मावळमध्ये महायुतीकडून अखेर श्रीरंग बारणेच !

महायुतीकडून मावळ लोकसभेच्या रिंगणात तिसऱ्यांदा श्रीरंग बारणे (Shrirang Barne) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गेल्या दशकापासून खासदार म्हणून मतदारसंघात केलेली कामे

संग्रहित छायाचित्र

शिवसेना विरुद्ध शिवसेना रंगणार सामना, बारणे म्हणतात, मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला

महायुतीकडून मावळ लोकसभेच्या रिंगणात तिसऱ्यांदा श्रीरंग बारणे (Shrirang Barne) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गेल्या दशकापासून खासदार म्हणून मतदारसंघात केलेली कामे आणि जनतेच्या पाठिंब्यावर मी तिसऱ्यांदा लोकसभेत निवडून जाईल, असा विश्वास श्रीरंग बारणे यांनी उमेदवारी जहीर झाल्यावर व्यक्त केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या आठ जागांवरील उमेदवारांची नावे जाहीर करताच बारणेसमर्थकांनी आणि कुटुंबीयांनी जल्लोष केला. महाविकास आघाडीकडून दोन दिवसांपूर्वी संजोग वाघेरे यांची शिवसेनेने (उद्ध‌व बाळासाहेब ठाकरे  गट) उमेदवारी जाहीर केली होती. त्यानंतर रखडलेल्या आणि अनेक चर्चांमुळे निवडणुकीपूर्वीच रंगतदार ठरलेल्या मावळ मतदारसंघासाठी महायुतीकडून श्रीरंग बारणे यांच्या नावाची गुरुवारी सायंकाळी उमेदवारी जाहीर करण्यात आली.

बारणे यांच्या उमेदवारीनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट विरुद्ध शिवसेना शिंदे गट अशी थेट लढत मावळमध्ये होणार आहे. त्यावर मी मागील दहा वर्षांमध्ये खासदार म्हणून मतदारसंघात केलेल्या कामाच्या जोरावर, ‘मी हॅट्ट्रिक मारणार,’ असा दावा बारणेंनी व्यक्त केला आहे.

मावळसाठी भाजपाकडून पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष शंकर जगताप हेदेखील इच्छुक होते. त्यांनी तशी तयारीही सुरू केली होती. महायुतीतीलच राष्ट्रवादी काँग्रेसमधून पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे आणि मावळचे आमदार सुनील शेळके यांनी बारणे यांच्या उमेदवारीला विरोध दर्शविला होता. उमेदवारी जाहीर होईपर्यंत नाराजी होती. आता मित्रपक्ष महायुतीचा धर्म नक्कीच पाळतील असा विश्वासही बारणे यांनी यावेळी व्यक्त केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द पाळला आहे. महायुतीच्या सर्व घटक पक्षाचे नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार या नेत्यांचा अन् मुख्यमंत्री शिंदे यांचा मी आभारी आहे. कामाच्या जोरावर आणि जनतेच्या आशीर्वादामुळे मी नक्कीच तिसऱ्यांदा विजयी होऊन लोकसभेत जाईन याचा मला विश्वास आहे. महायुतीचे सर्व घटक पक्ष युतीचा धर्म पाळतील असाही मला विश्वास आहे. - 

- श्रीरंग बारणे,महायुतीचे मावळचे उमेदवार 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest