संग्रहित छायाचित्र
मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ हा नेहमीच जळगाव जिल्ह्यातील राजकीय घडामोडींचे केंद्र राहिला आहे. राज्याचे माजी महसूलमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे एकेकाळचे प्रभावक्षेत्र अथवा खडसेंचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा हा मतदारसंघ यंदा राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध शिवसेनेच्या थेट लढाईसाठी चर्चेत राहिला. परंतु, या निवडणुकीत खडसे यांना आणि त्यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला. विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील यांनी खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांचा निर्णायक पराभव केला आहे.
मुक्ताईनगर मतदारसंघात एकनाथ खडसे आणि चंद्रकांत पाटील यांच्यातील संघर्ष हा नवीन नाही. खडसे यांच्या एकछत्री अमलाला आव्हान देत चंद्रकांत पाटील यांनी आपली ताकद सातत्याने वाढवली आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने खडसे यांना बाजूला ठेवत त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना उमेदवारी दिली. याच निवडणुकीत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी रोहिणी खडसे यांचा पराभव करत मोठा राजकीय अपसेट केला.
हा पराभव खडसे यांच्यासाठी निर्णायक ठरला. २०१९ च्या निवडणुकीनंतर खडसे यांचे भाजपमधील स्थान दुय्यम होत गेले. देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखालील भाजपने खडसे यांना बाजूला ठेवण्याचा निर्णय घेतला. याचा राग धरून खडसे यांनी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशानंतर खडसे यांना विधान परिषदेवर उमेदवारी देण्यात आली. मात्र, खडसे राष्ट्रवादी काँग्रेससोबत असले तरी अनेकदा भाजपप्रेम व्यक्त करताना दिसले. त्याच वेळी जळगाव जिल्ह्यात गिरीश महाजन आणि खडसे यांच्यातील संघर्ष वाढत गेला. दुसरीकडे, शिवसेनेच्या अंतर्गत बंडखोरीतून एकनाथ शिंदे यांनी मोठं आव्हान उभं केलं. चंद्रकांत पाटील यांनी शिंदे गटात प्रवेश केला आणि त्यांच्या पाठिशी संपूर्ण ताकद उभी राहिली. २०२२ मध्ये शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्या राजकीय प्रभावाला आणखी चालना मिळाली होती.
यंदाची मुक्ताईनगर विधानसभा निवडणूक ही खडसे कुटुंबासाठी अत्यंत महत्त्वाची होती. राष्ट्रवादीकडून रोहिणी खडसे तर शिंदे गटाकडून चंद्रकांत पाटील हे उमेदवार होते. शिवसेना आणि भाजपच्या युतीने चंद्रकांत पाटील यांना संपूर्ण पाठिंबा दिला. दुसरीकडे, रोहिणी खडसे यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले, परंतु स्थानिक पातळीवरील मतभेद, तसेच खडसे कुटुंबाचा प्रभाव कमी होत चालल्यामुळे त्यांना पुरेसे यश मिळाले नाही. एकनाथ खडसे यांनी राजकीय संन्यास जाहीर केला आहे, परंतु त्यांच्या राजकीय वारशाची जबाबदारी आता त्यांच्या मुली रोहिणी खडसे आणि सूनबाई रक्षा खडसे यांच्यावर आली आहे. रक्षा खडसे या रावेरच्या खासदार असून केंद्रात मंत्री आहेत. त्यामुळे खडसे कुटुंबात राजकीय वारसा पुढील पिढीकडे जात असल्याचे स्पष्ट होते.
मुक्ताईनगर मतदारसंघातील निकाल हा एकनाथ खडसे यांच्या राजकीय अस्तित्वाला धक्का देणारा ठरला आहे. त्यांची सत्ता आणि स्थानिक पातळीवरील पकड ढासळल्याचं यावरून स्पष्ट होतं. चंद्रकांत पाटील यांनी शिंदे गटाच्या पाठिंब्याने ही लढाई जिंकली असली, तरी यामध्ये भाजपच्या स्थानिक पातळीवरील रणनीतीचा मोठा वाटा आहे. राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा पराभव एक धडा आहे. खडसे कुटुंबाच्या आधारे मतदारसंघ जिंकण्याचा प्रयत्न अपुरा पडला. त्यामुळे पक्षाला नवीन नेतृत्व तयार करावे लागेल, अशी चर्चा आहे. मुक्ताईनगरचा हा निकाल महाराष्ट्राच्या राजकारणातील बदलत्या समीकरणांचे प्रतिबिंब आहे. एकनाथ खडसे यांचा एकेकाळचा बालेकिल्ला असलेला मतदारसंघ आता त्यांच्या हातून निसटल्याने खडसे कुटुंबाला नव्याने रणनीती आखावी लागेल. यापुढे या मतदारसंघातील राजकीय घडामोडी कशा रंगतील, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.