सुप्रिया सुळेंनी बोपदेव घाटात केली घटनास्थळाची पाहणी, रुपाली चाकणकरांचा सुळेंना टोला, म्हणाल्या...
बोपदेव घाटामध्ये तरुणीवर सामूहिक अत्याचाराची घटना घडली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी (दि. ८) बोपदेव घाटातील घटनास्थळाला भेट देत पाहणी केली होती. त्याचबरोबर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तपासाची माहिती घेतली होती. पाच दिवस उलटूनही आतापर्यंत पोलिसांना आरोपींचा शोध का लावता आलेला नाही, असा सवाल सुळे यांनी उपस्थित केला होता. तसेच तपासामधील अडचणींबाबत शरद पवार यांनी अधिकाऱ्यांकडे चौकशी देखील केली होती. या प्रकरणाची माहिती त्यांनी जाणून घेतली .
खासदार सुप्रिया सुळे यांनी बोपदेव घाटातील घटनास्थळाला भेट देत पाहणी केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या नेत्या रूपाली चाकणकर यांनी सुप्रिया सुळे यांना पुण्यात असूनही स्वत:च्या मतदार संघात घडलेल्या घटनेला भेट द्यायला बरेच दिवस लागले असं म्हणत टोला लगावला.
काय म्हणाल्या रूपाली चाकणकर?
सुप्रिया सुळे यांनी बोपदेव घाटात घडलेल्या अत्याचाराच्या घटनास्थळाला भेट देत इव्हेंट केला आणि आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केला. मुळातच पोलीस पहिल्या दिवसापासून 12 टिम तयार करून युद्धपातळीवर तपास करीत आहेत. मग आपला हा देखावा कशासाठी? चंद्रपुरमध्ये शिक्षक असलेल्या युवा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने बारा वर्षाच्या मुलीवर अत्याचार केलाय, याविरोधात सुप्रिया सुळे आंदोलन कधी करणार? तुतारी गटाच्या सोशल मिडियाच्या प्रदेश सरचिटणीसावर महिलांचे अश्लील व्हिडीओ बनविणे, पाठवणे, अश्लाघ्य कमेंट करणे यासाठी चार सायबर गुन्हे दाखल आहेत. या आरोपीला आपण नियुक्तीपत्र देता, नक्की कशाचे समर्थन करता? त्याच्याविरोधात आंदोलन कधी करणार? कालच नगरमध्ये भानुदास मुरकूटेंवर लैंगिक अत्याचार गुन्हा दाखल झाला, जे सुळे यांच्या जवळचे पदाधिकारी आहेत. यांच्याविरोधात आंदोलन, पत्रकार परिषद कधी घेणार? सुप्रिया सुळे पुण्याची बदनामी करत आहेत. हे हे पुणेकरांना आवडणार नाही. झोपी गेलेल्या माणसाला जागा करता येतं. पण झोपेचं सोंग घेणाऱ्या माणसाला नाही. त्यामुळे त्यांच्या सरकारच्या काळात घडलेल्या घटनांचा एनआरसीबीचा अहवाल त्यांना पाठवत आहे.
सुप्रिया सुळे काय म्हणाल्या होत्या?
पाच दिवस झाले तरी बोपदेव घाटातील अत्याचार प्रकरणातील आरोपी सापडत नाहीत. ही गंभीर आणि अस्वस्थ करणारी गोष्ट आहे. रात्री अपरात्री तिकडून अनेकजण जात असतात. त्यांच्या सुरक्षेचाही प्रश्न आहे. येथील पोलीस चौकीत पोलीस नसतात. असाच अनुभव अनेक पोलीस चौक्यांमध्ये येतो. खाकी वर्दीची भीती नसल्याने गुन्हे वाढत आहेत. पोलिसांना तपसाची लिंक लागत नाही. या भागात जातायेता कुठेही सीसीटीव्ही कॅमेरा नाही. या भागात आग्रहाने मी पोलीस चौकी मागितली होती. हा ब्लॅक स्पॉट आहे. राज्यात गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारी वाढत आहे. यासाठी गृहमंत्री फडणवीस जबाबदार नाहीत का? प्राप्तिकर विभाग, ईडी तसेच सीबीआयचा वापर विरोधकांच्या अटकेसाठी केला जातो. मग याच यंत्रणांचा वापर बोपदेव घाटातील बलात्कार प्रकरणातील आरोपींना शोधण्यासाठी का होत नाही?
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.