जुन्नर विधानसभा मतदारसंघ; जुन्ररमध्ये राष्ट्रवादी विरुध्द राष्ट्रवादी लढत

जुन्नर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना होणार आहे. अतुल बेनके हे येथील विद्यमान आमदार राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून निवडून आले आहेत.

जुन्नर विधानसभा मतदारसंघ; जुन्ररमध्ये राष्ट्रवादी विरुध्द राष्ट्रवादी लढत

जुन्नर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना होणार आहे.  अतुल बेनके हे येथील विद्यमान आमदार राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून निवडून आले आहेत. राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर आमदार अतुल बेनके यांनी अजित पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यानंतर झालेल्या लाेकसभेच्या निवडणुकीतील जुन्नरमधील मताधिक्याने त्यांची झाेप उडविली आहे.

 राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे खासदार डाॅ. अमाेल काेल्हे यांनी जुन्नरमधून 51, 393 मतांचे लीड मिळविले हाेते. अतुल बेनके यांनी अजित पवारांचा हात पकडल्याने शरद पवारांनी येथून आपला उमेदवार निश्चित केला आहे. गेल्या तीन महिन्यांत शरद पवारांनी जुन्नरमध्ये तीन वेळा भेटी दिल्या. सत्यशील शेरकर यांना ताकद देणे सुरू केले आहे. सत्यशील शेरकर हे विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष साेपान शेरकर यांचे पुत्र आहेत. त्यांचे आजाेबा निवृत्तीशेठ शेरकर हे खेड लाेकसभा मतदारसंघाचे खासदार हाेते. एका बाजुला शरद पवारांचा आशिर्वाद आणि दुसऱ्या बाजुला खासदार डाॅ. अमाेल काेल्हे यांची साथ या शेरकर यांच्यासाठी जमेच्या बाजू आहेत. डाॅ. काेल्हे यांचा हा तालुका असल्याने त्यांचीही प्रतिष्ठा येथे पणाला लागणार आहे. 

महाविकास आघाडीकडून शेरकर यांच्यासाेबतच मोहित चव्हाण, अनंतराव चौगुले, तुषार थोरात हे शरद पवार गटाकडून तर उध्दव ठाकरे गटाकडून माजी आमदार बाळासाहेब दांगट आणि माऊली खंडाळे इच्छुक आहेत. मात्र, शरद पवार आणि डाॅ. अमाेल काेल्हे यांच्या पसंदीचाच उमेदवार येथे असणार आहे हे निश्चित. 

महायुतीत मात्र उमेदवारीवरून चांगलीच रस्सीखेच हाेणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. महायुतीतील जागावाटपाच्या सुत्रानुसार विद्यमान आमदार म्हणून बेनके यांनाच संधी मिळणे अपेक्षित आहे. मात्र, शिवसेना शिंदे गटाकडून शरद साेनवणे तर भारतीय जनता पक्षाकडून आशा बुचके इच्छुक आहेत. शरद साेनवणे यांनी 2014 मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून लढत येथून विजय मिळविला हाेता. 2019 मध्ये त्यांनी मनसेतून शिवसेनेत प्रवेश केला. उमेदवारीही मिळविली. मात्र, त्यांचा पराभव झाला. आशा बुचके यांनी केलेली बंडखाेरी त्यांना चांगलीच भाेवली हाेती.  2019 मध्ये अतुल बेनके यांना ७४,९५८, शरद सोनवणे यांना ६५,८९०, तर आशाताई बुचके यांना ५००४१ मतं पडली होती. शिवसेनेच्या रणरागिणी म्हणून ओळख असलेल्या आशा बुचके गेल्या तीन निवडणुकांपासून लढत आहेत. गेल्या वेळी तर शिवसेनेतून बंडखाेरी करताना त्यांना भारतीय जनता पक्ष आणि देवेंद्र फडणवीस यांचा पाठिंबा हाेता अशी चर्चा हाेती. मात्र, तीनही वेळा त्यांचा पराभव झाला हाेता. सन 2009 व 2014 च्या विधानसभा निवडणुकीत अनुक्रमे वल्लभ बेनके व शरद साेनवणे यांच्याकडून त्या पराभूत झाल्या होत्या.

अजित पवार महायुतीत येण्यापूर्वी शरद साेनवणे यांच्यासाेबतच आशा बुचकेही उमेदवारीच्या प्रबळ दावेदार हाेत्या. मात्र, अजित पवार महायुतीत सामील झाल्याने सगळी समीकरणे बदलली आहेत. त्यामुळे या दाेघांपैकी एक किंवा दाेघेही बंडखाेरी करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दाेघांचीही मतदारसंघात सवत:ची मते आहेत. त्यामुळे त्यांची बंडखाेरी अतुल बेनके यांच्यासाठी अडचणीची ठरू शकते. महायुतीमध्ये सर्व काही आलबेल झाले तर बेनके आणि शेरकर यांच्यातच लढत हाेऊ शकते. म्हणजे राष्ट्रवादी विरुध्द राष्ट्रवादी हा सामना जुन्नर विधानसभा मतदारसंघात पाहायला मिळेल.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest