संग्रहित छायाचित्र
अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत आणि जामखेड या दोन तालुक्यांच्या शहरांनी मिळून बनलेल्या कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात यंदा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार आणि विद्यमान आमदार रोहित पवार आणि भाजपचे उमेदवार प्रा. राम शिंदे यांच्यात सामना रंगला. धनशक्ती आणि बलशक्तीच्या वापर झाल्याचे आरोप प्रत्यारोप झाल्याने ही निवडणूक दीर्घकाळ लक्षात राहणार आहे. २००९ आणि २०१४ असे सलग दोन वेळा आमदार म्हणून प्रा. राम शिंदे इथून निवडून आले. २०१४ सालच्या सरकारमध्ये राम शिंदे हे मंत्री देखील राहिले. मात्र २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत रोहित पवार यांनी राम शिंदे यांचा ४३ हजार मतांनी परभव केला. त्यावेळी रोहित पवार हे 'जायंट किलर' ठरले होते. यंदाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा रोहित पवार यांचा विजय झाला. मात्र यंदाच्या निवडणुकीत रोहित पवारांचे मताधिक्य मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे दिसले. अवघ्या १२४३ मतांनी शिंदे यांचा पराभव झाला. शिंदे यांनी केलेला 'डोअर टू डोअर' प्रचार त्यांना फायद्याचा ठरला. त्यांनी मतदारसंघात जनसंपर्क ठेवला. दुसरीकडे रोहित पवार यांच्या मतदारसंघातील कामाबद्दल देखील मतदार समाधानी होते असे नव्हे.त्यामुळेच आधी इतके मताधिक्य त्यांना राखता आले नाही. त्यामुळे पवारांचा विजय निसटता ठरला. तसेच तितकाच तो वादग्रस्त देखील ठरला.
मतदारसंघाविषयी
कर्जत आणि जामखेड या दोन तालुक्यांच्या शहरांनी मिळून बनलेला हा मतदारसंघ आहे. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात हा मतदारसंघ पडतो. बारामतीला खेटून हा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात उद्योगधंदे अगदी तुरळक प्रमाणात आहे. बहुसंख्य लोक शेती करतात. मोठ्या प्रमाणावर इथली शेती कोरडवाहू आहे. मराठा, ओबीसी, अनुसूचित जाती अशा विविध जाती समूहांचे वास्तव्य या मतदारसंघात आहे. भटक्या विमुक्त जातींची संख्या आणि त्यांचे प्रश्न हे या मतदारसंघाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.
यंदाची निवडणूक
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात रोहित पवार विरुद्ध राम शिंदे असा मुख्य सामना रंगला. पवार आणि शिंदे यांच्यासह एकूण ११ उमेदवार यावेळी रिंगणात होते. या निवडणुकीत राम शिंदे यांचा अवघ्या १२४३ मतांनी पराभव झाला. शिंदे यांना १ लाख २६ हजार ४३३ मतदान झाले. तर रोहित पवार यांना १ लाख २७ हजार ६७६ मते मिळाली. पवार यांचा निसटता विजय झाला. २०१९ च्या निवडणुकीतील पराभव शिंदे यांच्या जिव्हारी लागला होता. त्यापूर्वी गेली १० वर्षे शिंदे यांचे मतदार संघात वर्चस्व राहिले होते. इतकेच नव्हे तर २०१४ च्या सरकारमध्ये ते गृहराज्यमंत्री देखील राहिले होते. त्यामुळे झालेल्या पराभवाचे उट्टे भरून काढण्याची तयारी त्यांनी यंदा केली होती. जुलै २०२२ ला त्यांची विधानपरिषदेवर निवड झाली. तरीही त्यांनी विधानसभा लढवण्याचे ठरवले. मैदानात उतरून मतदारसंघात दारोदारी त्यांनी प्रचार सुरू केला. इतकेच नव्हे तर या निवडणुकीत 'भूमीपुत्र' विरुद्ध 'बाहेरचा उमेदवार' हा मुद्दा देखील महत्त्वाचा ठरला. तसेच मागील काही वर्षे एमआयडीसीवरून शिंदे-पवार यांच्यात सुरू असलेली रस्सीखेच देखील महत्त्वाचा मुद्दा ठरला.
सुनियोजित कटाचा बळी
कर्जत-जामखेडची निवडणूक प्रचारादरम्यान जेवढी गाजली त्यापेक्षा अधिक मतदानानंतर गाजली. भाजपच्या सुमारे २५ ते ३० कार्यकर्त्यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघात मध्यरात्री ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्रॉंग रुममध्ये घुसण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला. तसेच सीआरपीएफ आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. भाजप कार्यकर्त्यांचा हा प्रयत्न म्हणजे पराभवाच्या भितीने सुरु असलेली गुंडागर्दी असल्याचा आरोप पवारांनी केला. दुसरीकडे आपल्या पराभव हा सुनियोजित कट असल्याचा आरोप शिंदे यांनी केला. निवडणुकीत विजयानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कराड मधील प्रीतीसंगमावर अजित पवार आणि आमदार रोहित पवार समोरासमोर आले. यावेळी रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या पाया पडत आशीर्वाद घेतले. यावर 'बेट्या थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...' असे म्हणत अजित पवार यांनी रोहित पवार यांना टोला लगावला. यावर प्रतिक्रिया देताना राम शिंदे म्हणाले की एका सुनियोजित कटाचा मी बळी ठरलो आहे. पवारांच्या कौटुंबिक कलहात जे करार झाले त्याचा परिणाम कर्जत-जामखेडमध्ये दिसला. अजित पवार यांनी युतीधर्म पाळला नाही. रोहित पवारांच्या विरोधात अजित पवारांनी मतदारसंघात जोर लावला नाही असा आरोप शिंदे यांनी केला. तसेच वारिष्ठांकडे यासंदर्भात याधीच बोलल्याचे त्यांनी सांगितले.
फेरमतदान मोजणी व्हावी
राज्यभरात महाविकास आघाडीकडून ईव्हीएम विरोधात मोहीम सुरू आहे. महायुतीच्या विजयात ईव्हीएमचा मोठा 'हात' असल्याच्या आशयाचे आरोपी मविआकडून केले जात आहे. मात्र दुसरीकडे कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील भाजपचे पराभूत उमेदवार प्रा. राम शिंदे यांनी ईव्हीएम पडताळणीची मागणी केली आहे. शिंदे यांनी मतदारसंघातील १७ बुथवरील पडताळणीची मागणी करीत त्यासाठीचे ८ लाख २ हजार ४०० रुपयांचे शुल्कही भरले आहे. भाजपच्याच उमेदवाराने अशी मागणी केली असल्याने ईव्हीएमसंदर्भात संभ्रम अजूनच वाढला आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.