संग्रहित छायाचित्र
चिंचवड विधानसभेसाठी निवडणुकीच्या आखाड्यात महायुतीत भाजप, राष्ट्रवादी (एपी) गटातून इच्छुकांची रांग लागली आहे, तर महाविकास आघाडीची उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांनी शरद पवार, उध्दव ठाकरे यांच्याकडे उंबरे झिजवण्यास सुरुवात केली आहे. सध्या तरी चिंचवडमध्ये जगताप, काटे, कलाटे यांच्या लढतीची चर्चा सुरू आहे.
चिंचवड विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात इच्छुकांची मांदियाळी आली असून महायुतीत भाजप, राष्ट्रवादीत सगळ्यांनीच दंड थोपटण्यास सुरुवात केली आहे. गावकी-भावकीत सगळेजण ईरेला पेटून ‘आता नाय तर कधीच नाय’ अशा स्थितीत रिंगणात तयारी करू लागल्याचे दिसून येत आहे. मात्र, चिंचवडमध्ये जगताप नकोच, अशी विरोधकांकडून खूणगाठ बांधली असून विरोधात उमेदवार कोण, यावरून त्यांच्यात एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आताचे वातावरण बघता शहरातील ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर हे या सर्वांसमोरच मोठे अव्हान उभे करणार असल्याचे चित्र दिसत आहे. राजकीय अनुभव, सामाजिक, कला, सांस्कृतिक क्षेत्रातील मोठे वलय, जगतापांबरोबरची मैत्री आणि वाद या सर्व गोष्टींच्या जोरावर भोईर यांनी चिंचवड विधानसभेसाठी दंड थोपटले आहेत. त्यामुळे चिंचवडमध्ये सर्वच पक्षांच्या उमेदवारीपासून निकालापर्यंत अनपेक्षित गोष्टी घडण्याची शक्यता आहे.
पुणे शहराला खेटून असलेल्या सांगवीपासून देहूरोडजवळील किवळे-मामुर्डी असा सुमारे २० किलोमीटर अंतराच्या परिसरात मतदारसंघाचे क्षेत्रफळ व्यापले आहे. त्यात श्रीमंत, मध्यम व सर्वसामान्य असा सर्वच वर्गातील नागरिकांचे वास्तव्य आहे. विशेषत: पवना नदीकाठावरील दाट वस्तीमुळे मतदारसंघात सर्वाधिक ५ लाख ६८ हजार ९५४ मतदार आहेत.
चिंचवड विधानसभा मतदारसंघात इच्छुकांकडून निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. त्यामुळे मतदारसंघात राजकीय रंग चढला असून प्रचाराच्या अगोदरच आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. भाजप, राष्ट्रवादी (एपी), शिवसेना (शिंदे गट) यांच्या महायुतीत भाजप आणि राष्ट्रवादीतून इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे. महायुतीची उमेदवारी न मिळाल्यास महाविकास आघाडीच्या संपर्कात आहेत. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (एपी) इच्छुकांच्या पदरी पडलेली निराशा यावर महायुती उमेदवारांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. इच्छुकांची नाराजी दूर करणे पक्षातील पक्षश्रेष्ठींपुढे मोठे आव्हान असणार आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदारांचे दीर व शहर भाजपचे अध्यक्ष शंकर जगताप यांनी मागील सहा महिन्यांपासून जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. तर विद्यमान आमदार अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) देखील पुन्हा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. मात्र, आमदार अश्विनी जगताप यांनी पुन्हा तिकीट मिळवण्यासाठी हालचाली केल्या नसल्या तरीही पक्षश्रेष्ठींचा आदेशाची वाट पाहून निर्णय घेण्याची तयारी ठेवली आहे.
दुसरीकडे भाजपमधूनच माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते, शत्रुघ्न काटे यांनी शंकर जगताप यांना शह देण्यास सुरुवात केली आहे. शंकर जगताप यांच्या उमेदवारीच्या मार्गात अडथळा आणून स्पीड ब्रेकर लावण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यांनीही पक्षाकडे आमदारकी लढवण्याची मागणी करत तयारी सुरू केली आहे.
गेली २२ वर्षे जगताप कुटुंबात आमदारकी देऊन आम्ही त्यांचे कार्यकर्ते म्हणून काम करणार नाही. त्यामुळे निवडून येण्याची क्षमता आहे, त्यांनाच उमेदवारी देण्याची मागणी भाजपमधूनही जोर धरू लागली आहे.
आमदार अश्विनी जगताप आणि दीर शंकर जगताप (Shankar Jagtap) यांच्यात एकमत झाल्याची चर्चा सुरू आहे. दोघांपैकी भाजपकडून दीर शंकर जगताप यांना उमेदवारी मिळाल्यास त्यांचा प्रचार अश्विनी जगताप करतील. असा पक्षात चर्चा सुरू आहे. तसेच शहर भाजप अध्यक्षपदाचे नेतृत्व मानायला काटे, नखाते तयार नाहीत. काही अस्वस्थ आत्म्यांना शांत करण्यात जगताप यांनी बऱ्यापैकी पॅचअप केले असले तरी खुलेआमपणे, छुप्या पद्धतीने त्यांच्या उमेदवारीला विरोध शेवटपर्यंत राहण्याची चिन्हे आहेत. भाजपमध्ये पक्षाचा आदेश प्रमाण मानला जात असल्याने शंकर जगताप निर्धास्त आहेत.
चिंचवडची जागा लढवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (एपी) गटात राष्ट्रवादीकडून ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे (Nana Kate), माजी स्थायी समिती अध्यक्ष प्रशांत शितोळे (Prashant Shitole), मोरेश्वर भोंडवे (Moreshwar Bhondwe), मयूर कलाटे (Mayur Kalate) हे इच्छुक आहेत. त्यात नाना काटे यांच्या उमेदवारीला त्याच्या पक्षातून विरोध दर्शविला जात आहे, तर चिंचवडची जागा राष्ट्रवादीला सोडण्यात यावी, अशी मागणी केली जात असून अजित पवारांकडे मागणी केली जात आहे. नेते आणि इच्छुकांमधील चर्चांची खलबते सुरू आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर लढवायची अशी गळ राष्ट्रवादीमधील इच्छुकांनी अजित पवार यांच्याकडे घातली आहे.
महाविकास आघाडीकडून सध्या इच्छुक असणारे राहुल कलाटे (Rahul Kalate) यांचा आमदार जगताप यांच्या विरोधात विधानसभा लढताना तीन वेळा पराभव झाला आहे, तर नाना काटे यांना दोन वेळा पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे या दोघांपेक्षा जगतापांना लढा देण्यात भोईर हे पर्याय ठरू शकतात. भोईर जगतापांच्या विरोधात असतील तेव्हा अजित पवार गट भोईरांचे काम करेल असे बोलले जाते.
२२ वर्षे जगताप कुटुंबीयांकडे आमदारकी दिली आता बदल हवा असा सूर भाजपमधील काही असंतुष्ट नगरसेवक आवळताना दिसत आहेत. त्यामुळे जगतापांना थेट फाईट देण्यासाठी त्यांच्या एवढ्याच ज्येष्ठ नेता उमेदवार म्हणून रिंगणात आवश्यक असल्याने भोईर हे थेट लढत देऊ शकतात.
महाविकास आघाडीकडून चिंचवड विधानसभेवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानेही दावा केलेला आहे. महायुतीतील इच्छुक हे राष्ट्रवादी (एसपी) आणि शिवसेना (उबाठा) कडे संपर्कात आहेत. जागा नेमकी कोणत्या पक्षाला सोडायची याबाबत महाविकास आघाडीमध्ये अजूनही एकमत होत नसल्याचे चित्र आहे. चिंचवडची जागा ‘मविआ’ एकत्र लढवणार असल्याचे नेत्यांनी जाहीर केले आहे. मात्र तीन पक्षांपैकी जागा कोणाला सोडायची याबाबत अद्याप एकमत झाले नाही.
२००४ पासून एकाच कुटुंबाची पकड
२००९मध्ये विधानसभा मतदारसंघाच्या झालेल्या पुनर्रचनेमध्ये पिंपरी-चिंचवड शहरात तीन विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आले. आमदार लक्ष्मण जगताप यांनी २००९ मध्ये अपक्ष आणि त्यानंतर २०१४, २०१९ मध्ये भाजपच्या तिकिटावर निवडणूक जिंकली. त्यानंतर आमदार लक्ष्मण जगताप यांच्या अकाली निधनानंतर २०२३ मध्ये त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांनी विजय मिळविला.
आतापर्यंत चार निवडणुका (एक पोटनिवडणूक) होऊन ‘जगताप’ यात या नावाचं वर्चस्व येथे कायम आहे. त्यामुळे विरोधी इच्छुकांची यंदा संख्या वाढण्यामागे हीच खंत आहे. विधान परिषद आमदार म्हणून २००४ पासून या शहरावर आमदार लक्ष्मण जगताप यांनी मजबूत पकड करून ठेवली होती.
चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे एक वर्षापूर्वी निधन झाले. या जागेवर पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. भाजपकडून जगताप यांच्या घरातच उमेदवारी देण्याचे निश्चित होते. तरी नेमकी उमदेवारी कोणाला मिळणार याबाबत उत्सुकता होती. लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप, बंधू शंकर जगताप यापैकी कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत मत-मतांतरे होती. अखेर भाजपच्या वरिष्ठांनी सुरू असलेल्या या सस्पेंसला ब्रेक देत पोटनिवडणुकीसाठी अश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आणि त्यांचा ३६ हजारांच्या मताधिक्याने विजय झाला.
माझं कुठं चुकलं; नाना काटेंची भावनिक साद
चिंचवड विधानसभेसाठी महायुतीत राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्याकडून निवडणुकीसाठी नाना काटेदेखील इच्छुक आहेत. महायुतीत त्यांना उमेदवारी न मिळाल्यास मविआ वाट धरून तुतारी फुंकणार असल्याची चर्चा सुरू आहे. महायुतीमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा समावेश झाल्याने हातातोंडचा घास तिसऱ्यांदा हुकतो की काय, या चिंतेने नाना काटे यांना ग्रासले आहे. कारण चिंचवडचा विद्यमान आमदार भाजपचा असल्याने महायुतीचे तिकीट भाजपलाच जाणार, हे निश्चित आहे. मागील वर्षी पोटनिवडणुकीत लाखभर मते घेतलेल्या नाना काटे यांनी आता जनतेच्या दरबारात पत्ररूपाने ‘माझं चुकलं तरी काय,’ अशी भावनिक साद घातली आहे.
राहुल कलाटे यांच ठरलं
चिंचवड विधानसभा निवडणूक कोणत्याही परिस्थिती लढविणार असल्याचे राहुल कलाटे यांनी जाहीर केले आहे. याकरिता महाविकास आघाडीतील शरद पवारांच्या गटातील आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्यांच्या ते संपर्कात असल्याची त्यांनी कबुली दिली आहे. कलाटेंनी तुतारी फुंकावी यासाठी खासदार अमोल कोल्हे आग्रही आहेत. मात्र, चिंचवड पोटनिवडणुकीत अजित पवारांनी केलेल्या खेळीचा अनुभव पाहता, पुन्हा तसाच दगाफटका होऊ नये. म्हणून कलाटे आस्ते कदम टाकताना दिसत आहेत. पोटनिवडणुकीची पुनरावृत्ती झालीच तर पुन्हा अपक्ष नशीब आजमावण्याची तयारी कलाटेंनी केली आहे.
आयात उमेदवार नको, मविआची भूमिका
महाविकास आघाडीच्या वतीने एकत्रित निवडणूक लढवावी मात्र, उमेदवार हा राष्ट्रवादी (शरद पवार गट) असावा. आयात उमेदवार घेऊन निवडणूक लढवू नये, अशी भूमिका राष्ट्रवादीमधील इच्छुकांनी घेतली आहे. दरम्यान, ‘मविआ’कडून नाना काटे, राहुल कलाटे यांनी निवडणूक लढविणार असल्याचे सांगितले आहे. पण, अद्याप याबाबत निर्णय झाला नसल्याचे राष्ट्रवादीमधील नेत्याने सांगितले.
चिंचवडच्या जागेवर मी १९९९ पासून दावा सांगितला होता. त्यानंतर दोन वेळा नगरसेवक झाल्यावर मला २००९ मध्ये विधानसभेची अधिकृत उमेदवारी देण्यात आली. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप हे तेव्हा विधान परिषदेचे प्रतिनिधी होते. त्यामुळे दोघांपैकी ज्याला उमेदवारी मिळेल त्याचा प्रचारप्रमुख म्हणून दुसऱ्याने काम करावे हे आमदार जगताप आणि माझ्यामध्ये ठरले होते. मात्र, जगताप यांनी अपक्ष निवडणूक लढवित माझा विश्वासघात केला. महत्त्वाचे म्हणजे त्यावेळी अनेकांनी त्यांना साथ दिली. त्यामुळे त्यानंतरच्या तीन निवडणुकांमध्ये मी लढलो नाही. परंतु, मी गेल्या ३० वर्षांत शहरात कला-साहित्य-सांकृतिक-राजकीय पटलावर केलेले काम मला निवडून येण्यास मदत करणार आहे. सर्व पक्षातील पदाधिकारी-कार्यकर्त्यांचे मला पाठबळ आहे.
- भाऊसाहेब भोईर, राष्ट्रवादी अजित पवार गट
महायुती म्हणून आम्ही मागील अडीच वर्षांपासून काम केले आहे. पोटनिवडणुकीत महायुती नसतानासुद्धा भाजपाला मतदारांनी मोठे मताधिक्य देत काम करण्याची संधी दिली. जगताप कुटुंबाकडे २२ वर्षे आमदारकी आहे म्हणून काही लोकांना पोटशूळ उठला आहे. मात्र, २२ वर्षे याच जनतेने आम्हाला निवडून दिले हे विरोधक विसरत आहेत. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप आणि विद्यमान आमदार अश्विनी जगताप यांनी केलेल्या कामाच्या जोरावर मला जनता पुन्हा चिंचवड मतदारसंघाचे काम करण्याची संधी नागरिक देतील, असा विश्वास आहे.
– शंकर जगताप, शहराध्यक्ष भाजपा