कल्याण लोकसभा: पॉवर सेंटरची हॅट्‌ट्रीक!

कल्याण लोकसभेची निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेची होती. येथून त्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे लोकसभेच्या हॅट्‌ट्रीकच्या मार्गावर होते. मुख्यमंत्र्यांच्या ठाण्याला लागून हा मतदारसंघ असल्याने येथील जय-पराजय त्यांच्या भविष्यातील पराभवाची दिशा ठरवणारा होता.

Kalyan Lok Sabha 2024

संग्रहित छायाचित्र

कल्याण लोकसभेची निवडणूक (Kalyan Lok Sabha 2024) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेची होती. येथून त्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे लोकसभेच्या हॅट्‌ट्रीकच्या मार्गावर होते. मुख्यमंत्र्यांच्या ठाण्याला लागून हा मतदारसंघ असल्याने येथील जय-पराजय त्यांच्या भविष्यातील पराभवाची दिशा ठरवणारा होता. मुख्यमंत्र्यांनी जमवलेली राजकीय गणिते, भाजपने मनापासून दिलेली साथ, मैदानातील नवखा उमेदवार यामुळे श्रीकांत तिसऱ्यांदा लोकसभेत पोहोचले. असे असले तरी २०१९ पासून श्रीकांत यांचे राजकीय वर्तन बदलू लागल्याची चर्चा होती.२०२२ मधील शिवसेनेतील बंडानंतरच्या काळात तर त्यांच्याकडे दुसरे पॉवर सेंटर म्हणून पाहिले गेले.  शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांच्या आसनावर बसलेल्या श्रीकांत यांचे छायाचित्रही प्रसिद्ध झाले होते. मंत्रालयातील महत्त्वाच्या कामांमध्ये त्यांचा हस्तक्षेप दिसतो. मुख्यमंत्र्यांना वेळ देता येत नसलेली अनेक महत्त्वाची कामे श्रीकांत शिंदे हाताळतात अशी चर्चा आहे. ठाणे जिल्ह्यावर एकनाथ शिंदेंचं वर्चस्व असल्यामुळे श्रीकांत जुन्या नेत्यांवर वर्चस्व गाजवतात असा आरोप काही जण करतात. त्यामुळे त्यांच्या मतदारसंघातील नेत्यांशी त्यांचे सतत खटके उडाले होते.      

कल्याणचे ‘कल्याण’
महाविकास आघाडीच्या काळात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे नगरविकास खाते असल्याने त्यातील बराच निधी कल्याण मतदारसंघात दिला. २०२२ मधील शिवसेनेतील बंडानंतर श्रीकांत शिंदे यांचं राजकारण बदललं. ते शिंदे सेनेतील दुसरे ‘पॉवर सेंटर’ बनले. पडद्यामागून सूत्रे हलवण्याची जबाबदारी पार पाडत शेकडो कोटींचा निधी कल्याणला दिला. हळूहळू राज्याच्या राजकारणात श्रीकांत शिंदे दिसू लागले. आदित्य ठाकरे यांच्यावर सतत हल्लाबोल करत असलेले श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) माध्यमांमध्ये झळकू लागले. बॉलिवूड, बड्या उद्योगपतींचे सोहळे, बैठकांत श्रीकांत आवर्जून हजेरी लावत होते. ‘पॉवर सेंटर’ च्या वागण्यातला फरक महायुतीतील नेत्यांनाही नाराज करत होता.

हा मतदारसंघ २००९ मध्ये अस्तित्वात आला तेव्हा राष्ट्रवादी विरुध्द शिवसेना अशी जोरदार लढत झाली. त्यावेळी राष्ट्रवादीचे वसंत डावखरे हरले आणि आनंद परांजपे खासदार झाले. त्यावेळी परांजपेंना २ लाख १२ हजार तर डावखरेंना १ लाख ८० हजार मते पडली होती. विशेष म्हणजे त्यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून लढतीत उतरलेल्या वैशाली दरेकर-राणे यांनी लाखांवर मते  मिळवली होती. २०१४ ला श्रीकांत शिंदे यांना शिवसेनेने निवडणुकीत उतरवले तेव्हा राष्ट्रवादीकडून आनंद परांजपे यांनी निवडणूक लढवली होती. यावेळी श्रीकांत यांची उमेदवारी जाहीर करताना उध्दव ठाकरे यांनी हे खराखुरा डॉक्टर असल्याचे विधान केले होते. उध्दव यांनी अप्रत्यक्षपणे नीलेश राणेंवर निशाणा साधला होता. २०१४ ला श्रीकांत यांना ४ लाख ४० हजार, परांजपे यांना १ लाख ९० हजार आणि मनसेचे प्रमोद पाटील यांना १ लाख २२ हजार मते पडली होती. २०१९ ला पुन्हा श्रीकांत यांना ५ लाख ५९ हजार, राष्ट्रवादीचे बाबाजी पाटील यांना २ लाख १५ हजार, तर वंचितचे संजय हेडाऊ यांना ६५ हजार मते पडली होती. २०२४ मध्ये श्रीकांत यांना ५ लाख ८९ हजार तर ठाकरे सेनेच्या वैशाली दरेकर यांना ३ लाख ८० हजार मते पडली. अडीच लाखांचे मताधिक्य नेहमी ठेवणाऱ्या श्रीकांत यांचे मताधिक्य २ लाख ९ हजारावर आले होते. २०१९ मध्ये साडे तीन लाख तर २०१४ मध्ये त्यांचे मताधिक्य अडीच लाख होते.

कल्याण मतदारसंघातील सध्याची राजकीय स्थिती पाहिली तर श्रीकांत शिंदे तशा भक्कम स्थितीत होते. दुसऱ्या बाजूला शिंदे शिवसेनेच्या वैशाली दरेकर यांना प्रतिकूल परिस्थितीत लढा द्यावा लागला होता. मुंब्रा कळवामधील शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा अपवाद केला तर मतदारसंघातील बाकीचे सर्व आमदार महायुतीतील होते. अंबरनाथमध्ये शिंदे शिवसेनेचे बालाजी  किणीकर, कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचे प्रमोद पाटील, उल्हासनगरमधील कुमार अलियानी, कल्याण पूर्वमधील गणपत गायकवाड, डोंबिवलीतील रवींद्र चव्हाण (तिघेही भाजप)  यांची सारी यंत्रणा आणि राजकीय ताकद श्रीकांत शिंदे यांच्या मागे होती. अशा खडतर स्थितीतही वैशाली दरेकर यांनी चार लाखांच्या आसपास मते मिळवत चांगली लढत दिली असे म्हणता येईल.

अपघाताने राजकारणात 
एका कार्यक्रमात बोलताना श्रीकांत शिंदे यांनीच  आपण राजकारणात अपघाताने आल्याचा उल्लेख करताना राजकारणात रस नव्हता याची कबुली दिली. २०१४ आमच्या पक्षाचे आनंद परांजपे इतरत्र गेल्यामुळे मला उमेदवारी दिल्याची माहिती दिली होती. श्रीकांत खासदार झाल्यानंतर उच्चशिक्षित, शांत आणि तरुण व्यक्तिमत्त्व  कल्याणला मिळाल्याचे कौतुक झालं. २०१४ नंतरच्या काळात ते दिल्लीत रुळू लागले. कल्याणकरांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या पत्री पूल, ठाणे-दिवा पाचवी, सहावी मार्गिका त्यांनी मार्गी लावली. २०१९ नंतर त्यांचे वागणे बदलल्याचा आरोप होऊ लागलेत. ठाणे जिल्ह्यावर एकनाथ शिंदेचं वर्चस्व असल्यामुळे श्रीकांत जुन्या नेत्यांवर वर्चस्व गाजवतात, असा आरोप काही जण करतात. खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार माजी आमदार सुभाष भोईर यांच्याशी उडालेल्या खटक्यातून श्रीकांत यांनी त्यांचं विधानसभेचं तिकीट कापले. मातोश्रीवरून दिलेला एबी फॉर्म परत घेतला. त्या जागी मनसेचे उमेदवार राजू पाटील यांना मदत करण्यात आली.

भाजपचा दावा 
कल्याणमधून तिसऱ्यांदा लोकसभा गाठणारे श्रीकांत शिंदे यांना भारतीय जनता पक्षाने संसदेत पोहोचवले खरे. शिंदे शिवसेनेचे प्रमुख आणि  श्रीकांत यांचे वडील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पक्षाची पहिली यादी जाहीर केली तेव्हा त्यांचे नाव त्यात नव्हते. भारतीय जनता पक्षाला येथून  निवडणूक लढवायची असल्याने उमेदवारीचे तळ्यात-मळ्यात सुरू होते. त्यातच भाजप विरुद्ध शिंदे सेना अशा छुप्या संघर्षाच्याही बातम्या येत होत्या. कल्याणने अनेक वेळा हिंदुत्ववादी पक्षाला निवडून दिले आहे. भाजपचे रामभाऊ म्हाळगी, जगन्नाथ पाटील, राम कापसे हे नेते येथून विजयी झाले आहेत. १९८४ मध्ये काँग्रेसचे शांताराम घोलप विजयी झाल्याचा अपवाद केला तर सेना, भाजपने आपली ताकद कायम राखली आहे. आजही कल्याणमध्ये भाजप आमदारांची संख्या जास्त असल्याने भाजप दावा करत होते. भाजप कार्यकर्ते, आमदार श्रीकांत यांच्याबबात उघड नाराजी व्यक्त करत होते. वर्षापूर्वी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दोन- तीन वेळा कल्याणचा दौरा केला होता. त्यामागचे कारण हेच होते. भाजपला मंत्री रवींद्र चव्हाण यांना येथून उभे करायचे होते. श्रीकांत यांच्यासमोर आव्हान असले तरी ‘मोदी को लाना है’ या निर्धाराने भाजपने केलेल्या कामामुळे श्रीकांत लोकसभेची हॅट्‌ट्रीक करण्यात यशस्वी झाले. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story