संग्रहित छायाचित्र
बारामतीतून लढणारच अशी ठाम भूमिका घेत शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. अजित पवारांनी (Ajit Pawar) सभ्यतेची नीच पातळी गाठली आहे, अशी बोचरी टीका करत त्यांना बारामतीतून यश मिळणार नाही असे जाहीर सांगितले आहे. ‘नमो विचार मंच’च्या माध्यमातून आपण बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादी कॉग्रेसकडून जोरदार प्रत्युत्तर दिल्यानंतरही विजय शिवतारे यांनी पुन्हा एकदा अजित पवारांवर हल्लाबोल केला. पत्रकार परिषदेत ते म्हणाले, महायुतीत आल्यावर मी अजित पवार यांचा सत्कार देखील केला होता. त्यांची गुर्मी तशीच होती, त्यामुळे मी आता माघार नाही, बारामती लोकसभा मतदार (Baramati Lok Sabha), हा काही कोणाचा सातबारा नाही. देशातील ५४३ मतदारसंघापैकी एक लोकसभेचा मतदार संघ आहे, कुणाची मालकी नाही. पुरंदरचे लोक बदला घेण्याबद्दल बोलत आहेत. पण, नियती बदला घेईल. पहाटेचा शपथविधी घेतल्यानंतर अजित पवारांची विश्वाससार्हता संपली होती. बारामती लोकसभा मतदार संघात लोकशाहीला मानणाऱ्या घराणेशाहीला, कुटुंबशाहीला आणि साम्राज्यशाहीला विरोध करणाऱ्या सर्वसामान्यांना मतदानाचा हक्क मिळावा यासाठी मी ही निवडणूक लढणार म्हणजे लढणारच, असे शिवतारे म्हणाले.
शिवतारे म्हणाले, २०१९ च्या निवडणुकीमध्ये मी अजित पवारांच्या मुलाच्या विरोधात प्रचार केला होता. तो राजकारणाचा भाग होता. तो वैयक्तिक भाग नव्हता. मात्र, अजित पवारांनी सभ्यतेची नीच पातळी गाठली, मी २३ दिवस लीलावतीत दाख होतो. मला बायपास करायला सांगितली होती. मी नाही केली. स्टेंट टाकल्या. फेल झाल्या आणि मी कार्डिअक ॲम्ब्युलन्समध्ये माझा प्रचार केला. अजित पवार त्यावेळी मला म्हणाले होते, ''मरायला लागलात तर कशाला निवडणूक लढवताय. तुम्ही खोटं बोलताय, लोकांच्या सहानुभूतीसाठी करताय. माझी गाडी, त्याचा नंबर, ती कुणाची गाडी इतक्या खालच्या थराला अजित पवार गेले होते. तु कसा निवडून येतो हेच मी बघतो..महाराष्ट्रात मी कुणाला पाडायचं ठरवलं तर मी कुणाच्या बापाच ऐकत नाही, मी पाडतो म्हणजे पाडतो...गाव पेटवायला एक नालायक माणूस लागतो, पण गाव वसवण्यासाठी अनेक हात लागतात'',असा टोलाही शिवतारेंनी अजित पवारांना लगावला.
पवार विरुद्ध बारामतीतील सर्वसामान्य माणूस अशी ही लढाई असणार आहे. सर्वांना पवारांनी त्रास दिल्याचे सांगून ते म्हणाले, भोरचे अनंतराव थोपटे १९९९ मध्ये मुख्यमंत्री होऊ शकले असते. पण, त्यांना पाडण्यात आलं. संग्राम थोपटेंना महाविकास आघाडीत मंत्री आणि विधानसभा अध्यक्ष अजित पवारांनी होऊ दिलं नाही. आम्ही पुण्याचे मालक आहोत, अशी अजित पवारांची मानसिकता आहे. लोकसभेला हर्षवर्धन पाटलांकडून मतदान करून घ्यायचे आणि विधानसभेला त्यांच्याविरोधात उमेदवार उभे करायचे, अशा प्रकारची फसवेगिरी केली जाते. लोकांना फसवणे हा यांचा जन्मजात अधिकार आहे, अशी टीका शिवतारे यांनी केली.
जेव्हा मी बारामतीत फिरलो तेव्हा मला असं दिसून आलं की अजित पवार उर्मट आहेत, म्हणून आम्ही सुप्रिया सुळेंना मतं देऊ, असं लोकांचं मत आहे. एका बाजुला लांडगा, दुसऱ्या बाजुला वाघ, कुठल्याही पिंजऱ्यात टाकलं तरी तेच. मग ते मतदान कसं करणार? ६ लाख ८६ हजार ००० मतदार हे पवारांच्या समर्थनात आहेत. दुसऱ्या बाजूला ५ लाख ५० हजार ००० मतदार पवारविरोधात आहेत. त्यांना ना सुप्रिया सुळेंना मत द्यायचं आहे ना सुनेत्रा पवारांना. आवडत्या उमेदवाराला मतदान करण्याची संधीच मिळाली नाही, तर तो लोकशाहीचा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या व्यवस्थेचा घात होईल, असेही शिवतारे म्हणाले.