‘फिडे चेस ऑलिम्पियाड २०२४’ मधील ऐतिहासिक कामगिरीकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष; महाराष्ट्र युवक कॉँग्रेसचा आरोप

भारतीय क्रीडा क्षेत्रात २०२४ साल अनेक उल्लेखनीय कामगिरींनी गाजत असतानाच ‘फिडे चेस ऑलिम्पियाड २०२४’ मध्ये भारतीय चेस संघाने ऐतिहासिक दुहेरी सुवर्णपदक विजय प्राप्त केला.

संग्रहित छायाचित्र

पुणे : भारतीय क्रीडा क्षेत्रात २०२४ साल अनेक उल्लेखनीय कामगिरींनी गाजत असतानाच ‘फिडे चेस ऑलिम्पियाड २०२४’ मध्ये भारतीय चेस संघाने ऐतिहासिक दुहेरी सुवर्णपदक विजय प्राप्त केला. मात्र, खेळाडूंच्या या कामगिरीकडे दुर्लक्ष करीत महाराष्ट्र सरकारने मौन राखले आहे. महाराष्ट्र सरकारने नुकताच ‘टी२० वर्ल्ड कप’ जिंकलेल्या भारतीय क्रिकेट संघातील महाराष्ट्रातील खेळाडूंचा भव्य सत्कार केला, त्यांना मोठ्या रोख बक्षिसांचे वितरण केले. मात्र, चेस खेळाडूंना मात्र कोणत्याही प्रकारचा सन्मान देण्यात आला नाही. राज्य शासनाची ही भूमिका खेळाडूंबाबत दुजाभाव राखणारी असल्याचा आरोप महाराष्ट्र युवक कॉँग्रेसचे माध्यम विभाग प्रमुख अक्षय जैन यांनी केला.

याविषयी जैन म्हणाले, फिडे चेस ऑलिम्पियाड २०२४ मध्ये सहभागी झालेल्या भारतीय चेस संघात महाराष्ट्राचे ४ खेळाडू होते. विदित गुजराथी आणि दिव्या देशमुख यांनी खेळाडू म्हणून सहभाग घेतला. तर, अभिजित कुंटे आणि संकल्प गुप्ता यांनी प्रशिक्षक आणि सहाय्यक प्रशिक्षक म्हणून संघाची धुरा सांभाळली. हा विजय विशेषतः ऐतिहासिक ठरला. या मोठ्या स्पर्धेत भारताने १०० वर्षांनंतर प्रथमच सुवर्णपदक जिंकले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेळाडूंच्या या यशाची नोंद घेतली आणि २५ सप्टेंबर २०२४ रोजी त्यांनी पुरुष आणि महिला संघाची वैयक्तिक भेट घेतली. त्यानंतर केंद्रीय क्रीडामंत्री आणि राज्य क्रीडामंत्री यांनी २६ सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथे खेळाडूंना प्रत्येकी २० लाख रुपयांच्या रोख बक्षिसांसह सन्मानित केले.

तामिळनाडू आणि तेलंगणा सरकारने आपल्या खेळाडूंच्या या कामगिरीचे तातडीने कौतुक केले. खेळाडू परतल्यानंतर, या राज्यातील खेळाडू आणि त्यांचे प्रशिक्षक यांना सार्वजनिक सत्कारासह खेळाडूंना प्रत्येकी २५ लाख रुपये आणि प्रशिक्षकांना १५ लाख रुपयांची रोख पारितोषिके दिली. या राज्यांनी विविध क्रीडा यशांचे जलदगतीने केलेले सन्मान, क्रीडाक्षेत्रातील सर्व कामगिरींना महत्त्व दिल्याचे दर्शवितात. मात्र, महाराष्ट्र सरकारने अद्याप आपल्याच राज्यातील खेळाडूंकडे लक्ष दिलेले नाही. या विजेत्या खेळाडूंना सन्मानित करून त्यांचा यशाचा योग्य सन्मान केला जावा अशी अपेक्षा असल्याचे जैन म्हणाले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest