Maharashtra Assembly Election 2024 : प्रचाराचा लंबक ३६० च्या कोनात

एप्रिल २०२४ ला झालेली लोकसभेची निवडणूक आणि प्रारंभी मराठवाड्यात आणि नंतर राज्यभरात मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून झालेली घुसळण या पार्श्वभूमीवर या विधानसभेच्या निवडणुकीत प्रचाराचा रोख नेमका कोणत्या मुद्यावर राहणार, याबाबत सर्वांच्याच मनात उत्सुकता लागली होती.

Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

प्रारंभी लाडकी बहीण ते शेतीमालाचे दर, मध्यंतरात, पायाभूत सुविधा आणि महामंडळे, अखेरीस व्होट जिहाद आणि धर्मयुद्धापर्यंत कलाटणी

एप्रिल २०२४ ला झालेली लोकसभेची निवडणूक आणि प्रारंभी मराठवाड्यात आणि नंतर राज्यभरात मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून झालेली घुसळण या पार्श्वभूमीवर या विधानसभेच्या निवडणुकीत प्रचाराचा रोख नेमका कोणत्या मुद्यावर राहणार, याबाबत सर्वांच्याच मनात उत्सुकता लागली होती. प्रत्यक्षात प्रचाराचा रोख सुरुवातीला एकमेकांचे गुणधर्म उधळण्यापासून ते शेवटी हिंदू-मुस्लीम मुद्यावर येऊन ठेपलेला दिसत आहे. दरम्यानच्या काळात हा थोडासा शेतीमालाचे दर, पायाभूत सुविधांचा विकास, रोजगार, युवक कल्याण, महिलांचा विकास या टप्प्यात आलेलाही दिसून आला. मात्र शेवटी प्रचाराचा लंबक वळत-वळत व्होट जिहाद ते धर्मयुद्ध या टप्प्यावर येऊन स्थिरावल्याचे दिसून आले आहे.      

लवकरच प्रचाराच्या तोफा थंडावतील, शिल्लक वेळेत राजकीय पक्ष, उमेदवार मतदारांशी शक्य त्या मार्गानी संपर्क साधून मतदानाचे आवाहन करतील. त्यासाठी देण्या-घेण्याची प्रक्रियाही पार पाडतील. प्रचाराच्या सुरुवातीला महायुतीत शिरकाव केलेल्या अजित पवार गटाने आपण ही भूमिका का घेतली हे सांगण्यात बराच वेळ घेतला. त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे राष्ट्रवादीचा हा गट प्रत्येक प्रचारसभेत महायुतीच्या सरकारने सर्वसामान्यांसाठी राबवलेल्या योजनांची माहिती देत होते. अर्थात त्यातही लाडकी बहीण योजनेचा आणि शेतकऱ्यांच्या वीजबिल माफीचा मुद्दा आघाडीवर होता. तत्पूर्वी मराठवाड्यात तापलेला (की, तापवलेला) मराठा आरक्षणाचा मुद्दा जरांगे पाटलांनी ऐनवेळी माघार घेतल्याने थंड बस्त्यात गेला. सोलर वीज, प्रत्येक जातीसाठी महामंडळे आणि येणाऱ्या काळात केला जाणारा विकास सांगण्यात येत होता. भाजप-शिवसेना महायुतीने मात्र सुरुवातीपासून वेगवान योजनांचा मारा केल्याचे पाहायला मिळाले. यात अजित पवारांना सोबत का घेतले हे सांगण्याची वेळच भाजपवाल्यांनी त्यांच्यावर येऊ दिली नाही, मात्र शिवसेना फोडल्याचे श्रेय मात्र अप्रत्यक्षरीत्या का होईना भाजपचे नेते घेताना दिसले.  मराठवाड्यातील बहुतांश लढती चुलत्या-पुतण्यात होत असल्याने भाजपने ज्या जागांवर विजयाची हमी आहे, अशा जागांवर फोकस केल्याचेही दिसून आले. याचदरम्यान शिंदे यांच्या शिवसेनेने किमान फुटलेले शिवसैनिक आमदार पुन्हा निवडून आणता येतील यांच्यावर जोर दिलेला दिसून आला. अजित पवारांच्या गोटातही आम्ही अद्याप फुले-शाहू आंबेडकर विचारधारा सोडलेली नाही, हे सांगत परतीचे दोर शिल्लक असल्याचे दाखवून देण्यात आले. महाविकास आघाडीकडे प्रचारात सांगण्यासारख्या योजनाच नसल्याने त्यांनी आपले जुने मुद्दे उगाळण्याचा प्रयत्न जोरकसपणे केल्याचे पाहायला मिळाले.

लाडकी बहीण योजनेला महालक्ष्मी योजनेच्या ३ हजार उत्तर देण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून करण्यात आला. मात्र केवळ कर्नाटक आणि तेलंगणातील योजनांच्या आधारे महायुतीच्या लोकप्रिय योजनांचा सामना करताना काँग्रेसचे प्रयत्न तोकडे पडल्याचेही दिसून आले. यातील शरद पवारांनी मात्र दुसऱ्यांच्या मुद्यांना कलाटणी देत प्रचाराचा रोख धार्मिक मुद्यावर आणण्याचा प्रयत्न केला. इथेच प्रचाराच्या मुद्यातील विकास आणि लोककल्याणकारी योजना बाजूला पडला आणि एकदम भाषणांत हिंदू-मुस्लीम विषय ऐरणीवर आणले गेले. कुठल्याही मुद्यापेक्षा सत्तेत वाट हवा असणाऱ्या अथवा काहीही करून सत्तेत वाटा मिळवण्यास प्राधान्य देणाऱ्या शरद पवार यांनी भाजपच्या हाती आयते कोलीत दिले असावे. कारण यानंतर भाजपने मुस्लीम एनजीओ, मौलाना यांच्या मागण्या मान्य करण्यावरून काँग्रेसला टार्गेट करायला सुरुवात केली. अचानकपणे प्रचार लाडकी बहीणवरून थेट व्होट जिहाद ते धर्मयुद्धापर्यंत आला. हे सर्व आतून ठरवून केले असावे, असे वाटण्यापर्यंत प्रचाराला वेगवान कलाटणी मिळाली. ही शक्यता असू शकते अथवा नसेलही. मात्र तसे घडले हे नक्की. या सर्व पार्श्वभूमीवर मतांचे ध्रुवीकरण करून कोणत्या पक्षाला याचा फायदा होईल, कोणत्या पक्षाला याचा फटका बसेल, हे सांगणे तसे कठीण नाही. कारण या शर्यतीत राज ठाकरेही शंभरपेक्षा जास्त उमेदवार उभे करत हिंदुत्वाची भाषा बोलताना दिसले. त्यामुळे याचा परिणाम काय व्हायला हवा, याचा विचार कोणीतरी केलेला असणारच !

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest