हर्षवर्धन पाटलांची भाजपला सोडचिठ्ठी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेशाची केली घोषणा

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. इंदापूरचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांनी अखेर भाजपला रामराम ठोकला आहे. इंदापूरमध्ये आयोजित एका पत्रकार परिषदेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करत असल्याची घोषणा केली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Yogesh Sangale
  • Fri, 4 Oct 2024
  • 04:44 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. इंदापूरचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांनी अखेर भाजपला रामराम ठोकला आहे. इंदापूरमध्ये आयोजित एका पत्रकार परिषदेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करत असल्याची घोषणा केली. 

शुक्रवारी सकाळी  पाटील यांनी इंदापूरमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यामध्ये त्यांनी आपण शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचे संकेत दिले. मेळाव्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपला  सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करत असल्याची घोषणा केली. 

यावेळी बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले, मागील दोन महिन्यांपासून मी तालुक्यात फिरत आहे. सर्वच कार्यकर्त्यांनी मी विधानसभा निवडणूक लढवावी असा आग्रह धरला. मी शरद पवार यांची काल सिल्व्हर ओक येथे भेट घेतली. या बैठकीत पवारांशी सखोल चर्चा झाली. शरद पवार यांनी देखील मी निवडणूक लढवावी असा आग्रह धरला. असाच आग्रह खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील धरला. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी देखील चर्चा झाली. कार्यकर्त्यांसोबत विचारविनिमय करून आपण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाण्याचा निर्णय घेतल्याचं पाटील यांनी सांगितलं. 

काही दिवसांपूर्वी आपण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी इंदापूरची जागा महायुतीतील मित्र पक्षाच्या विद्यमान आमदाराला सुटणार असल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. फडणवीस यांनी आपल्यासाठी वेगळा पर्याय देण्याचे संकेत दिले होते. परंतु मला आणि माझ्या कार्यकर्त्यांना फडणवीस यांचा पर्याय मान्य नव्हता. त्यामुळे मी त्यांना तिथेच निवडणूक लढवणार असल्याचा निर्णय कळवून टाकल्याची माहिती पाटील यांनी दिली. 

आपल्या पक्ष प्रवेशाला इंदापूरमधील शरद पवार गटातीलच काही पदाधिकारी विरोध करत आहेत त्याबाबत बोलताना पाटील म्हणाले, पक्षप्रवेश केव्हा होईल हे शरद, सुप्रिया सुळे तसेच जयंत पाटील हेच ठरवतील. यावर काही बोलण्याचा आपला अधिकार नसल्याचं ते  म्हणाले.  तसेच  आजपर्यंत पवार घराण्याशी आपला राजकीय संघर्ष राहिला आहे मग त्याच पक्षात प्रवेश आपण करताय, या माध्यमांच्या प्रश्नावर उत्तर देताना पाटील म्हणाले, राजकारणात कोण कोणाचा शत्रू नसतो. पवार साहेबांचे आणि आमचे राजकारणापलीकडे घरगुती संबंध आहेत. त्यामुळे या गोष्टींना जास्त अर्थ उरत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हर्षवर्धन पाटील यांनी 1995 मध्ये विधानसभेची अपक्ष निवडणूक जिंकत आपली राजकीय कारकीर्द सुरू केली.  पुढे ते 1999 आणि 2004 मध्येही निवडणूक जिंकून आमदार झाले. नंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 2009 मध्ये पाटील पुन्हा आमदार म्हणून निवडून आले. पण 2014 आणि 2019 मध्ये पाटील यांना आमदार दत्ता भरणे यांच्याकडून दोन वेळा पराभव स्वीकारावा लागला. दरम्यान येत्या विधानसभेत इंदापूरमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest