‘भाजपला देश मनुस्मृतीनुसार चालवायचा आहे’ - काँग्रेसचे स्टार प्रचारक निरंजन टकले यांचा घणाघात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या-ज्या ठिकाणी डोकं टेकवले, ते सर्व संपवण्याचे काम केले आहे. मग ती संसद असोत, लालकृष्ण अडवाणी असोत किंवा इतर नेते असोत. मोदी धार्मिक भावनेला आवाहन देण्याचे काम करतात.

Lok Sabha Election 2024

‘भाजपला देश मनुस्मृतीनुसार चालवायचा आहे’ - काँग्रेसचे स्टार प्रचारक निरंजन टकले यांचा घणाघात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या-ज्या ठिकाणी डोकं टेकवले, ते सर्व संपवण्याचे काम केले आहे. मग ती संसद असोत, लालकृष्ण अडवाणी असोत किंवा इतर नेते असोत. मोदी धार्मिक भावनेला आवाहन देण्याचे काम करतात. काँग्रेसने या‌ देशाला संविधान दिले, त्याच संविधानानुसार देश‌ चालतो. देश मनुस्मृतीनुसार नक्कीच चालणार नाही. मात्र, भाजपला देश मनुस्मृतीनुसार चालवायचा आहे. त्यासाठी त्यांना देशातील संविधान हद्दपार करायचे आहे. संविधान बदलण्याची भाषा भाजपचेच नेते बोलत आहेत. त्यावर टीका होऊ लागल्याने मोदींनी संविधान बदलणार नाही, अशी गॅरंटी दिली आहे, मात्र त्यांचा दावा खोटा आहे, अशी घणाघाती टीका ज्येष्ठ पत्रकार, प्रदेश काँग्रेसचे स्टार प्रचारक निरंजन टकले यांनी केली.

पुणे  मतदारसंघातील महाविकास आघाडी, इंडिया आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ काँग्रेस भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत टकले बोलत होते. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष व लोकसभा निवडणूक प्रचारप्रमुख मोहन जोशी, सरचिटणीस वीरेंद्र किराड, राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी, राज अंबिके आदी उपस्थित होते. प्रारंभी राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी प्रास्ताविक केले.

टकले म्हणाले, नरेंद्र मोदी यांना देशातील लोकांप्रती आपले काय‌ दायित्व आहे, हे माहीतच नाही, त्यामुळे त्यांनी दहा वर्षात एकही पत्रकार परिषद घेतली नाही. उलट त्यांनी वृत्तवाहिन्या असोत‌ किंवा मुद्रित माध्यमे असोत, सर्वांचे स्वातंत्र्य हिरावून घेतले आहे. यामुळे भारतामध्ये‌ माध्यम स्वातंत्र्याची अवस्था बिकट झाली आहे, असे  सांगत टकलेंनी मोदींवर नाराजी व्यक्त केली.

काँग्रेसच्या‌ जाहीरनाम्यात हिंदू-मुस्लीम उल्लेख कुठेच नाही. मात्र, भाजप व मोदींकडून धादांत खोटा प्रचार केला जात आहे. देशातील ४८ लाख लोकांनी काँग्रेसचा जाहीरनामा डाऊनलोड‌ केला. राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्या प्रत्येक सभेकडे भाजपचे बारीक लक्ष आहे, ते लगेच त्यावर बोलतात. काँग्रेसचा जाहीरनामा लोकांच्या हिताचा आहे, लोक‌ तो‌ पसंत करतात म्हणून भाजपकडून जाहीरनाम्यावर टीका केली जात आहे. मंगळसूत्राचा वाद निर्माण केला जात आहे. असेही ते म्हणाले.

जाहीरनाम्यात ५३ वेळा मोदींचा फोटो

भाजपने जाहीर केलेला जाहीरनामा अत्यंत पोकळ आहे. त्यात देशातील जनतेसाठी काहीही नाही. बेकारी व बेरोजगारीचा उल्लेखही केलेला नाही. जाहीरनाम्यात ५३ वेळा मोदींचा फोटो आहे. मोदी जितके खोटे बोलतील तितका काँग्रेसचा पाठिंबा वाढेल. दुसऱ्या टप्प्यातील मतदानानंतर भाजपच्या पायाखालची वाळू आणखी घसरणार आहे.

एकनाथ शिंदे, अजित पवार फडणवीसांचे ‘अग्निवीर’- टकले

नरेंद्र मोदी यांनी अग्निवीर योजना देशात राबविली आहे. ‘अग्निवीर’ मध्ये युवकांना एक वर्षाचे प्रशिक्षण आणि तीन वर्षे सेवा असे बंधन असल्याने तो देशाच्या सुरक्षिततेशी खेळण्याचा प्रकार आहे.  त्यामुळे युवकांचे नुकसान होणार आहे. तसेच तीन वर्षांनंतर त्यांना नोकरी नसणार आहे. याचप्रमाणे मोदींनी राजकारणातसुध्दा अग्निवीर ही योजना आणली आहे. ती अग्निवीर योजना महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस‌ राबवत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार भाजपचे अग्निवीर आहेत. या दोघांना दोघे मिळून चार वर्षे मिळणार आहेत. दहा वर्षात मोदी‌ सरकारने नागरिकांची अतोनात हानी केली आहे. त्यामुळे नागरिकांच्या मनात मोदी व भाजपबद्दल प्रचंड रोष आहे. दक्षिणेतल्या राज्यात भाजपचा एकही खासदार निवडून येणार नाही. महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या ४० जागा निवडून येतील, असा विश्वासही टकले यांनी व्यक्त केला.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest