मुंबई : हरियाणा विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने विजयाची हॅटट्रीक करत सर्व राजकीय अंदाज, मतदानपूर्व आणि मतदानोत्तर निष्कर्ष खोटे ठरवले. काँग्रेसला अतिआत्मविश्वास नडला की उमेदवार निवडीची समीकरणे चुकीची ठरली यावर आता पक्षाच्या पातळीवर चर्चा होत राहील. मात्र, या निकालाचा कॉंग्रेसला जोरदार फटका बसला आहे. निकालामुळे आता राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा जागा वाटपात कॉंग्रेसची बाजू कमजोर पडण्याची चिन्हे आहेत. राज्यातील लोकसभा निवडणुकीतील यशामुळे आक्रमक झालेल्या काँग्रेस नेत्यांना आता सामोपचाराची भूमिका घ्यावी लागणार असल्याचे दिसते.
जर मतदानोत्तर कलानुसार कॉंग्रेसला हरियाणात सत्ता मिळाली असती तर राज्यातील जागावाटपावर त्यांचा वरचष्मा राहिला असता. आता हरियाणातील पिछेहाटीनंतर कॉंग्रेस महाविकास आघाडीत त्याच ताकदीने जागा मागू शकणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे. काँग्रेसची जागावाटपात दावा करण्याची ताकद हरियाणाच्या निकालाने कमी झाल्याचे बोलले जात आहे.
लोकसभा निवडणुकीवेळी इंडिया आघाडीला चांगल्या जागा मिळाल्याने कॉंग्रेसला ऊर्जितावस्था प्राप्त झाल्याचे म्हटले जात होते. त्यामुळे महाविकास आघाडीत कॉंग्रेसची ताकद वाढली होती. महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीवेळी विदर्भ आणि मराठवाड्यात कॉंग्रेसला जास्त जागा मिळाल्या होत्या. भाजपावर कॉंग्रेस हरियाणात सहज मात करेल अशी चर्चा होती. तसे मतदानोत्तर पाहणीचे कलही हाती आले होते. हरियाणात जेव्हा आपसोबत आघाडी करण्याचा प्रश्न आला तेव्हा कॉंग्रेसने ताठर भूमिका घेत पाचपेक्षा जास्त जागा सोडल्या नाहीत. याचे एकमेव कारण म्हणजे लोकसभेतील विजयाने कॉंग्रेसला मिळालेला आत्मविश्वास.
लोकसभा निवडणूकीत महाविकास आघाडीत झालेल्या जागावाटपात सर्वाधिक जागा शिवसेना उद्धव टाकरे गटाला मिळाल्या होत्या. ठाकरे गटाला २१ जागा मिळाल्या तरी त्यांना केवळ ९ जागा जिंकता आल्या. कॉंग्रेसने १७ जागांवर निवडणूक लढवली आणि १३ मतदारसंघात विजय मिळविला. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने दहा जागावर निवडणूक लढवली तरी त्यांनी आठ जागी विजय मिळविला. या निकालाच्या आधारे कॉंग्रेस महाराष्ट्रात जादा जागा मागत आहे. कॉंग्रेसने लोकसभेतील आपला स्ट्राईक रेट चांगला असल्याने जादा जागा हव्यात असा दावा केला आहे. राज्यातील विधानसभा निवडणुका आता कधीही जाहीर होतील.
यासाठी जागा वाटपाकरता महाविकास आघाडीत बैठकामागून बैठका होत आहेत. साधारण २४० ते २५० जागावर सहमती झाली असली तरी बाकीच्या जागांवर एकमत झालेले नाही. त्यातच आघाडीतील जागावटपाचे सूत्र निश्चित झालेले नाही. कॉंग्रेसला मोठा भाऊ बनायचे असून आपणाला सर्वाधिक जागा हव्यात अशी त्यांची मागणी आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या २८८ जागा असून कॉंग्रेसने साधारण १०० ते ११५ जागांवर दावा केला आहे. कॉंग्रेस सर्वात मोठा विरोधी पक्ष असल्याने तसेच त्यांच्याकडे ४४ आमदार असल्याने त्यांना आता जादा जागा हव्या आहेत. २०१९ नंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षांत फूट पडली आहे. त्यामुळे कॉंग्रेस जादा जागांसाठी अडून बसली आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यास राजी नाहीत. ठाकरे हे आघाडीत मोठे भाऊ असल्याने त्यांना सर्वांत जास्त म्हणजे १०० जागा मिळाव्यात अशी त्यांची मागणी आहे.
काँग्रेसला हरियाणा निवडणुकीत विजयाची आशा होती. त्यामुळे जागावाटपात आपण नेमक्या किती जागा मागायाच्या याचा त्यांचा निर्णय होत नव्हता. आता हरियाणात पराभव झाल्याने कॉंग्रेसची जागावाटपात अडचण झाली आहे. शरद पवार गट आणि शिवसेनाही कॉंग्रेसला जादा जागा देण्यासाठी आता विरोध करु शकतात. त्यामुळे कॉंग्रेस आता जागावाटपात नेमकी काय भूमिका घेते याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. आपल्या मागणीवर ठाम राहणे बदलल्या परिस्थितीत काँग्रेसला अवघड झाले असून त्यांनी लवचिक भूमिका घेण्याची गरज आहे. त्यामुळे आता जागांवाटपात कोणाच्या वाट्याला किती जागा येतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. महाविकास आघाडीचे जागावाटप लवकरच जाहीर होणार असून त्यात या कोड्याचे उत्तर मिळणार आहे. वृत्तसंंस्था
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.