File Photo
मुंबई : काही नेते हताश आणि हरलेल्या मानसिकतेने संघटना चालवत आहेत, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा करा या मागणीसाठी हातात कटोरा घेऊन दिल्लीचे उंबरे झिजवणे, ही भीक असते. सारखे ओरबाडून खाणाऱ्यांकडे देण्याची दानत नसते कारण तशी सवयच त्यांना नसते, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे
गद्दारांना ५० खोके आणि लाडक्या बहिणींना फक्त १५०० रुपये? असा सवाल करत उद्धव ठाकरे यांनी रविवारी (२९ सप्टेंबर) नागपूरमध्ये एकनाथ शिंदे आणि भाजपवर टीका केली. तसेच मिर्झाराजे जयसिंग यांनी स्वराज्याशी कशी गद्दारी केली याचाही दाखला आपल्या भाषणात दिला.
या सगळ्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. शिंदे म्हणाले की, दिल्लीला जाऊन मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करा ही मागणी करण्यासाठी हाती कटोरा घेऊन जाता ती भीक असते. वसुली प्रकरणात तुरुंगात जाऊन आलेल्या आणि शेतकऱ्यांची बँक गिळली म्हणून न्यायालयाने शिक्षा ठोठावलेल्या लोकांच्या बाजूला बसून भ्रष्टाचाराबद्दल बाता करण्यासारखा कोडगेपणा नाही. लोकांना काहीच देऊ शकणार नाहीत, असे त्यांनी कबूल करून टाकले ते बरे केले. कुणालाच काही देण्याचे यांना माहीतच नाही. यांना फक्त घेणे माहीत आहे. यांच्याकडे दानत नाहीच, असा टोला शिंदे यांनी लगावला.
ओवाळणीची संस्कृतीही ठाऊक नाही
आमच्या लाडक्या बहिणींना दिलेले पंधराशे रुपयेही तुमच्या डोळ्याला टोचतात. बहिणीला ओवाळणी देण्याची संस्कृतीही यांना मान्य नाही? त्यामुळेच आता मिळतात अगदी तेवढे पैसेही बहिणींना देणार नाही, असे हे सांगतात. त्यांची महिला वर्गाबद्दलची आस्थाही यांच्या हिंदुत्वासारखीच बेगडी आहे.
कोविड रुग्णांच्या तोंडची खिचडी खाणाऱ्या, बॉडी बॅगमधूनही कमिशन ओरपणाऱ्या लोकांनी भ्रष्टाचार हा शब्द बोलण्याची हिंमत करावी का, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा तुम्ही केली, पण पैसे आमच्या सरकारने दिले, हे ध्यानात ठेवा. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांच्यावर बोलण्याची आपली पात्रता आहे का, हे जरा काही जणांनी आरशात बघावे.
बाळासाहेबांनी राजकारण व हिंदुत्वाची गल्लत केली, असे बोलणाऱ्यांना त्यांचे नाव घेण्याचा नैतिक अधिकार तरी उरला आहे का? हिंदुत्व हा शब्द आता त्यांच्या तोंडात शोभतच नाही. निवडणुकीला घाबरणाऱ्यांनी डिपॉझिट जप्त करण्याची भाषा तर करूच नये. अन्यथा निवडणुकीच्या रिंगणात उतरावे, असे आव्हान त्यांनी दिले.