मतसंग्राम २०२४: कोथरूडमध्ये बंडखोरीची भाजपला चिंता

कोथरूड हा पुण्यातील महत्त्वाचा आणि प्रतिष्ठेचा विधानसभा मतदारसंघ आहे. याच मतदारसंघात केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी आणि राज्य भारतीय जनता पक्षाचे वजनदार नेते आणि उच्चतंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील येथे वास्तव्यास आहेत.

Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

उच्च तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या बरोबरीने भाजपमधून अमोल बालवडकर यांचा उमेदवारीवर दावा, महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे पृथ्वीराज सुतार यांच्या नावाची चर्चा

कोथरूड हा पुण्यातील महत्त्वाचा आणि प्रतिष्ठेचा विधानसभा मतदारसंघ आहे. याच मतदारसंघात केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी आणि राज्य भारतीय जनता पक्षाचे वजनदार नेते आणि उच्चतंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील येथे वास्तव्यास आहेत. भाजपचे वजनदार नेते येथे वास्तव्यास असून येथील सुशिक्षित मतदार हा भारतीय जनता पक्षाला मानणारा असल्याने वातावरण अनुकूल आहे. भाजपमधूनच होणारी उमेदवार बदलाची मागणी आणि एकत्रित विरोधकांच्या आव्हानासमोर या बालेकिल्ल्यातच अग्निपरीक्षेला सामोरे जावे लागत आहे. सध्याचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात भाजपचे माजी नगरसेवक अमोल बालवडकर उभे टाकल्याचे चित्र आहे. महाविकास आघाडीकडून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पृथ्वीराज सुतार यांच्या नावाची चर्चा आहे. 

मात्र, गेल्या काही वर्षांत कोथरूडच्या राजकीय रचनेत काही बदल होत असल्याचे दिसत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्ष आपले वर्चस्व वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याने कोथरूड पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले आहे.

२०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीवेळी कोथरूडमध्ये भारतीय जनता  पक्षाने राज्याच्या राजकारणातील वजनदार नेते चंद्रकांत पाटील यांना येथून उमेदवारी दिली. त्यांच्या विरोधात त्यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे किशोर शिंदे उभे होते. त्यावेळी भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी असलेले चंद्रकांत पाटील यांनी निर्णायक विजय मिळवताना २५ हजार मतांची आघाडी घेतली होती. नागरी भागातील आपली मतदारांची पेढी अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने भाजपने चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिली होती. कोथरूड हा भाजपचा बालेकिल्ला असल्याचे पुन्हा अधोरेखित करणे हाही यामागे उद्देश होता. २०१९ पूर्वी या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व भाजपच्या मेधा कुलकर्णी यांनी केले होते. त्यांनी २०१४ मध्ये  विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला होता. त्यांच्या कारकिर्दीत मतदारसंघातील मूलभूत विकासकामांना प्रामुख्याने नागरी सुविधांच्या कामात प्रगती झाली होती. त्यामुळे मतदारसंघातील मध्यमवर्गीय मतदार भाजपच्या बाजूने झुकलेला होता. २०१९ मध्ये मेधाताईंना वगळून पाटील यांना उमेदवारी देण्याच्या निर्णयाने मतदारांतील काही वर्ग आणि स्थानिक कार्यकर्त्यांत मोठा असंतोष निर्माण झाला होता.

सद्याचे चित्र
२०२४ च्या विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसतसे या मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलत आहेत. कोथरूड मतदारसंघाचे विधानसभेतील प्रतिनिधी आणि राज्याच्या राजकारणातील पाटील यांच्या भूमिकेची विधानसभा मतदानावेळी कसोटी लागणार आहे. पाटील आजही मतदारसंघातील प्रबळ उमेदवार असले तरी यावेळी पक्षाने नवा चेहरा द्यावा अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. खरे पाहायला गेले तर मतदारसंघाशी अधिक नाते असलेले अमोल बालवडकर यांनी येथून निवडणूक लढवण्याची इच्छा  बोलून दाखवली आहे. बालवडकर भाजपचे बाणेर-बालेवाडी भागातील माजी नगरसेवक असून शहर सुधारणा समितीचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले आहे. गेल्या काही दिवसांत संभाव्य उमेदवार किंवा प्रबळ दावेदार म्हणून त्यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.  

 बालवडकर इच्छुक असले तरी सध्या ते आपले पत्ते खुले करण्याच्या स्थितीत नाहीत. आपल्या उमेदवारीबाबत पक्ष निर्णय घेईल असे सांगताना मतदारसंघातील अनेक गृहनिर्माण संस्था आणि तेथील रहिवाशांची मी निवडणूक लढवावी अशी सूचना आहे. आता मी माझ्या सामाजिक कार्याचा पाया वाढवावा असे त्यांचे मत आहे. पक्षाचा एक छोटा कार्यकर्ता आणि या भागाचा नगरसेवक म्हणून मी निष्ठेने काम केले असल्याने पक्ष माझ्या उमेदवारीचा नक्कीच विचार करेल. सध्या मी कोणत्याही पक्षाच्या संपर्कात नाही, तसेच मी उमेदवारी दाखल करावी यासाठी कोणताही पक्ष माझ्या संपर्कात नाही. राजकारणात कोणत्याही  गोष्टीची शक्यता किंवा पर्याय नाकारता येत नाहीत. सध्या तर मी एवढेच म्हणेन की कोथरूडमधून विधानसभा लढविण्याचा माझा निर्णय ठाम आहे.

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची शिवसेनेने भाजपमधील हा असंतोष हेरला असून त्याचा फायदा उठविण्याच्या दृष्टिकोनातून ते महाराष्ट्र विकास आघाडीतर्फे पृथ्वीराज सुतार यांची उमेदवारी जाहीर करण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या दृष्टिकोनातून प्रबळ उमेदवाराची निवड करणे हा महत्त्वाचा मुद्दा आहे. उमेदवार स्थानिक असावा, लोकप्रिय असावा आणि त्याला भारतीय जनता पक्षाचे मतदार, कार्यकर्त्यांतील असंतोषाचा फायदा घेता यावा, हे महत्त्वाचे आहे. पाटील यांच्या तगड्या उमेदवारीसमोर तो प्रबळ, विश्वासार्ह पर्याय असल्याचे मतदारांना पटणेही आवश्यक आहे.  

पृथ्वीराज सुतार म्हणतात, राज्य आणि शहराची जी स्थिती आहे ती पाहता राज्यातील महायुती आणि मतदारसंघातील भारतीय जनता  पक्षाच्या विरोधात मतदारांच्या भावना आहेत. भाजपने केवळ घोषणा करण्याचा धडाका लावला असला तरी जाहीर प्रकल्प पूर्ण करण्यात ते अपयशी ठरले आहेत. शहरातील मेट्रो असो, समान पाणी वाटप, एसटीपी अशा काही मोजक्या प्रकल्पांकडे  नजर टाकली तरी कोथरूडकर भाजपला पुन्हा संधी देण्याची अजिबात शक्यता नाही. पुण्यातच नव्हे तर राज्यातही महायुतीला दणका बसणार असून पुढील मुख्यमंत्री महाविकास आघाडीचा असणार यात शंका नाही.  

शिवसेनेतर्फे निवडून आलेले माजी आमदार चंद्रकांत मोकाटेही इच्छुक असून त्यांच्या उमेदवारीचाही विचार शिवसेना करू शकते. मात्र, खात्रीशीर  गोटातून मिळालेल्या माहितीनुसार बालवडकर यांना भाजपने उमेदवारी नाकारली तर उद्धव ठाकरे गटाची शिवसेना बालवडकरांना उमेदवारी देऊ शकते. बालवडकर यांनी कोणत्याही स्थितीत निवडणूक लढविण्याचा निर्धार केला असल्याने कोथरूडमध्ये ते शिवसेनेतर्फे निवडणूक मैदानात उतरले तर आश्चर्य वाटून घेण्याची गरज नाही. गेल्या दशकात बालवडकर यांनी केलेल्या कामांमुळे त्यांच्या भागातील सोसायट्यांमधील  मतदारांचा त्यांना मजबूत पाठिंबा मिळू शकतो. त्यामुळे चंद्रकांत पाटील आणि बालवडकर यांच्यातील भाजप-शिवसेना निवडणूक चुरशीची होऊ शकते.    

भाजपसमोरील आव्हाने आणि धोरण- चंद्रकांत पाटील यांनाच मैदानात उतरवायचे की नवा, वेगळा उमेदवार द्यावयाचा हा पक्षाच्या दृष्टीने महत्त्वाचा मुद्दा असेल. पाटील यांना पुन्हा उमेदवारी दिली तर त्यांची कामगिरी आणि मतदारांतील प्रतिमा अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावेल. पक्षाने नवा उमेदवार देण्याचा निर्णय घेतला तर पाटील आणि मेधा कुलकर्णी गटांशी समन्वय साधण्याचे आणि त्यांचे सहकार्य मिळवण्याचे आव्हान त्याच्यासमोर असेल.

विरोधकांसमोरील आव्हान- मतदारसंघातील भाजप विरोधातील मतदारांना एकत्रित आणण्याचे मोठे आव्हान महाविकास आघाडीच्या उमेदवारासमोर असेल. कोथरूडचा राजकीय नकाशा पाहिला तर उमेदवार हा चांगली शैक्षणिक, व्यावसायिक पार्श्वभूमी असणारा, नागरी मतदारांशी सहजपणे नाते जोडणारा असणे गरजेचे आहे. सार्वजनिक सेवा, रोजगार, मूलभूत सुविधांबाबत त्याला मतदारांशी संवाद साधता यावयास हवा. या मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ठराविक ताकद असल्याने त्यांचा उमेदवार निकालाचे समीकरण बदलवू शकतो. मनसेचा उमेदवार निवडून येणार नसला तरी तो भाजपबाबत नाराजी असलेल्या मतदारांची मते वळवू शकतो. मुख्य पक्षांना पर्याय शोधणाऱ्या मतदारांची मते या पक्षाच्या उमेदवारांकडे येऊ शकतात.  

मतदारसंघातील समस्या
नगर विकास- कोथरूड मतदारसंघाचे अत्यंत वेगाने नागरीकरण झाल्याने वाहतूक कोंडी, पाणी व्यवस्थापन, सार्वजनिक सुविधा  हे प्रश्न सोडविण्याचे मोठे आव्हान येथे आहे. या प्रश्नांची सोडवणूक करण्याबाबत काय विचार आहेत, याच्या आधारे उमेदवाराची निवड मतदार करू शकतात.  सार्वजनिक सेवा आणि नागरी सुविधा - मतदारसंघात मध्यमवर्गीय मतदार मोठ्या प्रमाणात वाढल्याने त्यांच्या विविध प्रामुख्याने वैद्यकीय सेवा, शिक्षण आणि सार्वजनिक वाहतूक सेवेबाबतच्या अपेक्षा मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. या प्रश्नांवर केवळ काल्पनिक किंवा आश्वासनात्मक तोडगा देणाऱ्या उमेदवारांपेक्षा जो उमेदवार कायमस्वरूपी तोडगा काढू शकेल त्याला पाठिंबा देतील.  

स्थानिक नेतृत्व आणि संपर्क- मतदार आणि मतदारसंघातील प्रश्नांची चांगली जाण असणाऱ्या उमेदवाराला प्रथम पसंती मिळेल. या मतदारसंघातील मतदार व्यापक राजकीय विचारसरणीला प्राधान्य देणारा आहे. तसेच आपला उमेदवार मतदारसंघ आणि समस्या सोडविण्यास प्राधान्य देणारा असावा याबद्दल  मतदार जागरूक असल्याचे दिसते.    येत्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील मतदारांचे लक्ष कोथरूडकडे लागून राहिलेले असेल. बालेकिल्ला असला तरी पक्षातून आणि पक्षाबाहेरून भाजपला मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. निवडणूक निकालात मतदारसंघातील राजकीय चित्राचे जसे स्पष्ट दर्शन होणार आहे, त्याचप्रमाणे पुणे आणि महाराष्ट्राचा राजकीय मूड काय आहे हेही दिसून येणार आहे.

२०१९चा निकाल
चंद्रकांत पाटील (भाजप)  - मते - १ लाख ५ हजार २४६
किशोर शिंदे (मनसे)  - मते-७९ हजार ७५१
नोटा (यापैकी कोणी नाही) - मते-४ हजार २८ मते
आघाडी-२५ हजार ४९५
एकूण मतदान-१ लाख ९५ हजार १५८

मतदारसंघाचे चित्र 
२०१९-चंद्रकांत पाटील (भाजप)
२०१४-मेधा कुलकर्णी  (भाजप)
२००९-चंद्रकांत मोकाटे (शिवसेना)

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest