संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबरला लागल्यानंतर तेरा दिवसांच्या प्रतिक्षेनंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून गुरुवारी (५ डिसेंबर) शपथ घेतली. तसेच माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत आझाद मैदानावर अतिशय भव्यदिव्य स्वरुपात देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीचा कार्यक्रम आज पार पडला.
देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे २१ वे मुख्यमंत्री ठरले आहे. या शपथविधी सोहळ्याला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे स्वत: उपस्थित होते. त्यासोबतच भाजपाचे वरिष्ठ नेते, केंद्रीय मंत्री, विविध राज्यांचे मुख्यमंत्री, तसेच उद्योगपती, अभिनेते हे देखील शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आज महाराष्ट्रात पुन्हा एकदा ‘देवेंद्र’पर्वाला सुरुवात झाली आहे.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महा विकास आघाडी असा थेट सामना बघायला मिळाला. महायुतीला 288 पैकी तब्बल 230 जागांवर अभूतपूर्व यश मिळालं. एवढं मोठं यश आजपर्यंत महाराष्ट्रात कोणत्याही युती अथवा आघाडीला मिळालं नव्हतं. भाजपने १३२ जागांवर विजय मिळवला. त्यामुळे मुख्यमंत्री हा भाजपाचाच असेल हे निश्चित होते. मात्र युतीअंतर्गत राजकारणामुळे शपथविधीचा कार्यक्रम तब्बल तेरा दिवस रखडला. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मनधरणी करून आज देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
देवेंद्र फडणवीस यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ:
मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वरसाक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबाबत मी खरी श्रद्धा आणि निष्ठा बाळगेन. मी भारताची सार्वभौमता आणि एकात्मता उन्नत राखेन. मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक आणि सद्सद्विवेक बुद्धीने पार पाडेन आणि संविधान आणि कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निःपक्षपातीपणे तसेच कुणाविषयीही ममत्व भाव किंवा आकस न बाळगता न्याय्य वागणूक देईन.
मी, देवेंद्र सरीता गंगाधरराव फडणवीस ईश्वरसाक्ष शपथ घेतो की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी हे खेरीज करुन मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तिंना कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही.
अशी शपथ देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे.
एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपमुख्यमंत्रीपदी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी सहाव्यांदा राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.