मतसंग्राम २०२४: कोण मारणार खडकवासल्यात बाजी?

बारामतीचा खासदार ठरवणारा विधानसभा मतदारसंघ असे विशेषण लाभलेला खडकवासला हा मतदारसंघ. गेल्या काही वर्षांपासून भाजपच्या अधिपत्याखाली असला तरीही राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद असणारा हा परंपरागत मतदारसंघ मानला जातो.

Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

ताईंनी केला दावा पण अनेक भाऊंचीही गर्दी, वाहतूक कोंडीसह नागरी समस्या ठरणार कळीचा मुद्दा

बारामतीचा खासदार ठरवणारा विधानसभा मतदारसंघ असे विशेषण लाभलेला खडकवासला हा मतदारसंघ. गेल्या काही वर्षांपासून भाजपच्या अधिपत्याखाली असला तरीही राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद असणारा हा परंपरागत मतदारसंघ मानला जातो. अजित पवार यांच्या निष्ठावंत रुपाली चाकणकर या मागच्या विधानसभेसाठीही या मतदारसंघातून उत्सुक होत्या. यंदा राष्ट्रवादीची दोन शकले पडली आहेत. मात्र तरीही दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमधून या मतदारसंघावर दावा सांगण्यात येत आहे. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि महायुतीतील राष्ट्रवादी अजित पवार या दोन्ही गटांकडून खडकवासला मतदारसंघावर दावा करण्यात येत आहे. महायुतीत हा मतदारसंघ सध्या भाजपच्या ताब्यात आहे. मात्र इतर एखाद्या (वडगाव शेरी) मतदारसंघाच्या बदल्यात भाजपने हा मतदारसंघ अजित पवार गटाला सोडला तर रुपाली चाकणकरांना इथे संधी मिळू शकते. तसे झाले नाही तर आहे त्याच उमेदवाराला चौथ्यांदा संधी द्यायची की नवा चेहरा मैदानात आणायचा याचा निर्णय भाजपकडून घेतला जाईल.            

खडकवासला विधानसभा मतदारसंघ हा पुणे जिल्ह्यातील मतदारसंघ आहे. या मतदारसंघात हवेली तालुक्यातील खेड शिवापूर, नऱ्हे, नांदेड, किरकटवाडी, खडकवासला गांव (वॉर्ड क्र. १४८), हवेली तालुक्यातील कोथरूड महसूल मंडळ, शिवणे गाव, उत्तमनगर, कोपरे गाव इत्यादींचा समावेश होतो. खडकवासला हा विधानसभा मतदारसंघ बारामती लोकसभा मतदारसंघात मोडतो. खडकवासला मतदारसंघ हा शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागात विभागलेला आहे. खडकवासला मतदारसंघाची भौगोलिक रचना पाहायला गेल्यास या मतदारसंघाचा ७० टक्के भाग हा शहरी असून ३० टक्के भाग हा ग्रामीण आहे. रस्ते, वीज, पाणी या स्थानिक पायाभूत गरजांसोबतच राष्ट्रीय स्तरावरील मुद्देही या मतदारसंघातील मतदारांच्या दृष्टीने कळीचे ठरू शकतात. कष्टकरी, श्रमिकांसोबतच उच्चभ्रू सोसायट्यातील मतदारांचे वास्तव्य असलेल्या या मतदारसंघात सर्वसमावेशक धोरणाचा विचार करणारा उमेदवार मतदारांना आकर्षित करू शकतो.      

संमिश्र तोंडवळा असलेल्या या मतदारसंघात वाहतूक कोंडी, खंडित वीज आणि पाणीपुरवठा अशा समस्या आहेत. श्रमिक, कष्टकरी, स्थलांतरित मध्यमवर्गीय नागरिकांसोबतच किमान वाहतूक कोंडीमुक्त रस्ते ही माफक अपेक्षा असणारा उच्च आर्थिक वर्ग वास्तव्यास असलेल्या या मतदारसंघाला त्यांच्या या समस्या सोडवणारा उमेदवार हवा आहे, हे निश्चित. मग तो कोणत्याही पक्षाचा वा गटाचा असला तरीही चालेल.

महायुतीकडून विद्यमान आमदार भीमराव तापकीर (भाजप) हे प्रबळ दावेदार आहेत. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून अनेक दावेदार आहेत. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर याही खडकवासला मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास उत्सुक आहेत. माजी विरोधी पक्षनेते दिलीप बराटे यांचे नाव चर्चेत आहे. २०१४ च्या निवडणुकीत तापकीर आणि बराटे यांच्यात लढत झाली होती. त्यावेळी तापकीर यांनी बराटे यांचा ६३ हजार २६ मतांनी पराभव केला होता. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाशी जवळीक असणारे दिवंगत आमदार रमेश वांजळे यांचे पुत्र मयूर वांजळे यांनीही या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे.  त्यांचे फलक संपूर्ण मतदारसंघात झळकत आहेत. मात्र, त्यांच्याकडून अद्याप कोणतीही भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसकडून (शरदचंद्र पवार) सचिन दोडके, बाळा धनकवडे, काका चव्हाण, माजी जिल्हा परिषद सदस्य नवनाथ पारगे यांनी मैदानात उतरण्याची तयारी दाखवली आहे.  

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून माजी तालुकाप्रमुख संदीप मते, विधानसभा प्रमुख नितीन वाघ, विभागप्रमुख महेश पोकळे यांनी तयारी दर्शवली आहे.  या मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रमेश कोंडे यांनी तयारी सुरू केली आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत कोंडे यांनी जोरदार तयारी केली होती. उमेदवारी देण्याचा आग्रहही धरला होता. मात्र त्यावेळी त्यांनी युतीधर्माचा विचार करत माघार घेतली होती. आताही कोंडे यांनी मतदारसंघात दांडगा संपर्क ठेवत आपली फळी मजबूत केली आहे. विविध लोकोपयोगी कामे करत जनतेच्या मनात स्थान निर्माण केले आहे. शिवसेना शिंदे गटाकडून त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्याचे सांगण्यात येत आहे. दहीहंडीच्या कार्यक्रमात राज्याचे मंत्री आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेसाठी शिंदे गटाचे रमेश कोंडे यांना शुभेच्छा दिल्याचे वृत्तही मागच्या काही दिवसांत विशेष चर्चिले गेले होते. चंद्रकांत पाटील यांच्यासारख्या भाजपच्या दिग्गज नेत्याने कोंडेंना विधानसभेसाठी 'गुड लक' दिल्यामुळे हा मतदारसंघ महायुतीत शिंदेंच्या शिवसेनेला सोडण्यात येईल आणि त्या बदल्यात एखादा मतदारसंघ मागून घेतला जाईल, अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.  भाजपकडून माजी उपमहापौर प्रसन्न जगताप यांनीही तयारी केली आहे. मात्र महायुतीत हा मतदारसंघ भाजपकडून अजित पवारांकडे गेल्यास चाकणकर किंवा बराटे या दोघांपैकी एकाला उमेदवारी महिन्याची शक्यता वर्तवली जात आहे, तर हा मतदारसंघ भाजपकडे गेल्यास तापकीर आणि इतर उत्सुकांचा क्रमांक लागणार अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.  

नवमतदार ठरणार निर्णायक
या मतदारसंघात भाजपबहुल मतदारांची संख्या जास्त आहे. त्याचा फायदा  भारतीय जनता पक्षाचे भीमराव धोंडिबा तापकीर यांना मागील तीन निवडणुकांमध्ये होत आला आहे. २०११ नंतर २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकांमध्ये ते विजयी झाले. आता चौथ्यांदा हा मतदारसंघ ताब्यात ठेवण्यासाठी त्यांनी तयारी केली आहे. २०१९ मध्ये खडकवासला विधानसभा मतदारसंघात एकूण ४,८७,१०२ मतदार होते. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार भीमराव (अण्णा) धोंडिबा तापकीर या जागेवरून विजयी होऊन आमदार झाले. त्यांना एकूण १,२०,५१८ मते मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सचिन शिवाजी दोडके १,१७,९२३ मतांसह दुसऱ्या स्थानावर होते. त्यांचा २५९५ मतांनी पराभव झाला. २०१४ मध्ये खडकवासला विधानसभा मतदारसंघात एकूण ४,२८,२३९ मतदार होते. या जागेवरून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार भीमराव धोंडिबा तापकीर विजयी होऊन आमदार झाले. त्यांना एकूण १,११,५३१ मते मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दिलीप प्रभाकर बराटे ४८,५०५ मतांसह दुसऱ्या स्थानावर होते.  त्यांचा ६३,०२६ मतांनी पराभव झाला. २००९ मध्ये खडकवासला विधानसभा मतदारसंघात एकूण ३,५६,१३७ मतदार होते. या जागेवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार रमेश हिरामण वांजळे विजयी झाले. त्यांना एकूण ७९,००६ मते मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विकास पंढरीनाथ दांगट ५६,४८८ मतांसह दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. आता पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यात लोकसभेच्या निवडणुकीत दोन राष्ट्रवादी काँग्रेसच्या लढतीत या मतदारसंघाने शरद पवार यांना कौल दिला आहे. त्यामुळे कदाचित या मतदारसंघात फेरबदल करण्यापेक्षा हा मतदारसंघ भाजपकडे राहू द्यावा, असा सूर भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी लावला आहे. याउलट भारतीय जनता पक्षाचे उमेदवार भीमराव धोंडिबा तापकीर यांच्याबद्दल नाराजीची भावना आहे. सलग तीन टर्म ते या मतदारसंघाचे नेतृत्व करत आहेत. त्यामुळे आता चौथ्यांदा त्यांना संधी देण्यापेक्षा नवा चेहऱ्याला संधी द्यावी, असा एक विचारप्रवाह भाजपमध्ये आहे. स्वतः तापकीर यांनीही याला दुजोरा दिलेला आहे. पक्षाने आदेश दिला तर पुन्हा खडकवासला मतदारसंघातील जनतेचा कौल मागायला जाईल अन्यथा पक्ष जो आदेश देईल, तो मान्य करून कामाला लागेल, असे त्यांनी स्पष्ट केलेले आहे. भाजपकडून दीपक नागपुरे, प्रसन्न जगताप, श्रीकांत जगताप यांच्यासह अनेक उमेदवार निवडणूक काढण्यास उत्सुक आहेत. मात्र  मतदारसंघाची रचना आणि मतदारांची मानसिकता लक्षात घेता हा मतदारसंघ अजित पवार (राष्ट्रवादी) गटाला देऊन त्या बदल्यात विजयाची खात्री असणारा एखादा मतदासंघ घ्यावा, असाही विचार भाजपकडून केला जाऊ शकतो. लोकसभा निवडणुकीतील सुप्रिया सुळे यांच्या विजयामुळे शरद पवार गटाचा आत्मविश्वास उंचावलेला आहे. खडकवासल्याचा पुढचा आमदार महाविकास आघाडीचाच असेल, असा दावा सुळे यांनी केलेलाच आहे. त्यामुळे त्या गटाकडून उत्सुक उमेदवारांनी तयारीही जोरदार केलेली आहे. या मतदारसंघात पुन्हा एकदा दोन राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच झुंज होण्याची शक्यता आहे. 

असा आला भाजपच्या ताब्यात
या मतदारसंघाची २००९ मध्ये निर्मिती झाल्यानंतर झालेल्या पहिल्या निवडणुकीत ‘सोनेरी आमदार’ अशी ख्याती झालेले दिवंगत आमदार रमेश वांजळे यांनी मनसेकडून निवडणूक लढवून विजय साकारला होता. मात्र, २०११ मध्ये त्यांचे अकाली निधन झाल्याने पोटनिवडणूक घेण्यात आली. तेव्हा भाजपने अगदी नवखे असलेले माजी नगरसेवक भीमराव तापकीर यांना उमेदवारी दिली. त्यांच्या विरोधात वांजळे यांच्या पत्नी हर्षदा वांजळे या होत्या. तापकीर यांनी अवघ्या ३,६२५ मतांनी वांजळे यांचा पराभव केल्याने हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आला.

भाजपचा परंपरागत मतदारसंघ - प्रसन्न जगताप
मागच्या वर्षभरापासून मी विधानसभा निवडणुकीसाठी जय्यत तयारी केलेली आहे. सर्वसामान्यांच्या नागरी समस्या सोडवण्यापासून ते पक्षाच्या बूथ पातळीवरील अडचणी सोडवण्यापर्यंतची तयारी केली आहे. मतदारसंघातील गणेश मंडळे, सार्वजनिक उत्सव समित्यांच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधलेला आहे. घरोघरी जात मतदारांच्या अडचणी लक्षात घेण्याचे काम सुरू आहे. वाढत्या नागरीकरणामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. हा प्रश्न प्राधान्याने सोडवण्यावर भर देणार आहे.  खडकवासला मतदारसंघासाठी इच्छुक असून मला या मतदारसंघातील प्रश्नांची जाण आहे. हा भाजपचा परंपरागत मतदारसंघ आहे. त्यामुळे महायुती असली इथे काही बदल होणार नाही. आता केवळ पक्षाकडून आदेश येण्याची वाट पाहतो आहोत.

- २०१९ भीमराव (आण्णा) धोंडिबा तापकीर भाजप १२०५१८

- २०१४ तापकीर भीमराव धोंडिबा भाजप १११५३१

- २००९ वांजळे रमेश हिरामण मनसे ७९००६

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest