दोन्ही उपमुख्यमंत्र्यांत शहराची विभागणी?, पालकमंत्री अजित पवार यांना भोसरीत नो एन्ट्री ?

महापालिकेच्या विविध विकासकामांची उद्घाटने, भूमिपूजन करण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहराची (Pimpri Chinchwad) दोन्ही उपमुख्यमंत्री असलेल्या नेत्यांमध्ये प्रशासनाने विभागणी करण्यात आली होती.

political news

दोन्ही उपमुख्यमंत्र्यांत शहराची विभागणी?, पालकमंत्री अजित पवार यांना भोसरीत नो एन्ट्री ?

पालिकेच्या विकासकामांचे उद्घाटन, भूमिपूजन समारंभ दोन्ही नेत्यांमध्ये विभागून

महापालिकेच्या विविध विकासकामांची उद्घाटने, भूमिपूजन करण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहराची (Pimpri Chinchwad)  दोन्ही उपमुख्यमंत्री असलेल्या नेत्यांमध्ये प्रशासनाने विभागणी करण्यात आली होती. त्यात पिंपरी आणि चिंचवड विधानसभेतील उद्घाटने, भूमिपूजन पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते तर भोसरी विधानसभेतील उद्घाटने व भूमिपूजनाचे कार्यक्रम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते करण्यात येणार होते. मात्र, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा अचानक रद्द झाल्याने भोसरीतील विविध विकासकामांची उद्घाटने व भूमिपूजनाचे कार्यक्रम प्रलंबित ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाने विविध विकासकामांची उद्घाटने व भूमिपूजनाचे कार्यक्रम वाटून देत दोन दिग्गज नेत्यांमध्ये शहराची विभागणी केलीय का, असा सवाल उपस्थित होत आहे.  (Political) 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विकासकामांचे उद्घाटन आणि भूमिपूजनाचे कार्यक्रमांत राष्ट्रवादी आणि भाजपच्या नेत्यांमध्ये श्रेय घेण्यासाठी खटाटोप सुरू झाला आहे. राज्याच्या सत्तेत एकत्र असलेल्या भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पिंपरी-चिंचवडमध्ये विकासकामांवरून शह-काटशहाचे राजकारण सुरू असल्याचे दिसून येत आहे. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुक्रवारी (९ फेब्रुवारी) पिंपरी व चिंचवड विधानसभा मतदारसंघातील केवळ ८ प्रकल्पांचे लोकार्पण, भूमिपूजन करण्यात आले. उर्वरित १२ प्रकल्पांचे लोकार्पण, भूमिपूजन भाजप आमदारांच्या आग्रहावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवारी (११ फेब्रुवारी) करण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भोसरी विधानसभेचा दौरा अचानक रद्द झाल्याने त्या कामांचे उद्घाटन व भूमिपूजन रखडले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेवर राष्ट्रवादी सलग पंधरा वर्ष सत्तेत होती, त्यामुळे शहराचे कारभारी म्हणून अजित पवार हेच हुकमी एक्का होते. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादीचा एकेकाळी बालेकिल्ला तयार झाला होता. मात्र, भष्टाचाराच्या आरोपामुळे भाजपने पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ता अजित पवार यांच्याकडून २०१७ मध्ये खेचून घेतली होती. शहरात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकांचे कट्टर विरोधक होते, पण आता अजित पवार हेच शिवसेना-भाजप सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. त्यामुळे शहर भाजपमध्ये अद्यापही नाराजी दिसून येत आहे. पवारांशी स्थानिक भाजप लोकप्रतिनिधी जुळवून घेताना दिसत नाहीत. महापालिकेत भाजपची सत्ता असताना झालेल्या कामांचे श्रेय अजित पवार घेत असल्याची भावना भाजपमधील नगरसेवक, आमदारांमध्ये आहे. त्यामुळेच सर्व प्रकल्पांचे लोकार्पण, भूमिपूजन अजित पवार यांच्या एकट्याच्या हस्ते करण्यास भाजपचा छुपा विरोध दिसून येत आहे.

महापालिका प्रशासनाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन, भूमिपूजन करण्याचे नियोजन केले होते.  परंतु, मागील तीन महिन्यांपासून पालिका प्रशासनाला तिन्ही नेत्यांची एकत्रित वेळ मिळाली नाही. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी तिन्ही नेत्यांसाठी शहरातील उद्घाटने, भूमिपूजन रखडल्याने महापालिकेच्या कारभारावर नागरिकांमधूनही नाराजी व्यक्त केली जात होती. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची एकत्र वेळ मिळत नसल्याचे लक्षात आल्यानंतर प्रशासनाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुक्रवारी सात प्रकल्प आणि ऐनवेळी भक्ती-शक्ती चौक ते मुकाई चौक या ४५ मीटर रस्त्यावरील रेल्वे लाईनवरील उड्डाणपुलांची उद्घाटने उरकून घेतली. उर्वरित १२ विकासकामांचे लोकार्पण, भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्याचे नियोजन प्रशासनाकडून केले होते.हे सर्व प्रकल्प भोसरी विधानसभा मतदारसंघातील आहेत. 

यामध्ये प्रकल्प व्यवस्थापन कक्ष, लाइट हाऊस प्रकल्प, बोपखेलमधील सेंटर, जैव वैद्यकीय घनकचरा विल्हेवाट प्रकल्प, पंपिंग स्टेशन, कुदळवाडी-जाधववाडी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, चऱ्होलीतील निवासी गाळे, चिखलीत टाऊन हॉल, हॉटेल कचऱ्यापासून जैविक वायुनिर्मिती या प्रकल्पांचे उद्घाटन, तर मोशीत गायरान जागेवर रुग्णालय उभारणे, मोशी कचरा डेपोतील कचऱ्याचे बायोमायनिंग टप्पा दोनचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते रविवारी (११ फेब्रुवारी) करण्याचे नियोजन करण्यात आले होते. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उद्घाटन व भूमिपूजन प्रकल्प यादी महापालिका प्रशासन विभागाकडून तयार करण्यात आली. सर्व प्रकल्प भोसरी विधानसभा मतदारसंघातील होते. त्यामुळे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी पिंपरी-चिंचवड शहराची विभागणी करून घेतलीय का, असा सवाल नागरिकांतून उपस्थित होऊ लागला आहे.  

पालकमंत्री अजित पवारांना भोसरीतून छुपा विरोध?

पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे नगरसेवक, स्थायी समिती सभापती असलेले भोसरी विधानसभेचे विद्यमान आमदार महेश लांडगे हे २०१४ मधील विधानसभा निवडणुकीत अपक्ष निवडून आले. त्यानंतर त्यांनी राज्यातील भाजप सरकारला पाठिंबा देत सहयोगी सदस्य बनले. त्यानंतर भाजप प्रवेश करत २०१९ मध्ये भाजपमधून भोसरी विधानसभेवर निवडून आले. राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेल्यानंतर भोसरीचे आमदार महेश लांडगे यांचा अजित पवार यांना तीव्र विरोध दिसून आला. महापालिका निवडणुकीवेळी ‘नको बारामती, नको भानामती’ असे फलक शहरात लावले होते. त्यातून पवार आणि लांडगे यांच्यातील वाढलेला राजकीय विरोध दिसून आला होता. आता थेट भोसरी मतदारसंघातील विविध विकास कामांचे उद्घाटने, भूमिपूजन देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तेच व्हावे, असा आमदार लांडगे यांचा आग्रह असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आणि महापालिका प्रशासनात सुरू आहे. शुक्रवारी पवार यांच्यासोबत उद्घाटन कार्यक्रमाला येणेही लांडगे यांनी टाळले होते. त्यामुळे पवार भाजपसोबत सत्तेत आल्यानंतरही आमदार लांडगे यांचे सूत त्यांच्याशी जुळले नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest