संग्रहित छायाचित्र
लोकसभा निवडणुकीत महायुतीला विदर्भात मोठा फटका बसला होता. मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने योग्य नियोजन आणि रणनीती आखत विजयाचा राजकीय चमत्कार करून दाखवला. अमरावती जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. त्यामुळे या विधानसभा निवडणुकांमध्ये धक्कादायक निकाल समोर आले. तिवसा विधानसभा मतदारसंघातून २००९, २०१४ आणि २०१९ असे तीन वेळा निवडून आलेल्या काँग्रेसच्या उमेदवार माजी मंत्री यशोमती ठाकूर यांचा भाजपाच्या राजेश वानखेडे यांनी पराभव केला. ७ हजार ६१७ मतांच्या लीडने वानखेडे यांनी विजय मिळवला. त्यांना एकूण ९९ हजार ६६४ इतके मतदान झाले, तर ठाकूर यांना ९२ हजार ४७ मते मिळाली.
सलग तीनदा विजय मिळवून ठाकूर २०१९ च्या सरकारमध्ये मंत्री झाल्या होत्या. आपला वडिलोपार्जित तिवसा मतदारसंघ त्यांनी राहून ठेवला होता. भाजपाने त्यांना पराभूत करण्यासाठी वेगवेगळे प्रयोग केले होते. इतकेच नाही तर मोदी लाटेतही त्या विजयी झाल्या होत्या. मात्र यंदाच्या निवडणुकीत राजेश वानखेडे यांना उमेदवारी देऊन भाजपाने योग्य निर्णय घेतल्याचे दिसून आले. तिवसामध्ये वानखेडे आणि ठाकूर यांच्यात थेट लढत झाली. मूळचे शिवसैनिक असलेल्या राजेश वानखेडे यांनी काही वर्षांपूर्वी भाजपामध्ये प्रवेश केला होता. खरं तर होऊ घातलेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये आपण मंत्री होणार असे सांगून ठाकूर यांनी आपल्याला मतदान करण्याचे आवाहन केले होते. मात्र मतदारांनी त्यांना नाकारले. ठाकूर यांना 'अँटी इन्कबंसी'मुळे पराभव पत्करावा लागला असे बोलले जाते. तसेच मंत्रिपद हाती असताना त्या जिल्ह्याच्या पालकमंत्रीही होत्या. मात्र या काळात त्या जास्त वेळ मुंबईतच अडकून पडल्याचा फटका त्यांना बसल्याचे बोलले जाते.
तसेच, यशोमती ठाकूर यांचे काँग्रेस पक्षातील वजन वाढत होते. सलग तीन वेळा त्या मतदारसंघातून निवडून येत होत्या. कॅबिनेट मंत्रिपदी त्यांची वर्णी लागली होती. तसेच दिल्लीतही पक्षश्रेष्ठींसोबत त्यांचे चांगले संबंध होते. मात्र त्यामुळेच त्यांना पक्षांतर्गत स्पर्धेलाही तोंड द्यावे लागले. पुढील काळात काँग्रेसमधून त्या मुख्यमंत्रिपदाच्या दावेदार मानल्या जात होत्या. त्यामुळे मतदारसंघातील स्वपक्षीयांनी त्यांना प्रभावीपणे साथ दिली नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
राणांनी काढला पराभवाचा वचपा!
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर निवडून आलेल्या नवनीत राणा यांनी भाजपला पाठिंबा दिला. त्यामुळे काँग्रेससोबत त्यांचे खटके उडाले. यंदाच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राणा भाजपामध्ये दाखल झाल्या. त्यांना भाजपने तिकीट दिले. मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये बच्चू कडू आणि यशोमती ठाकूर यांना मंत्रिपदे मिळाली. जिल्ह्याच्या राजकारणात त्यांचे वजन वाढत होते. या गोष्टीमुळे राणा समर्थक अस्वस्थ होते. मधल्या काळात राणा आणि ठाकूर यांच्यामधील राजकीय वैर वाढत गेले. महाविकास आघाडीच्या नेत्यांवर राणा यांनी शाब्दिक हल्ले चढवले. हिंदुत्वाचा झेंडा हाती घेऊन त्यांनी राजकारण सुरू केले. मात्र दुसरीकडे त्यांचा जनाधार कमी झाल्याचे दिसले. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांच्या विरोधात त्यांचे सर्वच विरोधक एकवटले. बच्चू कडू यांनी प्रहार जनशक्ती पक्षाचा उमेदवार राणा यांच्या विरोधात उभा केला, तर राणा यांच्या मानलेल्या 'नणंदबाई' यशोमती ठाकूर यांनी राणा यांच्या विरोधात जोरदार प्रचार केला. तसेच शिवसेना शिंदे गटाचे नेते आनंदराव अडसूळदेखील राणा यांच्या विरोधात होते. या सगळ्यांमुळे राणा यांना लोकसभेत विजय मिळू शकला नाही. ठाकूर यांची महत्त्वाची भूमिका राहिली. लोकसभेतील हा पराभव राणा यांच्या जिव्हारी लागला. या पराभवाचा वचपा काढण्याची संधी त्यांना विधानसभेत मिळाली. निवडणुकीच्या प्रचारात त्यांनी यशोमती ठाकूर तसेच बच्चू कडू या आपल्या विरोधकांना घेरले. या दिग्गजांना पराभूत करण्यात मोठा वाटा राणा यांनी उचलला.
योगी आदित्यनाथ यांची सभा
उमेदवारांच्या प्रचारार्थ भाजपाकडून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभांचे आयोजन करण्यात आले. या सभांमधून टीका करताना त्यांनी महाविकास आघाडीचा उल्लेख 'महाअनाडी गठबंधन' असा केला. त्यांच्या सभांना तिवसा, मोर्शी, धामणगांव रेल्वे या मतदारसंघातील लोकांनी मोठी गर्दी केली होती. 'एक है तो सेफ है' असे म्हणत त्यांनी निवडणुकीच्या प्रचारात हिंदुत्वाचा मुद्दा केंद्रस्थानी आणण्याचा प्रयत्न केला. हिंदुत्वाचा मुद्दा निवडणुकीत किती प्रभावी ठरेल हा प्रश्न होताच. मात्र निकालानंतर महायुतीच्या लाडकी बहीण योजना आणि इतर कल्याणकारी योजनांबरोबरच हिंदुत्वाचा मुद्दादेखील प्रभावी ठरल्याचे चित्र या निवडणुकीत दिसले असे म्हणावे लागेल. योगी आदित्यनाथ यांच्या सभेचा फायदा अमरावतीत महायुतीच्या उमेदवारांना झाल्याचे बोलले जाते.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.