संग्रहित छायाचित्र
मुंबई : विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर महाविकास आघाडीतील उबाठा गटाने विरोधी पक्षनेतेपदासाठी तयारी सुरू केली होती. विरोधी पक्षनेतेपदासाठी आवश्यक असणारे १० टक्क्यांचे संख्याबळ एकाही पक्षाकडे सध्या नाही. हा निर्णय सर्वस्वी विधानसभा अध्यक्षांच्या विवेकाधीन अधिकारांवर अवलंबून आहे. मात्र आता या पदावर काँग्रेसने दावा केला असून काँग्रेस आणि उबाठामध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे.
विधानसभा निवडणुकीत तीनही पक्षांना अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही. महाविकास आघाडीतील तीनही पक्षांनी २८८ पैकी फक्त ४६ जागा जिंकल्या. विरोधी पक्षनेतेपदासाठी आवश्यक असणारे १० टक्क्यांचे संख्याबळ एकाही पक्षाकडे सध्या नाही. शिवसेना (ठाकरे) पक्षाला २०, काँग्रेस १६ आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाला फक्त १० जागा जिंकता आल्या. विरोधी पक्षनेतेपदासाठी २८८ पैकी १० टक्के म्हणजे २९ जागा असण्याची आवश्यकता आहे. मात्र पुरेसे संख्याबळ नसतानाही विरोधी पक्षनेतेपद दिले जाईल, अशी चर्चा असताना आता तीनही पक्षांची हे पद मिळविण्यासाठी स्पर्धा सुरू झाली आहे.
काँग्रेसने विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद आणि उपाध्यक्षपद मागितले आहे. याचा निर्णय आता विधानसभा अध्यक्षांना घ्यायचा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार काँग्रेसने विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले की, विरोधी पक्षनेतेपदाचा चेहरा कोण असणार, यावर अद्याप घटक पक्षांची चर्चा झालेली नाही. नाना पटोले यांनी याआधी अध्यक्षपद आणि विजय वडेट्टीवार यांनी विरोधी पक्षनेतेपद भूषवल्यामुळे त्यांच्या नावाचा या पदासाठी पुन्हा विचार करावा असे मते आहे, तर शिवसेनेने (ठाकरे) भास्कर जाधव यांना पक्षाचा गटनेता तर सुनील प्रभू यांना मुख्य प्रतोद म्हणून नेमले आहे. आदित्य ठाकरे यांच्यासाठी उबाठाने जोरदार तयारी केली आहे. शिवसेना (उबाठा) पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहून नियमही जाणून घेतले आहेत.
काय आहेत नियम?
विरोधी पक्षनेतेपदासाठी एकूण आमदारांच्या संख्येच्या तुलनेत १० टक्के संख्या आवश्यक असते. महाराष्ट्राच्या विधानसभेत एकूण २८८ आमदार आहेत. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदासाठी किमान २९ आमदार असणे आवश्यक आहे. पण, महाविकास आघाडीतल्या कोणत्याही पक्षाकडे एवढे संख्याबळ नाही. महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद द्यायचे की नाही हा सर्वस्वी अधिकार विधानसभा अध्यक्षांचा आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेत विरोधी पक्षनेतेपद देण्याची विनंती केली आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद ठाकरेंच्या शिवसेनेकडे आहे. त्यामुळे विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद आपल्याकडे राहावे, अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे. आता भाजपचे नेते महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद देणार का? त्यांनी हे पद देण्याचा निर्णय दिला तर महाविकास आघाडीकडून विरोधी पक्षनेता कोण होणार? हे पाहावे लागणार आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.