संग्रहित छायाचित्र
मुंबई : दोन दिवस नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी झाल्यानंतर सोमवारी (दि. ९) सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चिमटे आणि टोमणे ऐकायला मिळाले. विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांची निवड करण्यात आली आहे. त्यांची बिनविरोध निवड करताना अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. यावेळी जयंत पाटलांनी राहुल नार्वेकरांना चिमटे काढले. त्यासोबतच योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ, अशा शब्दांत अजित पवारांना अप्रत्यक्ष संकेतही दिले आहेत. त्यामुळे शरद पवार गटातील उर्वरित मोठे नेते अजित पवारांकडे जाय महायुतीचे हात बळकट करणार का याची आता उत्सुकता लागली आहे.
विधानसभेत जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील संवाद सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. भाषणादरम्यान जयंत पाटील यांनी सूचक वक्तव्य केल्याचे दिसून येत आहे. जयंत पाटील हे अजित पवारांसोबत जातील, अशा चर्चा लोकसभेपासून सुरू आहेत. दरम्यान पुन्हा एकदा या चर्चेला उधाण आले आहे. जयंत पाटील आपल्या भाषणादरम्यान म्हणाले की, अजितदादांचे माझ्या बोलण्यावर जास्त लक्ष असते. यावर उत्तर देताना अजित पवार म्हणाले, लक्ष असून उपयोग काय तुम्ही प्रतिसाद देत नाही. यावर प्रत्युत्तरादाखल पाटील म्हणाले, दादा, आपल्या पक्षाचे एक वाक्य आहे. योग्यवेळी योग्य निर्णय, असे आपले सूत्र आहे. जयंत पाटील यांच्या या सूचक विधानावर सभागृहात एकच हास्यकल्लोळ उडाला. जयंत पाटलांच्या या वक्तव्यामुळे नव्या चर्चेला उधाण आले आहे.
नार्वेकरांनाही काढले जयंत पाटलांनी चिमटे
अजित पवारांना दिलेल्या प्रत्युत्तरानंतर जयंत पाटलांनी राहुल नार्वेकरांचीही शाळा घेतली. राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष झाल्यानंतर विरोधी पक्षातल्या नेत्यांनीही चिमटे काढले आहेत. ते म्हणाले की, नार्वेकरांना मी खासगीत सांगायचो की पुढच्या वेळी मंत्री व्हा. मात्र विधानसभा अध्यक्षपदी असताना आमदार अपात्रतेबाबत नार्वेकरांनी असा निकाल दिला की सुप्रीम कोर्टालाही अजून विचार करावा लागतोय, असे म्हणत जयंत पाटलांनी चिमटा काढला.