणार आहे. परंतु बारामती लोकसभेच्या निवडणुकीचे वातावरण एका नावाने चांगलेच तापवले होते.

Vijay Shivtare

संग्रहित छायाचित्र

बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या रणांगणातून माघार घेणाऱ्या विजय शिवतारेंना कार्यकर्त्याचे खरमरीत पत्र

बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे असा सामना येणाऱ्या काळात रंगणार आहे. परंतु बारामती लोकसभेच्या निवडणुकीचे वातावरण एका नावाने चांगलेच तापवले होते. ते नाव म्हणजे विजय शिवतारे. अजित पवारंचे कट्टर विरोध असलेल्या शिवतारेंनी कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही, अशी केली. मात्र, नंतर आपली तलवार म्यान केली. त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांना ही माघार पटलेली नाही. यापैकी एकाने तर शिवतारेंना खरमरीत पत्र लिहून ‘माझा नेता पलटूराम निघाला,’’ बसा घरचा अहेर त्यांना दिला.  

 विधानसभा निवडणुकांच्या वेळी अजित पवार यांनी शिवतारेंना भर भाषणात ‘यंदा तू कसा निवडून येतो तेच बघतो,’ असा दम देऊन शिवतारेंचा पराभव केला होता . त्याचाच राग मनामध्ये धरून शिवतारेंनी काही दिवसापूर्वी ही  लोकसभा निवडणूक बारामती  मतदारसंघात पवार घराण्याविरोधात लढणे, ही नियतीने मला दिलेली असाईनमेंट आहे. मी कोणत्याही परिस्थितीत बारामतीमधून माघार घेणार नाही, अशी गर्जना त्यांनी केली होती. मात्र, वर्षा बंगल्यावर मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केल्यानंतर विजय शिवतारे  यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवण्याचा निर्णय मागे घेतला होता.

‘‘केवळ एकनाथ शिंदे यांनी अडचण होऊ नये, म्हणून मी बारामतीमधून लढण्याचा निर्णय मागे घेत आहे,’’ असे विजय शिवतारे यांनी सांगितले होते. शिवतारे यांनी पत्रकार परिषदेत एकप्रकारे बारामतीमधून माघार घेण्याच्या आपल्या निर्णयाचे समर्थन केले होते. मात्र, सध्या सोशल मीडियावर विजय शिवतारे यांच्या समर्थकाच्या नावाने एक पत्र व्हायरल होत आहे. विजय शिवतारे यांच्या कट्टर कार्यकर्त्याने लिहलेले हे पत्र सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे. या पत्रातून संबंधित कार्यकर्त्याने विजय शिवतारे यांना खरमरीत भाषेत जाब विचारला आहे.

पुरंदरच्या तहाचा समाचार घेणाऱ्या पत्रात कार्यकर्त्याने नक्की काय लिहले आहे?

प्रति,

श्री. विजय बापू शिवतारे, शिवसेना नेते, पुरंदर

स.न.वि.वि.

बापू, १३ मार्च २०२४ रोजी तुम्ही बंडाची भूमिका घेवून बारामती लोकसभेची निवडणूक अपक्ष लढवण्याचा निर्धार केला. त्यानंतर मिडीयाने तुम्हाला अगदी डोक्यावर घेतलं. दर अर्ध्या तासाच्या बुलेटीनला तुमची स्फोटक विधाने गाजू लागली. चॅनेल कुठलंही लावा दिसणार फक्त शिवतारे बापू हे ठरलेलं. त्यानंतर तुम्ही जेजुरीच्या खंडोबाच्या साक्षीने एल्गार पुकारला. पुढे तुमचे दौरे, भेटीगाठी, पत्रकार परिषद गाजू लागल्या. तुम्हीसुद्धा अगदी राणा भीमदेवी थाटाने बोलत राहिलात. आरोप, टीका-टिप्पणी करू लागलात. ‘काहीही झालं तरी आता माघार नाही... बारामती कोणाची जहागिरी नाही...’ यासह तुमची अनेक विधाने गाजली. तुम्हाला समर्थक मिळाले. माय-बाप जनता, पदाधिकारी कार्यकर्ते यांची वज्रमूठ तुम्ही उभी केली. प्रसंगी शिवसेनेचा राजीनामा देवू, पण, आता निर्णय घेतलाय, ही तुमची भूमिका अवघ्या महाराष्ट्रात गाजली. घोडामैदान जवळ आलं असताना बापू, तुम्ही ३० मार्च २०२४ रोजी अचानक माघार घेतली आणि आमची मोठी अडचण केली.

अजित पवारांची गुर्मी तशीच आहे. ते उर्मट आहेत. पण, अजित पवारांना त्यांचा पश्चात्तापही नाही. जणू काही लोकांना फसवणे हा त्यांचा जन्मजात अधिकार असल्यासारखे ते वागत आहेत. इथून मतदान घेऊन त्या जोरावर राज्यात, देशात ब्लॅकमेलिंग केलं जात आहे. हा ब्रह्मराक्षस आम्हीच तयार केला आहे. या पापाचं परिमार्जन आम्हा मतदारांनाच करावं लागेल. या रामायणातला रावणाच्या विरोधात लढणारा रामाच्या बरोबर असणारा विभीषण विजय शिवतारे आहे, अशीही टीका बापू तुम्हीच केली होती. मात्र, आज तुम्हाला अजित पवारांचा काय साक्षात्कार झाला आहे? आता तुम्ही रामायणातले विभिषण आहात की नाही? हेही आम्हाला कळू द्या. बापू, पवारांच्या विरोधातल्या ५ लाख ८० हजार मतदारांनी आता नेमकं काय करायचं? आता तुम्हाला अजित पवार उर्मट व नालायक वाटत नाहीत का? तुमच्याचं भाषेत त्यांची गुर्मी आणि माज उतरला आहे का? सुनेत्रा पवार या अजित पवारांच्या पत्नी आहेत, म्हणून आम्ही त्यांना मतदान द्यायचं का? त्यांचं कॉलिफिकेशन काय? असा प्रश्न तुम्हीचं उपस्थित केला होता. मग आता आम्ही मतदार म्हणून सुनेत्रा वहिनींना मतदान कारायचं का आणि कशासाठी? यावरही बापू तुम्हीचं अधिकारवाणीने प्रकाश टाकला तर बरे होईल.

बापू, मी तुमचा कट्टर समर्थक आहे. तुमच्या राजकीय प्रवासात कायम तुमच्या पाठीशी उभा असतो आणि राहीनसुद्धा. तुम्ही म्हणाल तसं आजपर्यंत करीत आलो आहे. २०१९ ला सुद्धा अजित पवार यांच्या समर्थकांशी तुमच्यामुळे भांडलो आहे. कारण, तुम्ही माझे नेते आहात. पण, माझा नेता असा संधीसाधू, लेचापेचा, छक्के पंजे करणारा आणि पोटात एक आणि ओठात एक असणारा निघाला, याचं फार वाईट वाटलं. बापू, ज्या मिडीयाने तुम्हाला डोक्यावर घेतलं, त्याचं मिडीयाने तुमची रया पार घालवून टाकली. सोशल मिडीयात तर तुम्हाला महाराष्ट्राचा पलटूराम म्हणून हॅशटॅग फिरवला जात आहे. पुरंदरचा मांडवली सम्राट... पाकीट भेटलं का? घुमजाव, शिवतारे जमी पर... चिऊतारे... शेवटी, आपला आवाका दाखविला.... ५० खोके शिवतारे ओके, अशा खोचक कमेंटचा सोशल मिडीयात मुसळधार पाऊस पडतो आहे.

अजित पवारला माझा आवाका कळेल, म्हणणारे तुम्ही आवाका दाखविण्याच्या आधीच 'शेपूट घातलंत. मुख्यमंत्र्यांना माझ्यामुळे अडचण होत आहे, हे खतगावकर यांनी सांगितले. असं बाळबोध समर्थन करणाऱ्या विजय शिवतारेंना हे आधी समजलं नव्हतं का? आता त्या ५ लाख ८० हजार पवार विरोधी मतदारांनी नेमकं काय करायचं, हे तुम्ही सांगू शकाल का? तुम्ही स्वतः हा घटनाक्रम घडवून आणला की, तुमचा बोलविता धनी दुसराच कुणी होता? की तुम्ही कुणाची स्क्रीप्ट वाचत होतात? आता तुमची वैयक्तिक भूमिका काय? आज तुमची राजकीय विश्वासार्हता शिल्लक आहे का? तुम्ही म्हणजे 'फटा पोस्टर निकला चुहा' नव्हे का? आदरणीय बापू, याचीही उत्तरे तुम्ही दिलीच पाहिजेत.

असो. हे सगळं वाचून तुम्हाला राग येईल. तुमची चिडचिड होईल. पण, बापू तुमचा कार्यकर्ता म्हणून समर्थन केलं तेव्हा अख्खा गावानं दस्तुरखुद्द अजित पवार यांच्या समर्थकांनी व कार्यकत्यांनी मला वेडयात काढलं आणि तुम्हाला पोपटलाल म्हटलं. त्यामुळे चिडून मी सर्व पै पाहुणे, नातेवाईक, आप्तेष्ट, सगेसोयरे, मित्र परिवार, गावात आणि तालुक्यात तुमचा प्रचार केला. तुमची भूमिका लोकांना समजावून सांगितली. पण, तुम्ही माघार घेतली आणि माझी गोची झाली. आता लोक फोन करून माझ्यासह तुमचाही उद्धार करू लागलेत. त्यामुळे मी फोन बंद करून बसलोय म्हणून आता तुम्ही एखादी पत्रकार परिषद घेऊन या सगळ्या प्रश्नांची सविस्तर उत्तरे द्या. तसाही पत्रकार परिषद घेऊन 'गोंधळ' घालण्याचा तुम्हाला जुना नाद आहे. अडचण होत आहे. असो... जमेल तेवढं करा ओ. माझी अडचण होत आहे. तूर्तास तरी थांबतो.

कळावेआपला

कट्टर कार्यकर्ता

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest