संग्रहित छायाचित्र
प्रसिद्ध राजकीय सल्लागार प्रशांत किशोर यांनी अधिकृतरीत्या 'जनसुराज्य पक्षा'ची स्थापना केली. महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी बिहारच्या पाटणा येथे याबाबत घोषणा केली. मनोज भारती हे जनसुराज्य पक्षाचे पहिले कार्यकारी अध्यक्ष असतील. प्रशांत किशोर गेल्या काही काळापासून बिहारमध्ये पदयात्रा करत होते. या यात्रेच्या माध्यमातून त्यांनी बिहारमध्ये वातावरण निर्मिती केली आहे.
प्रशांत किशोर हे एक राजकीय रणनीतीकार आहेत. पीके या टोपण नावाने ते ओळखले जातात. एक राजकीय रणनीतीकार म्हणून त्यांनी भाजपा, भाजप , जेडी(यू) , आयएनसी , आप , वायएसआरसीपी , डीएमके आणि टीएमसी या पक्षांना निवडणुकीत मदत केली. आता ते स्वत: राजकारणात उतरले असून त्यांनी 'जनसुराज्य पक्ष' या नावाने राजकीय पक्षाची स्थापना केली आहे. मागील दोन वर्षे प्रशांत किशोर यांनी बिहार मध्ये जनसुराज्य यात्रा करत आहेत. त्यांनी दोन वर्षात बिहारमधील प्रत्येक शहर, गावापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. आता त्यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये नशीब आजमावण्याचं ठरवलं आहे.
पाटणा येथे एका भव्य रॅलीचं आयोजन करून प्रशांत किशोर यांनी अधिकृतरीत्या 'जनसुराज्य पक्षा'ची घोषणा केली. मनोज भारती हे पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष असतील अशी घोषणा पीके यांनी केली. मनोज भारती हे दलित समाजातून येतात. ते आयआयटी कानपूरचे माजी विद्यार्थी राहिले आहेत. तसेच आयएफएस अधिकारी म्हणून देखील त्यांनी म्यानमार, तुर्की, नेपाळ, नेदरलँड्स, इराण यांसारख्या अनेक देशांमध्ये भारताचे राजदूत म्हणूनही काम केले आहे.
प्रशांत किशोर यांनी यावेळी बिहारमध्ये जागतिक दर्जाची शिक्षण व्यवस्था तयार करायची असल्यास पाच लाख कोटी रुपये लागतील असं सांगितलं. दारूबंदी उठवून येणारा सर्व कर पूढील वीस वर्षे नव्या शिक्षण व्यवस्थेसाठी खर्च केला जाईल. दरवर्षी दारूबंदीमुळे २० हजार कोटी रुपयांचे नुकसान होत असल्याचं त्यांनी सांगितलं.