संग्रहित छायाचित्र
मुंबई : महाविकास आघाडीचे आमदार, खासदार आमच्या संपर्कात आहेत. पक्षात राहून आम्हाला भवितव्य वाटत नसल्याची भावना काँग्रेसच्या आमदार, खासदारांनी माझ्याकडे व्यक्त केली आहे, असा गौप्यस्फोट भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. तर दुसरीकडे काँग्रेस आणि शिवसेनेने आपले लोकप्रतिनिधी आपल्याला सोडून जाणार नाहीत, यासाठी धडपड सुरु केली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात पुन्हा एकदा ऑपरेशन लोटस सुरु असल्याची चर्चा आहे.
महाविकास आघाडीतले आमदार, खासदार आम्हाला भेटतात. त्यांच्या वेदना मांडत असतात. काँग्रेसचे शीर्षस्थ नेते निवडून आलेल्या आमदार, खासदारांशी संपर्क करत नाहीत. महाविकास आघाडीला त्यांचे लोक सांभाळता येत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. आम्ही ऑपरेशन लोटस वगैरे राबवत नाही. त्याची गरजच नाही. शिवाय त्यांच्यातले लोक फुटल्यावर ते ईडी सीबीआयच्या नावे खापर फोडतात. आम्ही ईडी आणि सीबीआयकडे कधी गेलो नाही. तपास यंत्रणा त्यांचे काम करत असतात. महाविकास आघाडीचे अपयश हेच आहे की त्यांचे लोकप्रतिनिधी निराश आहेत. विकासकामांसाठी त्यांना पाठिंबा मिळत नाही. पक्ष म्हणून आधार मिळत नाही म्हणून ते अस्वस्थ आहेत. महाविकास आघाडीतल्या सगळ्याच पक्षांमध्ये अस्वस्थता आहे. आमच्याकडे कुणीही आले तर आमचा पक्ष स्वागतच करतो.
विकासासाठी भाजपसोबत येण्याची भावना
जेव्हा कोणी भाजपमध्ये येते किंवा जे अस्वस्थ प्रतिनिधी येणार आहेत त्यांना हे वाटते की विकसित भारताच्या संकल्पाला साथ द्यायची आहे. काही लोकांना विकासकामांना प्राधान्य द्यायचे आहे. त्यामुळे आमच्या संपर्कात काही खासदार आणि आमदार आहेत. काही जनप्रतिनिधी मोदींच्या नेतृत्वाला साथ देण्यासाठी आमच्याशी चर्चा करत आहेत. काही राज्याच्या राजकारणात येण्यासाठी इच्छुक आहेत. आम्ही आज काही फार बोलणार नाही, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
संदीप राऊत नाराज
संजय राऊत यांचे सख्खे भाऊ संदीप राऊत अर्थात अप्पा राऊत यांनी एक फेसबुक पोस्ट लिहिली होती. या फेसबुक पोस्टमध्ये उतावीळांनाच डोक्यावर घेतले जाते, असा उल्लेख होता. दरम्यान ही पोस्ट अवघ्या काही वेळातच डिलिट करण्यात आली. मात्र संदीप राऊत यांच्या पोस्टचा स्क्रिन शॉट सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यानंतर संदीप राऊत यांना स्पष्टीकरण द्यावे लागले आहे. ज्यामुळे संजय राऊत यांच्या घरात काही आलबेल नाही अशी चर्चा सुरु आहे.
आमचे खासदार आमच्यासोबतच
यावर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया देत चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा फेटाळून लावत आमचे सर्व खासदार आमच्या बरोबर असल्याचे म्हटले आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी काय म्हटले हे फार गांभीर्याने घेऊ नका. त्यावर मी प्रतिक्रिया देणार नाही. आमचे सर्व खासदार आमच्याबरोबर आहेत. ऑपरेशन लोटसच्या चर्चांवर आता कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही. महायुतीच्या सरकारची हालत काय आहे? हे या हिवाळी अधिवेशनात दिसेल, असेही नाना पटोले यांनी म्हटले आहे.
होय, महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस
यावर प्रतिक्रिया येताना संजय राऊत म्हणाले की, भारतीय जनता पक्ष असे ऑपरेशन करू शकतो. त्यांच्याकडे पैसा आहे. त्यांच्याकडे मोठी यंत्रणा आहे. दहशत निर्माण करून अशा प्रकारे माणसे ते फोडू शेतात. यापूर्वी एकनाथ शिंदे यांच्यासारखे किंवा अजित पवार यांच्यासारखे लोक का त्यांच्यासोबत गेले? ते देखील भीतीपोटीच भाजपसोबत गेले, ते काय ऑपरेशन लोटस नव्हते का? असा सवालही राऊत यांनी केला आहे.