मुंबई: महाविकास आघाडीत कोणीही स्वतःला मोठा भाऊ किंवा छोटा भाऊ समजू नये, अशा शब्दात उद्धव ठाकरे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. तसेच हरियाणा विधानसभा निकालाची राज्यात पुनरावृत्ती होईल या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसा यांच्या विधानालाही राऊत यांनी जोरदार उत्तर दिले असून हे कधीच शक्य होणार नाही, असे फडणवीसांना सुनावले आहे. महाराष्ट्र आणि हरियाणातील राजकीय, सामाजिक, आर्थिक परिस्थिती वेगवेगळी असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.
फडणवीस यांच्या प्रश्नावर राऊत म्हणाले, हे कधीही शक्य नाही. हरियाणातला विजय हा काही मोठा विजय नाही. तेथील काँग्रेसचा पराभव हा दुर्दैवी आहे. यातून आम्हाला बऱ्याच गोष्टी शिकता येतील. देशातल्या निवडणुका आम्हाला एकत्रच लढाव्या लागणार आहेत. लोकसभेतील यश हे इंडिया आघाडीचं यश होते. आता महाराष्ट्रात काय असं तुम्हाला वाटत असेल तर, हरियाणाच्या निकालाचा कोणताही परिणाम महाराष्ट्रात होणार नाही.
महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी आहे. येथे काँग्रेस एकटी नाही, त्यांच्यासमवेत उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यासारखे जागरूक नेतृत्त्व आहे.. तसेच, भाजपने ठिकठिकाणी अपक्ष उमेदवार उभे केल्यामुळे हरियाणात काँग्रेसची मते विभाजित झाली. मात्र, हिंदीत, ‘जो जिता, वही सिकंदर’ अशी म्हण आहे. त्यामुळे त्यांचे अभिनंदन करतो. काँग्रेसने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे काही तक्रारी केल्या आहेत.
त्याचा विचार व्हायला हवा. हरियाणा हे ९० जागांच्या विधानसभेचं राज्य आहे. तेथे जाती-पातीचीही काही गणिते आहेत. तरीही काँग्रेसला ३६ जागा मिळाल्या. फक्त ९ जागा कमी पडल्या. यातून आम्ही निराश झालेलो नाही. यातून काँग्रेसलाही धडा घ्यावा लागेल. काँग्रेसला स्वबळावर लढायचे असेल तर त्यांनी तशी भूमिका घेतली पाहिजे.
भाजपने हरियाणाची निवडणूक अत्यंत प्रभावीपणे लढली हे मी मान्य करतो असे सांगून राऊत म्हणाले, काँग्रेस जिंकत होती. भाजपने हारलेली बाजी जिंकली. जम्मू-कश्मीर हे अत्यंत महत्त्वाचं राज्य होतं. ३७० कलम हटवल्यावर क्रांती होईल हा त्यांच्या प्रचाराचा भाग होता. राममंदीर उभारणे आणि ३७० कलम हटवून, आणि त्याचा प्रचार करूनही जम्मू-कश्मीरमध्ये मोदी आणि त्यांचा पराभव झाला.
हरियाणात इंडिया आघाडी झाली असती काही वेगळा फरक पडला असता. काँग्रेसला असं वाटलं आम्ही एकतर्फी जिंकू. जेथे काँग्रेस कमजोर असते तेथे ती प्रादेशिक पक्षांची मदत घेते. देशातील निवडणूक एकत्र लढवावी लागेल. कोणी स्वत:ला छोटा भाऊ, मोठा भाऊ समजू नये. वृत्तसंंस्था
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.