NCP Split: 'ना पाठीत खंजीर खुपसला, ना दगा दिला'; अजित दादांनी लिहिले पत्र

कोणाचाही अवमान करणे, कोणाच्याही भावना दुखाविणे, कोणालाही दगा देणे किंवा पाठीत खंजीर खुपसणे असा कोणताही उद्देश अजिबात नव्हता व कधीच नसेल, अशी भूमिका मांडत

Ajit Pawar

संग्रहित छायाचित्र

अजित पवार यांची लेटर डिप्लोमसी, भाजपसोबत जाण्याची भूमिका स्पष्ट करणारे लिहिले पत्र

राजेंद्र चोपडे
कोणाचाही अवमान करणे, कोणाच्याही भावना दुखाविणे, कोणालाही दगा देणे किंवा पाठीत खंजीर खुपसणे असा कोणताही उद्देश अजिबात नव्हता व कधीच नसेल, अशी भूमिका मांडत आपण भारतीय जनता पक्षासोबत का गेलो हे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्पष्ट केले आहे. 

निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांनी अजित पवार गटच मूळ राष्ट्रवादी पक्ष असल्याचा निर्णय दिला आहे. या काळात अजित पवार यांनी वेगळी भूमिका का घेतली याबाबत एकदा जाहीर सांगितले होते.  मात्र, त्यांनी आता पुन्हा एकदा जनतेला उद्देशून एक पत्र लिहिले असून हे पत्र सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केले आहे. यात त्यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. (NCP Split News)

अजित पवार पत्रात म्हणतात की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भारतीय जनता पक्ष, शिवसेना यांच्यासोबत जाताना वेगळा विचार केला. याबाबत अनेक माध्यमातून विविध प्रकारे आजही चर्चा होत असते. याबाबत माझी नेमकी भूमिका राज्यातील सन्माननीय नागरिकांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने केलेला हा पत्रप्रपंच. पवार यांनी पत्रात म्हटले आहे की, १९९१ पासून मी राजकीय जीवनात खऱ्या अर्थाने वाटचाल करीत आहे. मला राजकारणात कोणी आणले, कोणी मला मंत्रिपद दिले, कोणी संधी दिली याबाबत अनेकदा चर्चा झाली. खरतर मला राजकारणात संधी अपघातानेच मिळाली. त्या काळी राज्यस्तरावर नेतृत्वासाठी एका युवानेत्याची आवश्यकता होती. त्यामुळे कुटुंबीय म्हणून मला ती संधी मिळाली. संधी मिळाल्यानंतर त्या संधीचे सोने करण्यासाठी मी रात्रीचा दिवस केला. कष्ट, परिश्रम केले, इतर सर्व जबाबदा-यांकडे दुर्लक्ष करून समाजकारणासाठी वाहून घेतले. तीन दशकांहून अधिक काळ हा माझा प्रवास सुरू आहे. फक्त संधी मिळून चालणार नव्हते तर त्याचा लोकांची कामे होण्यासाठी कसा उपयोग करता येईल यावरच माझा कायम भर राहिला आहे.

पहाटे पाचपासून काम सुरू करण्याची सवय स्वत:ला लावून घेतली. त्याचे कारण म्हणजे हातात असलेल्या वेळेत समाजोपयोगी, विधायक, विकासाची कामे वेगाने मार्गी लागावीत. ज्या मतदारांनी भरभरून प्रेम केले, विश्वास ठेवला, त्यांचे जीवनमान अधिक कसे उंचावेल यासाठी कायमच मी प्रयत्न केला. पहिल्या दिवसापासून राजकारण, समाजकारण करताना इतर कोणत्याही मुद्यापेक्षा विकासालाच सर्वाधिक प्राधान्य दिले, आजही आणि भविष्यातही विकास हाच कायम माझा आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांचा एककलमी कार्यक्रम असेल. काही काळ सत्ताधारी तर काही काळ विरोधक म्हणून काम केले. सत्तेत असताना असलेला कामाचा वेग आणि विरोधक असताना रखडलेली कामे या दोन्हीचा अनुभव घेतला. जर लोकप्रतिनिधी म्हणून काम करायचे असेल तर त्याला सत्तेची जोड हवी, ही वस्तुस्थिती नाकारून चालत नाही, असेही पत्रात म्हटले आहे. 

विचारधारा, ध्येयधोरणे यांच्याशी कोणतीही तडजोड न करता विकासकामे वेगाने मार्गी लागावीत, याच उद्देशाने वेगळी भूमिका घेतली. यात कोणाचाही अवमान करणे, कोणाच्याही भावना दुखाविणे, कोणालाही दगा देणे किंवा पाठीत खंजीर खुपसणे असा कोणताही उद्देश अजिबात नव्हता व कधीच नसेल. कायमच वडीलधाऱ्यांविषयी आदराची भावना, समवयस्कांना सोबत घेणे आणि युवकांना विविध ठिकाणी संधी देण्याचे काम माझ्याकडून झाले आहे. आजही मी फक्त भूमिका घेतली आहे, सत्ता असेल तर मतदारसंघासह राज्यातील सर्वच विकासकामे वेगाने मार्गी लागतील ही स्वच्छ भूमिका आहे, यात कोणाचाही कसलाही अनादर करण्याचा अजिबात हेतू नव्हता व नसेल, असेही म्हटले आहे. 

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली जो विकास होतो आहे, तो मला महत्त्वाचा वाटला. कणखर नेतृत्व व योग्य निर्णयप्रक्रिया हे त्यांचे गुण मला भावले. माझी आणि त्यांची कार्यप्रणाली मिळतीजुळती आहे. कामावर आमचे जास्त प्रेम आहे, त्यांच्यासमवेत माझ्या भविष्यातील विकासाच्या ज्या योजना आहेत, त्या अधिक प्रभावीपणे प्रत्यक्षात उतरविणे शक्य होईल, असे मला वाटल्याने मी त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. 

या राज्याला विकासात अग्रेसर कसे करता येईल, या उद्देशाने मी ही भूमिका स्वीकारली आहे. मी सत्तेत आल्यानंतर विकासास आलेली गती आपण अनुभवली आहे. वडीलधाऱ्या किंवा ज्येष्ठांचा अनादर करणे असा हेतू नसून भविष्यात वेगाने लोकांचे राहणीमान कसे उंचावता येईल, मूलभूत पायाभूत सुविधा अधिक सक्षम कशा करता येतील हाच विचार मनात आहे. यापुढील काळातही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणावरही वैयक्तिक स्वरूपाची टीकाटीप्पणी टाळून विकासाची ब्ल्यू प्रिंट घेऊन राज्यातील जनतेसमोर जाणार आहे, एवढीच ग्वाही मी या निमित्ताने राज्यातील जनतेला देऊ इच्छितो. 

विकासाच्या या वाटेवर सर्व सन्माननीय नागरिकांनी माझ्यासोबत यावे, वडीलधाऱ्या मंडळींनी आशीर्वाद द्यावा, असे विनम्र आवाहनही अजित पवार यांनी पत्रात केले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story