Ahmedpur Assembly Election 2024: निष्क्रिय उमेदवाराला ठेंगा

कधी भाजप तर कधी राष्ट्रवादी असा आलटून-पालटून कौल देणाऱ्या अहमदपूर मतदारसंघात यंदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) बाबासाहेब पाटील यांना सलग दुसऱ्यांदा विजय मिळवता आला आहे.

Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

कधी भाजप तर कधी राष्ट्रवादी असा आलटून-पालटून कौल देणाऱ्या अहमदपूर मतदारसंघात यंदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) बाबासाहेब पाटील यांना सलग दुसऱ्यांदा विजय मिळवता आला आहे. तसा या मतदारसंघात कुठलाही उमेदवार सलग विजयी झालेला नाही. ९६ हजार ९०५ मते घेत पाटील निवडून आले. त्यांच्याखालोखाल शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून मैदानात उतरलेल्या विनायकराव पाटील यांनी ६५ हजार २३६ मते घेतली. त्यानंतरची मते पडली (६२ हजार ४४७) भाजपचे बंडखोर आणि जन सुराज्य शक्ती पक्षाकडून थांबलेल्या गणेश हाके यांना. मतदारसंघात मतदानाची वाढलेली टक्केवारी ही लक्षणीय आहे.  

या तीन तगड्या उमेदवारांखेरीज इतर अनेक उमेदवार मैदानात होते. मुख्य लढत पहायला मिळाली ती या तीन उमेदवारांत. राष्ट्रवादीच्या विभाजनापूर्वी आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी असताना हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला गेलेला. त्यामुळे काँग्रेसमधून भाजपवासी झालेल्या विनायक पाटील यांनी विधानसभेच्या तोंडावर पक्ष बदलला आणि तुतारी हाती घेतली. मुस्लीम मतांची ध्रुवीकरण आणि महाविकास आघाडीकडून झालेला प्रचार या आधारावर विनायक पाटील यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवण्यात यश मिळवले. या मतदारसंघाचे विश्लेषण करताना यंदा तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या हाके यांना पडलेल्या मतांचाही विचार करावा लागतो. काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र असताना हा मतदारसंघ भाजपकडे असायचा. त्यामुळे या मतदारसंघात भाजपचाही मतदार आहे. किंबहुना दोन पाटील नको असणाराही मतदार या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात आहे. याचा दाखला दोन मराठा उमेदवार ( बाबासाहेब पाटील विरुद्ध विनायक पाटील ) मैदानात असतानाही विजयी झालेल्या भाजपच्या बब्रुवान खंदाडे यांनी एकदा दिलेला आहे. विशेष म्हणजे या मतदारसंघात भाजपकडे स्वतःचा असा विश्वासार्ह उमेदवार नाही. आमदारकीचे स्वप्न पाहणाऱ्या अनेकांची गर्दी स्थानिक भाजपमध्ये आहे. मात्र विजयापेक्षा स्थानिक पातळीवर तडजोडी करण्यात रस असणाऱ्या नेत्यामुळे भाजपला विधानसभेत या मतदारसंघातून विजयाची शाश्वती वाटत नाही, हेही वास्तव आहे.  

कायम दुष्काळी अथवा कोरडवाहू मतदारसंघ ही अहमदपूर मतदारसंघाची खरी ओळख आहे. नंतर अस्तित्त्वात आलेला चाकूर हा तालुकाही अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचाचा भाग. पण पिकपाण्याबाबत याही तालुक्याची अहमदपूरसारखीच गत राहिलेली आहे. ना कुठला औद्योगिक प्रकल्प ना सिंचनाची यंत्रणा,पावसाचा लहरीपणा पुरेपूर अनुभवणारे शेतकरी, शेतमजूर, श्रमिक-कष्टकऱ्यांचा हा परिसर. शैक्षणिक क्षेत्रात नावाजलेल्या 'लातूर पॅटर्न'ची खरी सुरुवात ज्या महात्मा गांधी महाविद्यालयात झाली, ते अहमदपूर गाव. हे धड खेडेही नाही अन धड शहरही नाही अशा तोंडवळ्याचे गाव आहे. अहमदपूर आणि चाकूर या दोन तालुक्यांचा हा मतदारसंघ. लातूरप्रमाणेच अहमदपूर मतदारसंघही सोयाबीन आणि तूर उत्पादक शेतकऱ्यांचा मतदारसंघ आहे. मात्र इतक्या वर्षांत स्थानिक लोकप्रतिनिधींना एखादा प्रक्रिया उद्योग काढावासा वाटलेला नाही. आधीच दुष्काळी तालुका त्यात उसासारखे पारंपरिक पीक घेऊन तालुक्याचा विकास होत नाही या वस्तुस्थितीकडे सगळ्यांचेच दुर्लक्ष झालेले आहे.

विधानसभेपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीने भाजप उमेदवाराच्या प्रचारात मनापासून सहभाग न घेतल्याचे दाखले असल्यामुळे हा मतदारसंघ भाजप स्वतःकडे घेईल, अशी अटकळ बांधली जात होती. मात्र भाजपने आघाडीधर्म पाळत हा मतदारसंघ राष्ट्रवादीला दिला. त्यामुळे निराश झालेल्या विनायक पाटील यांनी शरद पवारांकडून निवडणूक लढवली. तरीही पदरी अपयश आले. या अपयशामागे दोन कारणे असू शकतात. माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख यांच्या कार्यकाळात राज्यमंत्रीपदाची संधी मिळूनही विनायक पाटील या मतदारसंघासाठी काहीही भरीव कामगिरी करू शकले नाहीत. आमदार असतानाही मतदारांच्या आणि मतदारसंघाच्याही पदरी फारसे काही पडलेले नाही. याखेरीज जिकडे सत्ता त्या पक्षात प्रवेश करायचा ही त्यांची वाटचाल मतदारांना रुचलेली नाही. त्यांच्यासारखाच प्रकार शेजारच्या उदगीर विधानसभेतही पहायला मिळतो. भाजपमधून शरद पवारांकडे जाऊन निवडणूक लढवलेल्या सुधाकर भालेरावांनाही उदगीरच्या मतदारांनी नाकारले आहे.  

रोजगारनिर्मिती, स्थानिक पिकांना हमीभाव (सोयाबीन, तूर, हरभरा) आणि प्रक्रिया उद्योग सुरु करण्याची गरज असे काही मुद्दे मतदारसंघात प्राधान्याने विचारात घ्यायला हवेत. दुर्दैवाने आमदार बदलले वा आलटून-पालटून निवडून आले तरीही मतदारसंघात फारसे काही सकारात्मक घडलेले नाही, ही अहमदपूर-चाकूर मतदारसंघाची वस्तुस्थिती आहे. सलग दुसऱ्यांदा आणि एकूण तिसऱ्यांदा विधानसभेत पोहोचलेल्या बाबासाहेब पाटील यांच्यावर जनतेने पुन्हा एकदा विश्वास ठेवला आहे. लाडकी बहीण योजना, जनतेशी थेट संवाद, मतदारांना सहज उपलब्ध होणे या मुद्यांवर मतदारांनी बाबासाहे पाटील यांना पुन्हा संधी आली आहे. आता ते या संधीचे सोने करतात का हे येत्या काळात पहावे लागेल.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest