Mahadev Jankar : जानकरांनी घेतली शरद पवार यांची भेट; शेतकरी कामगार पक्षाच्या दाव्याने माढा लोकसभा मतदारसंघातील पेच वाढणार

लोकसभा निवडणुकीपूर्वी (Loksabha Election 2024) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार (Sharad Pawar) चांगलेच सक्रिय झाले आहेत. त्यांनी महाविकास आघाडीचा विस्तार करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

Mahadev Jankar

जानकरांनी घेतली शरद पवार यांची भेट; शेतकरी कामगार पक्षाच्या दाव्याने माढा लोकसभा मतदारसंघातील पेच वाढणार

लोकसभा निवडणुकीपूर्वी (Loksabha Election 2024) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार (Sharad Pawar) चांगलेच सक्रिय झाले आहेत. त्यांनी महाविकास आघाडीचा विस्तार करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. तसेच इतर पक्षातील लोकांना आपली दारे उघडी केली आहेत. त्यामुळे अजित पवार गटातील आमदार नीलेश लंके लवकरच अधिकृतपणे शरद पवार गटात दाखल होणार आहेत. या घडामोडी सुरू असताना राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर (Mahadev Jankar)यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीत काय झाले, त्याची माहिती त्यांनी दिली आहे . त्यामुळे माढ्याच्या जागेवरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे .

शरद पवार माढा देणार

माढा लोकसभा मतदारसंघासंदर्भात शरद पवार आणि महादेव जानकर यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. महाविकास आघाडीत माढा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वाट्याला आला आहे. यामुळे हा मतदारसंघ जानकर यांना देण्याच्या तयारीत शरद पवार असल्याची चर्चा सुरू आहे. शुक्रवारी संध्याकाळी होणाऱ्या महाविकास आघाडीच्या बैठकीत जागावाटप अंतिम होणार आहे. त्यापूर्वी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी शरद पवार यांची  भेट घेतली. शरद पवार यांच्यासोबत बैठक झाल्याचे महादेव जानकर यांनी मान्य केले. ते म्हणाले, निवडणुकीबाबतीत कोणतीही चर्चा झाली नाही. मी सदिच्छा भेट घेण्यासाठी आलो होतो. पुढील काही दिवसांत मी पुन्हा भेट घेणार आहे आणि त्यानंतर माध्यमांशी बोलणार आहे.

शेकापच्या दाव्याने तिढा

शरद पवारांनी मतांचे समीकरण ओळखून माढा लोकसभा मतदारसंघात महादेव जानकर यांना पाठिंबा द्यायचे ठरवले असले तरी त्यासाठी विरोधी पक्षांनी एकदिलाने लढणे आवश्यक आहे. परंतु, आता शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांनी माढा मतदारसंघावर दावा केला आहे. सोमवारी सांगोलामध्ये आमदार जयंत पाटील, शेकाप नेते डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्यासह कार्यकर्त्यांनी  शेतकरी मेळावा आयोजित केला होता. सांगोला तालुक्यासह माढा तालुक्यात शेकापची मोठी ताकद आहे. त्यामुळे माढासह हातकणंगले हे दोन मतदारसंघ शेकापला मिळावेत, असा जयंत पाटील यांचा आग्रह आहे. त्यामुळे महादेव जानकर यांना पुढे करून माढा जिंकण्याची योजना आखणाऱ्या शरद पवार आणि महाविकास आघाडीसमोर पेच उभा राहण्याची शक्यता आहे.

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest