संग्रहित छायाचित्र
माढा मतदारसंघात अभिजीत पाटील नावाचे चार, रणजीत सिंह शिंदे नावाचे दोन उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. तर करमाळ्यात तीन संजय शिंदे रिंगणात उतरले आहेत. नावात साधर्म्य असलेल्या या उमेदवारांमुळे अधिकृत उमेदवारांची डोकेदुखी वाढणार यात काही शंका नाही.
माढा विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्जाची मुदत संपल्यानंतर नवी खेळी समोर आली आहे. राष्ट्रवादीकडून अभिजीत पाटील यांना तुतारी मिळाल्यानंतर अभिजीत पाटील नावाचे चार उमेदवार माढ्याच्या निवडणूक रिंगणात उतरले आहेत. तशीच परिस्थिती आमदार शिंदे यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे यांच्या बाबतही होत आहे. रणजीत सिंह शिंदे नावाचे दोन उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. करमाळा मतदारसंघातही आमदार संजय मामा शिंदे हे अपक्ष उमेदवार आहेत. त्यांच्याविरोधात त्यांच्याच नावाचे तीन उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. एकंदरीत नावाच्या साधर्म्यामुळे ज्या पद्धतीने एकाच नावाचे अनेक उमेदवार रिंगणात असल्याने मतदारांचा संभ्रम करण्याचा हा प्रकार असतो. त्यात माढ्यात चुरस जास्त असल्याने माढ्यातील चार अभिजीत पाटलांपैकी तुतारीच्या अभिजीत पाटलांना किती फटका बसणार, हेही पाहावे लागणार आहे. तशीच परिस्थिती आमदार शिंदे यांचे पुत्र आणि अपक्ष उमेदवार रणजीत शिंदे यांच्या बाबतही होणार असून दोन रणजीत शिंदे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे आमदार शिंदे यांच्या मुलाला फटका बसणार का, हेदेखील पाहणे महत्त्वाचे असणार आहे.
लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या तुतारीला साधर्म्य असणाऱ्या पिपाणी या चिन्हामुळे शरद पवार गटाला अनेक मतदारसंघात मोठा फटका बसला होता. आता नावात साधर्म्य असणाऱ्या उमेदवारांची संख्या वाढल्याने मतदारांचा संभ्रमही वाढणार आहे. माढा मतदारसंघात शरद पवार यांच्याकडून अभिजीत पाटील यांना उमेदवारी मिळाल्यानंतर अभिजीत धनंजय पाटील यांनी बहुजन समाज पार्टीच्यावतीने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याशिवाय अभिजीत अण्णासाहेब पाटील, अभिजीत तुळशीराम पाटील असे चारजण एकाच नावाचे उमेदवार माढ्यात निवडणूक रिंगणात उतरले आहेत. आमदार बबनदादा शिंदे यांचे पुत्र रणजीत सिंह शिंदे हे अपक्ष निवडणूक लढवीत असताना येथूनच रणजीत मारुती शिंदे यांनीही अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे.
करमाळा विधानसभा मतदारसंघात आमदार संजय मामा विठ्ठलराव शिंदे हे अपक्ष निवडणूक रिंगणात असून येथूनच संजय लिंबराज शिंदे आणि संजय वामन शिंदे अशा दोघांनी उमेदवारी दाखल केली आहे. आता मतदारांना हवा असणारा नेमका उमेदवार शोधताना एकतर त्याचं नाव लक्षात ठेवावं लागणार आहे किंवा त्यांचं चिन्ह तरी डोक्यात ठेवावं लागणार आहे. निवडणुकीतल्या या खेळी अनेक वर्षांपासून चालत आल्या असल्या तरी काही वेळेला मुख्य उमेदवाराला याचा फटका बसलेला दिसला नाही. त्यामुळे शरद पवार गटाचे अभिजीत पाटील असतील किंवा अपक्ष आमदार संजय मामा शिंदे असतील, यांना आपलं नाव आणि चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचवताना मोठी काळजी घ्यावी लागणार आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.