संग्रहित छायाचित्र
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठेची लढाई बारामतीत होणार असून हा मतदारसंघ राजकीय वर्तुळाच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. महाविकास आघाडीकडून बारामतीमध्ये सुप्रिया सुळे रिंगणात उतरणार आहेत, तर त्यांना शह देण्यासाठी महायुतीकडून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना रिंगणात उतरवले जाणार, हे जवळपास निश्चित आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यामुळे बारामती जिंकणे, हे शरद पवार आणि अजित पवार गटासाठी कधी नव्हे ती प्रतिष्ठेची बाब बनली आहे. त्यामुळे अजित पवार आणि शरद पवार दोघेही बारामतीत मोर्चेबांधणी करत आहेत.
यापूर्वी राजकीय वैर असलेल्या नेत्यांशी शरद पवार आणि अजित पवार दोघेही जुळवून घेताना दिसत आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना महायुतीतील मित्र पक्षांशी जुळवून घेताना बरेच प्रयत्न करावे लागत आहेत. नुकताच भाजप नेते हर्षवर्धन पाटील आणि राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांमधील वाद चव्हाट्यावर आला होता. या प्रकरणावर पडदा पडतोय न पडतोय तोवर आता हर्षवर्धन पाटील यांच्या वक्तव्यामुळे सर्वकाही आलबेल नसल्याचे समोर आले आहे.
हर्षवर्धन पाटील यांना धमकी देण्यात आल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांनी हर्षवर्धन पाटील यांचा योग्य तो सन्मान राखला जाईल, असे म्हटले होते. परंतु, यानंतरही हर्षवर्धन पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील दुरावा अजूनही कायमच असल्याचे समोर आले आहे. एकीकडे सुनेत्रा पवार बारामतीतून निवडणुकीची तयारी करत असताना दुसरीकडे मात्र जागा वाटप झाले नाही, असे वक्तव्य हर्षवर्धन पाटील यांनी केले आहे. सुनेत्रा पवार यांची बारामतीमधून अधिकृत उमेदवारी जाहीर नसली तरी त्यांनी सध्या लावलेला प्रचाराचा धडाका बऱ्याच गोष्टी स्पष्ट करणारा आहे. सुनेत्रा पवार बारामतीमधून निवडणूक लढवत असताना हर्षवर्धन पाटील यांना विश्वासात घेतले नाही का, असा प्रश्न विचारला जातोय. महायुतीचे जागावाटप झाले नाही. जेव्हा जागावाटप होईल आणि तेव्हा आपल्याला बैठकीला बोलावतील. जर बैठकीला बोलावलं नाही तर तर आपले काम सुरूच ठेवू, असे हर्षवर्धन पाटील यांनी म्हटले आहे.
गेल्या काही दिवसांपासून इंदापुरात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष सुरू आहे. त्यातही आपलं काम सुरूच आहे, असं हर्षवर्धन पाटील म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याचा अर्थ नेमका काय, याविषयी राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत. हर्षवर्धन पाटील यांना नेमकं काय म्हणायचं होतं, याचा उलगडा अद्याप झालेला नाही. त्यामुळे बारामतीमधून सुनेत्रा पवारांची उमेदवारी पक्की करताना हर्षवर्धन पाटील यांच्याशी कोणतीही चर्चा किंवा विचारविनिमय झाला किंवा नाही, हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. हर्षवर्धन पाटील यांच्या या वक्तव्यानंतर अजित पवार गटाकडून त्यांच्याशी संपर्क साधला जाणार का, हेदेखील बघावे लागेल.
हर्षवर्धन पाटील, अजित पवार एकत्र येतील?
बारामती जिंकण्यासाठी अजित पवार यांनी भेटीगाठी सुरू केल्या आहेत. यापूर्वी राजकीय वैर असलेल्या विरोधकांशीही अजितदादांनी जुळवून घेतले आहे. परंतु, भाजपचे हर्षवर्धन पाटील यांच्याशी त्यांचे सूत अजून जुळलेले नाही. काही दिवसांपूर्वीच हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकित पाटील यांनी अजित पवारांनी आपल्या वडिलांच्या पाठीत तीन वेळा खंजीर खुपसल्याची भाषा केली होती. यानंतर राष्ट्रवादीच्या एका पदाधिकाऱ्याने हर्षवर्धन पाटील यांच्याविषयी आक्षेपार्ह भाषा वापरत त्यांना मतदारसंघात फिरू न देण्याची धमकी दिली होती. त्यामुळे हर्षवर्धन यांनी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आपल्या सुरक्षेविषयी चिंता व्यक्त केली होती. हा वाद जरा कुठे विस्मृतीत जातोय, असे वाटत असतानाच आता हर्षवर्धन पाटील यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा नवी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष लोकसभा निवडणुकीवेळी हर्षवर्धन पाटील बारामतीत अजित पवारांना मनापासून साथ देतील का, हा प्रश्न अनेकांना पडला आहे.