संग्रहित छायाचित्र
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात मोडणाऱ्या साकोली विधानसभा मतदारसंघात (Sakoli Assembly constituency) यंदा महाविकास आघाडीचे उमेदवार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आणि महायुतीचे (भाजप) उमेदवार अविनाश ब्राह्मणकर यांच्यात सामना रंगला. या निवडणुकीत नाना पटोले यांचा विजय झाला. मात्र हा विजय पटोले यांच्यासाठी परभवाइतकाच नामुष्कीचा ठरला. पटोले यांना ९६ हजार ७९५ इतके मतदान झाले. तर प्रतिस्पर्धी ब्राह्मणकर यांना ९६ हजार ५८७ मते मिळाली. या लढतीत पटोले केवळ २०८ मतांनी निवडून आले.
२०२४ च्या लोकसभेत काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात १३ जागा जिंकल्या. सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष म्हणून काँग्रेस पुढे आला. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले होते. मात्र पुढे नाना पटोले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले. त्यांच्या नेतृत्वात पक्षाने २०२४ च्या लोकसभेत मोठे यश मिळवले. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसच्या यशाचा आलेख चढता असणार असे मानले जावू लागले. महाविकास आघाडीत काँग्रेस मोठा भाऊ बनला. मात्र विधानसभा येईपर्यंत मतदारांचा कल बदलला. महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेसह इतर कल्याणकारी योजना आणि भाजपाची ‘एक है तो सेफ है’ या घोषणा त्याला कारणीभूत ठरली. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला केवळ १६ जागांवर समाधान मानावे लागले. हा काँग्रेसचा पराभव प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या राजकीय कारकिर्दीतला मोठा गतिरोधक ठरला. जी अवस्था काँग्रेसची राज्यात झाली, तशीच अवस्था पटोले यांची त्यांच्या मतदारसंघात झाली.
साकोलीचे आमदार नाना पटोले (Nana Patole) यांनी आपल्या राजकीय प्रवासात अनेक महत्त्वाचे टप्पे गाठले आहेत. काँग्रेस पक्षातून त्यांनी भाजपात प्रवेश केला आणि २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या तिकीटावर निवडून आले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांचा पराभव केला. मात्र, केंद्रात ते जास्त काळ रमले नाहीत. शेतकऱ्यांचे प्रश्न आणि ओबीसींशी संबंधित मुद्द्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी मतभेद झाल्यामुळे त्यांनी २०१७ मध्ये खासदारकीचा राजीनामा देत भाजपाला रामराम ठोकला. यानंतर त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेऊन पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसने त्यांच्यावर विश्वास ठेवत त्यांना किसान काँग्रेसचे अध्यक्षपद दिले. २०१९ मध्ये महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली. परंतु या पदावरही त्यांनी जास्त काळ काम केले नाही आणि राजीनामा दिला. यानंतर २०१९ मध्ये त्यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली. त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुक, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तसेच लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला चांगले यश मिळाले. मात्र, विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला अपेक्षित यश मिळू शकले नाही.
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची (Congress) अवस्था अतिशय बिकट झाली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, धीरज देशमुख अशा दिग्गजांना या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. भाजपाच्या लाटेत काँग्रेस वाहून गेल्याचे दिसले. एकीकडे दिग्गज काँग्रेस नेते पराभूत होत असतानाच साकोली मतदारसंघात पटोले यांचा अगदीच निसटता विजय झाला. केवळ २०८ मतांनी हा विजय त्यांच्या पदरात पडला. खरं तर पटोले यांना पोस्टल मतांनी तारले. ईव्हीएमद्वारे पटोले यांना ९५ हजार २०२ तर ब्राह्मणकर यांना ९५ हजार ८६० इतके मतदान झाले. केवळ ईव्हीएमच्या मतमोजणीत ब्राह्मणकर हे ६५८ मतांनी आघाडीवर होते. मात्र पोस्टल मतांनी सामना फिरवला. पटोले यांना १ हजार ५९३ तर ब्राह्मणकर यांना ७२७ इतके पोस्टल मतदान झाले. त्यामुळे पटोले यांनी अंतिम मतमोजणीत २०८ मतांची आघाडी मिळवली. पोस्टल मतांनी पटोले यांच्या पदरात विजयाचे दान टाकले.
भाजप उमेदवार अविनाश ब्राह्मणकर (Avinash Brahmankar) यांनी पटोले यांच्या समोर तगडे आव्हान उभे केले होते. यामध्ये प्रफुल्ल पटेल यांची भूमिका महत्त्वाची ठरली. काँग्रेस पक्षाला विदर्भाने नेहमीच साथ दिली आहे. आताही पडझडीच्या काळात निवडून आलेल्या १६ आमदारांपैकी नऊ जागा विदर्भातील आहेत. लोकसभेत देखील विदर्भाने काँग्रेसला साथ दिली होती. काँग्रेसच्या लोकसभेतील विजयामुळे नाना पटोले यांचे कौतुक झाले होते. त्यांचे राजकीय वलय विस्तारत होते. तसेच मुख्यमंत्री पदाच्या दावेदारांमध्ये त्यांचे नाव घेतले जावू लागले. त्यामुळे त्यांच्या विरोधात महायुतीने तगडे आव्हान उभे केले होते. साकोली जिंकता आली नसली तरी पटोले यांच्या राजकीय वलयाला धक्का देण्यात भाजपाला यश आले. पटोले यांना आपल्या विजयाबद्दल खात्री होती. राज्याच्या राजकारणात वावरताना मतदारसंघाकडे त्यांचे दुर्लक्ष झाले होते. मतदारसंघात विकासाची कामे करण्यात ते कमी पडले. या गोष्टी भाजपाने हेरल्या आणि त्यांच्यापुढे मोठे आव्हान उभे केले. मात्र पोस्टल मतांनी पटोले यांना तारले. या पराभवामुळे नाना पटोले यांच्या कारकिर्दीचा आलेख खाली आल्याचे मानले जात आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.