वडगाव शेरी मतदारसंघ: लोकसभेप्रमाणेच राज्यातील चित्र बदलू; शरद पवार यांचा विश्वास

पुणे: लोकसभा निवडणुकीत सगळ्या विरोधकांनी एकत्र येत ४८ पैकी ३१ जागा जिंकल्या. आता आम्ही लोकसभेप्रमाणेच विधानसभेलाही चित्रदेखील बदलणार आहोत, असा विश्वास राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी शुक्रवारी (दि. २७) वडगाव शेरी येथे झालेल्या झालेल्या सभेत व्यक्त केला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Avchite
  • Sat, 28 Sep 2024
  • 02:14 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

वडगाव शेरी मतदारसंघ: लोकसभेप्रमाणेच राज्यातील चित्र बदलू; शरद पवार यांचा विश्वास

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संविधान उद्ध्वस्त करायचे होते, या आरोपाचा पुनरुच्चार

पुणे: लोकसभा निवडणुकीत सगळ्या विरोधकांनी एकत्र येत ४८ पैकी ३१ जागा जिंकल्या. आता आम्ही लोकसभेप्रमाणेच विधानसभेलाही चित्रदेखील बदलणार आहोत, असा विश्वास राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी शुक्रवारी (दि. २७) वडगाव शेरी येथे झालेल्या झालेल्या सभेत व्यक्त केला.

महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक जवळ आली आहे. तीन महिन्यांपूर्वी लोकसभेची निवडणूक झाली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरात ४०० पेक्षा जास्त जागा घेणार म्हणून सांगत होते. लोकांना चिंता वाटली की पंतप्रधान मोदी यांना ४०० जागा कशासाठी हव्या आहेत? लोकं विकासासाठी मतं मागतात. परंतु, मोदींना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान उद्ध्वस्त करायचे होते. त्यामुळे माझ्यासारखा अस्वस्थ होतो. याच अस्वस्थतेने देशातील लोकांना एकत्र केले. लोकसभा निवडणुकीला विरोधकांनी एकत्रतपणे सामोरे जात ४८ पैकी ३१ जागा जिंकल्या. आता लोकसभेप्रमाणेच राज्यातील जनतेला वेगळे चित्र हवे आहे, असेही पवार यावेळी म्हणाले.

राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये नव्यानेच प्रवेश केलेले माजी आमदार बापू पठारे, सुरेंद्र पठारे आणि वडगाव शेरी मतदारसंघाच्या वतीने महानिर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी पवार बोलत होते. माजी खासदार वंदना चव्हाण, आमदार रोहित पवार, शहराध्यक्ष प्रशांत जगताप, माजी आमदार जयदेव गायकवाड यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

पवार म्हणाले, ‘‘राज्यातील लोकांना आता बदल हवा आहे. तो बदल आता महाराष्ट्राच्या निवडणुकीत हवा आहे. केंद्र सरकारने ठराव केला की संबंध देशाची निवडणूक एका वेळेला घेणार. उत्तर प्रदेश असो महाराष्ट्र असो अथवा कोणतेही राज्य असो एकावेळी निवडणूक घेणार. परंतु, काही दिवसांपूर्वी त्यांनी निवडणुकीची घोषणा केली. त्यात काश्मीर आणि महाराष्ट्राच्याविधानसभा निवडणुका वेगळ्यावेगळ्या घेण्याचे जाहीर केले. नंतर एक देश एक निवडणूक असा निर्णय घेतला. पंतप्रधान मोदी नेहमी वेगळे भूमिका घेत लोकांना फसविण्याचे राजकारण करत आहेत.’’

 भिगवण, रांजणगाव, जेजुरी, चाकण, बारामतीचा चेहरामोहरा कोणी बदलला, हे लोकांना माहिती आहे. तुम्ही लोकांनी सत्ता दिली म्हणून हा चेहरामोहरा बदलला. पुणे शहराची ओळख शिक्षणाचे माहेरघर, बजाज कंपनी, किर्लोस्कर कंपनी असलेले अशी ओळख होती. परंतु, आताच्या सत्ताधाऱ्यांनी पुण्याची ओळख कोयता गॅंग अशी केली आहे, असे सांगून पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.

आमदार सुनील टिंगरे यांच्यावर शरसंधान
‘‘तू कोणाच्या तिकिटावर निवडून आला?, तुझ्या पक्षाचा नेता कोण होता?, पक्षाची स्थापना कोणी केली? त्या पक्षाने तुला संधी दिली, तो पक्ष कोणी स्थापन केला होता, शरद पवार या नावाने मतं मागितली. आता तुझा काय बंदोबस्त करायचा ही जनता करेल,’’ असा इशारा देत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (अजित पवार)  आमदार सुनील टिंगरे यांच्यावर शद पवारांनी शरसंधान साधले.

 हा दिवट्या आमदार अपघातातील मृत्युमुखी पडलेल्या मुलांची मदत करायची सोडून पोलीस स्टेशनमध्ये जातो. आरोपीला मदत करतो, नशा करणाऱ्या आणि भरधाव गाडी चालवणाऱ्यांच्या पाठीशी उभा राहतो. त्यांच्या मदतीला जातो. त्याचा काय निकाल घ्यायचा, याचा विचार करा, असे आवाहन त्यांनी यावेळी जनतेला केले.  ‘लेक माझी लाडकी’ यात काही चुकीचे नाही. मुलगी लाडकी असते. जी मदत मिळते ती घ्या. परंतु, मुलींना संरक्षणाची गरज आहे. ते मुलींना संरक्षण देऊ शकत नाहीत. त्यांची हत्या थांबवू शकत नाहीत. मुलींचे संरक्षण करण्याची जबाबदारी राज्य सरकारला टाळता येणार नाही. जर ते करणार नसतील, तर त्यांना आपण जागा दाखवू, असा निर्धारदेखील यावेळी पवारांनी व्यक्त केला.

पुणे ही क्राईमची राजधानी झाली आहे : रोहित पवार
स्वाभिमानी लोक या भागात राहात आहेत. या देशात सर्वात जास्त गुंडागर्दी ही पुण्यात सुरू असल्याचे रिपोर्ट येत आहे. पुणे ही क्राईमची राजधानी झाली आहे. पुण्याचे काय करून ठेवले आहे. राजकारणाचा दर्जा इतका खालावला आहे की, रस्त्यावरून टॅंकरदेखील खड्ड्यात जाऊ लागले आहेत. तुंबलेले पुणे बघून पंतप्रधान नरेंद्र मोदी घाबरले. भाजपचे सर्वे आले आहेत, त्यांचे ६०- ६५ आमदार येतील. शिवसेनेला ३० ते ३५ आमदार येथील. तर गुलाबी गॅंग (अजित पवार) १० ते १२ जागी निवडून येईल. ते १२० च्या पुढे जाणार नाहीत. त्यामुळे पुढे जाऊन दबाव येईल. काही झाले तरी शरद पवार सोबत असल्याने आता घाबरण्याची गरज नाही. सत्ताधारी फक्त लाडक्या खुर्चीसाठी लढत आहेत. त्या तिघांना मुख्यमंत्री व्हायचे आहे. त्यांचा विकास झाला पण सामान्यांना काय मिळाले, असा सवाल यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केला.

वडगाव शेरी मतदारसंघ शहरातील इतर मतदारसंघांपेक्षा वेगळा आहे. मध्यमवर्गीय रहिवाशांसह उच्चभ्रू सोसायटीत राहणारे नागरिक या भागात राहतात. या भागाचा समतोल ठेवताना कसरत करावी लागते. आयटी हब म्हणून परिसराची ओळख आहे. १३ महिन्यांपूर्वी शरद पवारांना भेटण्याचा योग आला. त्यांनी मला शिक्षण विचारले. मी इंजिनिअर असल्याचे सांगितले. मग त्यांनी येथे काय करतोस, असा प्रश्न विचारला. एवढे शिक्षण असताना या भानगडीत का पडतो. परदेशात जा, व्यवसाय वाढव असे सांगितले. मी उत्तर देताना गडबडलो. त्यानंतर त्यांनीच व्यवसाय करतो का, असे विचारले. राजकारण, समाजकारण हे आमच्या डीएनएमध्ये आहे. त्यामुळे गावाचा कायापालट होताना जन्मापासून पाहिला आहे. माझे आजोबा खराडी गावचे २५ वर्षे सरपंच होते. त्यानंतर वडील बापू पठारे यांनी राजकीय वारसा पुढे नेला. त्यामुळे राजकारणापासून दूर जाता येत नाही, असे सांगितले. त्यानंतरही त्यांनी या भानगडीत पडू नको असे सांगितले. मात्र एक वर्षानंतर त्यांनीच मला संधी दिली. पवारांच्या विचारांवर पाऊल ठेवत वाटचाल करण्याचे ठरविले आहे.
-  सुरेंद्र पठारे, युवा नेते, राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरद पवार गट)

वडगाव शेरी मतदारसंघात मी आमदार असताना १,४०० कोटी रुपयांची विकास कामे केली आहेत. लष्कर ते वडगाव शेरी अशी पाण्याची पाईप लाईन आणली.  भामा आसखेड धरणाचे काम पूर्ण केले. मतदारसंघासाठी भरपूर निधी आणला. विकास कामे होत होती, परंतु गेल्या दहा वर्षांत संधी मिळाली नसल्याचे अनेक कामे रखडली. लोहगावात १०० बेडचे रुग्णालयाचे काम गेल्या १० वर्षांपासून रखडले आहे. तरुणांना रोजगार मिळावा यासाठी आयटीआयची संस्था सुरू करण्यासाठी जागा ताब्यात घेतली पण काम झाले नाही. त्यामुळे अनेक तरुणांना रोजगार मिळत नाही. मतदारसंघाचा कायापालट करण्याचे काम हाती घेतले होते. ते काम पुढे चालू ठेवायचे आहे.  या मतदारसंघात तुतारी वाजवण्यासाठी जनतेचा आशीर्वाद आणि साथ पाठीशी आहे.
- बापू पठारे, माजी आमदार, वडगाव शेरी मतदारसंघ  

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest