सोलापूर : आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. यामुळे सर्वच पक्ष जोरदार मोर्चेबांधणी करताना दिसत आहे. सध्या विविध मतदारसंघात अनेक इच्छुक उमेदवार पाहायला मिळत आहेत. सोलापूर शहर उत्तर मतदारसंघ हा भाजपचा गड मानला जातो. याच मतदारसंघातून भाजपचे विजयकुमार देशमुख हे सलग चार वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत, पण यंदा मात्र देशमुख यांच्यासमोर तगडे आव्हान उभे राहिले आहे. विशेष म्हणजे हे आव्हान विरोधकांचे नसून भाजपच्याच नेत्यांचे आहे. त्यामुळे विजयकुमार देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला आहे. गेली चार टर्म या मतदारसंघातून विजयकुमार देशमुख हे विजयी झाले आहेत. यंदा ते पुन्हा विधानसभेच्या रिंगणात उतरणार असल्याचे जवळपास निश्चित होते, पण आता विजयकुमार देशमुखांना भाजपच्याच पाच उमेदवारांनी चॅलेंज दिले आहे. नुकतेच सोलापुरात भाजप आमदार आणि माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या विरोधात पक्षातील पाच इच्छुक उमेदवारांचा मेळावा पार पडला.
त्यामुळे आमदार सुभाष देशमुख यांच्यानंतर आमदार विजयकुमार देशमुख यांच्या समर्थकांनी दंड थोपटल्याचे पाहायला मिळत आहे. सोलापूर शहर उत्तर भाजपचे विद्यमान आमदार आणि माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे. ऐन विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर विजयकुमार देशमुखांच्या विरोधात भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी विजयकुमार देशमुख यांच्या उमेदवारीला विरोध करण्यासाठी माजी महापौरांसह, सभागृह नेता आणि अनेक नगरसेवकांनी दंड थोपटले आहेत.
... तर आम्ही काम करणार नाही
विजयकुमार देशमुख यांच्याविरोधात लढण्यासाठी माजी महापौर शोभा बनशेट्टी आणि ज्येष्ठ कार्यकर्ते चन्नवीर चिट्टेसह शहर उत्तरमधून भाजपचे ५ जण इच्छुक आहेत. गेल्या २० वर्षांपासून विजयकुमार देशमुख हे सोलापूर शहर उत्तर मतदारसंघाचे नेतृत्व करत आहेत. मात्र यंदा सोलापूर शहर उत्तरमध्ये भाकरी फिरवून नेतृत्व बदल करण्याची पदाधिकारी-कार्यकर्त्यांची मागणी केली आहे.
जर सोलापूर शहर उत्तरमधून विजयकुमार देशमुख यांना उमेदवारी दिली तर आम्ही काम करणार नाही, असा इशारा भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दिला आहे. दरम्यान यंदा नेतृत्व बदल न केल्यास सोलापूर शहर उत्तरमधून भाजपचा उमेदवार निवडून येणे अवघड आहे, अशी शंकाही भाजपच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे यंदाच्या विधानसभेला आमदार विजयकुमार देशमुख यांची डोकेदुखी वाढल्याचे बोलले जात आहे.