संग्रहित छायाचित्र
नागपूर : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव झाला. त्यानंतर आता महाविकास आघाडीतील मित्र पक्षाने महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. विधिमंडळाचे अधिवेशन सुरु असून अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असणाऱ्या समाजवादी पक्षाने आघाडीतून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे.
शिवाजीनगर- मानखुर्द विधानसभा मतदारसंघाचे आमदार अबू असीम आझमी यांनी पत्रकारांशी बोलताना ही घोषणा केली आहे. तसेच यंदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव का झाला? यावरही अबू आझमी यांनी प्रकाश टाकला आहे. आझमी म्हणाले की, कोणत्याही प्रकारचा समन्वय महाविकास आघाडीमध्ये या निवडणुकीत पाहायला मिळाल नाही.
कोणत्याही निवडणुकीला आघाडी म्हणून सामोरे जात असताना एकवाक्यता गरजेची असते. कोणत्याही पक्षाचा नेता निवडणूक लढवत असेल तर त्याला आपला नेता- उमेदवार समजले गेले पाहिजे. पण कोणत्याही प्रकारचा समन्वय नव्हता. यंदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी पराभूत का झाली? यावर आझमी यांनी भाष्य केले आहे.
महाविकास आघाडीचे नेते एकमेकांच्या उमेदवारांच्या मंचावर प्रचारासाठी दिसले नाहीत. खूप कमी वेळा हे चित्र पाहायला मिळाले. जागा वाटपावेळी रस्सीखेच पाहायला मिळाली. याचमुळे महाविकास आघाडीचा पराभव झाला. अबू आझमी यांनी शिवसेनेच्या आणि विशेष करून उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.आझमी म्हणाले की, उद्धव ठाकरेंच्या भूमिकेबाबत सांशकता आहे.
विधानसभेची निवडणूक हारल्यानंतर ठाकरे सांगताहेत की, त्यांचा हिंदुत्वाचा मुद्दा कायम असेल. सगळ्या धर्माच्या लोकांना सोबत घेऊन चालण्याचा विचार उद्धव ठाकरे यांनी मांडला नाही. त्यामुळे आमचा त्या भूमिकेला विरोध आहे. आम्ही आघाडी सोडत आहोत, आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीने ठरवायचे आहे.
अबु आझमी यांनी घेतली आमदारकीची शपथ
विधानसभा निवडणुकीतील निकालावर महाविकास आघाडीकडून संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नवनिर्वाचित आमदारांनी आमदारकीची शपथ घेतली नाही. पण अबू आझमी यांनी मात्र विधानसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीत आता फूट पडली आहे. अबू आझमी आणि भिवंडी पूर्व मतदारसंघाचे आमदार रईस शेख हे महाविकास आघाडीतून बाहेर पडल्याने महाविकास आघाडीचे संख्याबळ २ ने कमी झाले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.