संग्रहित छायाचित्र
लोकसभा निवडणुकीची घोषणा कधीही होऊ शकते. अशात महाराष्ट्रातील सर्वात लक्षवेधी मतदारसंघामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघाचा (Baramati Loksabha) समावेश होतो. येथे खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) विरुद्ध सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) अशी लढत होणार आहे. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बारामतीत बोलताना बारामतीकरांना भावनिक आवाहन केले आहे. मी आतापर्यंत तुमचं ऐकत आलो आहे. आता तुम्हाला माझं ऐकावं लागेल. माझा शब्द मोडू नये, असं मला वाटतं. पण तो तुमचा अधिकार आहे, असं अजित पवार म्हणाले.
अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, निवडणुकीच्या घोषणेनंतर लगेचच आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. आचारसंहितेच्या काळात काही नियम पाळावे लागतात. आपल्याला माहिती आहे की आधी लोकसभा निवडणूक असेल. त्यानंतर विधानसभा असेल. बारामती कशी बदलत गेली. विकास कसा होत गेला. हे आपल्याला माहिती आहे. एमआयडीसीला जागा कमी पडायला लागली आहे. मी सातत्याने कामगार आणि उद्योगपती यांच्यात समन्वय साधत गेलो आहे. आपण मला साथ दिली. वडीलधारी मंडळींनी साथ दिल्याने काम करण्यास हुरूप येतो. कंपनीला फायदा होत असेल. कंपनीने देखील कामगारांना साथ दिली पाहिजे.
मला साथ द्या-अजित पवार
माझा स्वभाव थोडा कडक आहे. परंतु, कुणावर कधी दबाव आणला नाही, असे सांगून अजित पवार म्हणाले की, माझ्या जोडीला खासदार असला की केंद्र सरकारची कामे करता येतील. आजपर्यंत जशी साथ दिली. तशीच यापुढे लोकसभेला द्या. बारामतीचा माझ्यासारखा विकास कुणी करू शकत नाही. माझं चिन्ह घड्याळ आहे. जशी जशी निवडणूक येईल, तस तसा तुमच्यावर दबाव येईल. मी कुणावर दबाव आणला नाही. आजपर्यंत तुम्ही मला साथ दिली आहे. उद्या लोकसभेलासुद्धा साथ द्या.
... तरच बारामतीचा विकास !
लवकरच महायुतीचा उमेदवार जाहीर करणार आहे. उमेदवार दिल्यानंतर तुम्ही साथ द्याल ही मला खात्री आहे. केंद्रामध्ये आपल्या विचारांचा खासदार गेला, तर लोकांची कामं होतील. माझे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चांगले संबंध आहेत. राज्य आणि केंद्र सरकार दोन्ही बाजूने निधी आला, तर संपूर्ण बारामती मतदारसंघाचा विकास होईल. त्यामुळे महायुती जो उमेदवार देईल. त्याला निवडून द्याल, असा विश्वास आहे, असेही अजित पवार म्हणाले.