हरयाणात राहुल, जिलेबीचीच चर्चा

हरियाणा विधानसभा निवडणुकीपूर्वी जाट आणि जिलेबी हे दोन प्रचलित शब्द होते. आता निकालानंतर तिथे भाजपचे सरकार स्थापन होणार आहे. यावेळीही निवडणुकीत सपाटून मार खावा लागलेल्या काँग्रेस पक्षाला आणि राहू गांधी यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.

File Photo

विधानसभा निवडणुकीमुळे उजळले गोहाना जिलेबीचे भाग्य, मातूराम हलवाई एका रात्रीत सुपरस्टार

नवी दिल्ली : हरियाणा विधानसभा निवडणुकीपूर्वी जाट आणि जिलेबी हे दोन प्रचलित शब्द होते. आता निकालानंतर तिथे भाजपचे सरकार स्थापन होणार आहे. यावेळीही निवडणुकीत सपाटून मार खावा लागलेल्या काँग्रेस पक्षाला आणि राहू गांधी यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. सध्या राज्यात नव्या सरकारमध्ये कोण असणार यापेक्षा राहुल गांधी आणि त्यांनी कौतुक केलेल्या गोहाना जिलेबीचीच चर्चा जोरात सुरु आहे. सोशल मीडियावर सध्या राहुल आणि जिलेबी हे विषय ट्रेंडिंग आहेत.    

संपूर्ण निवडणूक प्रचारात काँग्रेसने जाट आणि जिलेबी या दोन फॅक्टरवर भर दिला होता. पण, काँग्रेसची रणनिती यशस्वी ठरली नाही. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांच्या प्रचारसभेत हरयानामधील प्रसिद्ध गोहाना जिलेबीचा उल्लेख केला होता. जिलबीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करुन त्याची निर्यात करण्यात येईल, अशी घोषणाच राहुल गांधी यांनी केली होती. त्यांच्या या वक्तव्याची भाजपने जोरदार थट्टा केली आहे.

मंगळवारी (८ ऑक्टोबर) सकाळी सुरुवातीला काँग्रेसला हरियाणामध्ये आघाडी मिळाली होती. त्यावेळी पक्ष कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या मुख्यालयात जिलेबीचे वाटप सुरु केले होते.  पण, त्यांचा आनंद क्षणभंगुर ठरला. मतमोजणीच्या पुढच्या टप्प्यात भाजपने आघाडी घेतली. त्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांनी सेलिब्रेशन सुरु केले. भाजप कार्यकर्त्यांनी जिलेबीची मोठी ऑर्डर देऊन सेलिब्रेशन करण्यास सुरुवात केली. कार्यकर्त्यांनी तोंड गोड करण्यासाठी जिलेबीची निवड करत काँग्रेस आणि राहुल गांधी यांना थेट राजकीय संदेश दिला आहे.

असे सुरु झाले जिलेबी पुराण

हरियाणा विधानसभा निवडणुकीत जिलेबीचे पुराण गोहानापासून सुरु झाले. राहुल गांधी यांनी गोहानामधील सभेत प्रसिद्ध मातूराम हलवाई यांचा उल्लेख केला. त्यांच्या जिलेबीची देशभरात विक्री झाली पाहिजे. इतकेच नाही तर त्याची परदेशातही निर्यात होणे आवश्यक आहे. 'मातूराम यांच्या जिलेबीची अन्य राज्यांमध्ये निर्यात झाली तर एके दिवशी येथील कारखान्यात २० ते ५० हजार कामगार काम करतील, असा दावाही राहुल गांधी यांनी केला. मातूराम सारख्या व्यापाऱ्यांना केंद्र सरकारच्या नोटबंदी आणि जीएसटी धोरणांचा फटका बसला असेही राहुल गांधी यांनी सांगितले होते.

हरयाणा, जाट आणि जिलेबीही कळली नाही

राहुल गांधी यांच्या वक्तव्याची भाजपकडून जोरदा खिल्ली उडवण्यात येत आहे.  जिलेबी कशी तयार होते हेच राहुल गांधी यांना माहिती नाही, असा टोला ज्येष्ठ भाजप नेते रवी शंकर प्रसाद यांनी लगावला आहे. मलाही गोहानाची जिलेबी आवडते. आता राहुल गांधी जिलेबीचा कारखाना अमेरिकेत सुरु करणार, अशी चर्चा आहे. पण, त्यांनी जिलेबी कशी तयार होते आणि त्याची विक्री कशी होते हे समजून घेणे आवश्यक आहे.

त्यांना भाषण लिहून देणाऱ्यांनी योग्य माहिती दिली असती तर बरे झाले असते. राहुल गांधी यांनी त्यांचा होमवर्क नीट केलेला नाही. निवडणूक निकालामुळे राहुल गांधींना हरियाना, जाट आणि जिलेबी कळली नसल्याचे स्पष्ट झाल्याचा टोलाही प्रसाद यांनी लगावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही लोकसभा निवडणुकीतील प्रचारादरम्यान गोहानामधील जिलेबीचा उल्लेख केला होता. विरोधकांच्या इंडिया आघाडीकडे पाच वर्षांसाठी पाच पंतप्रधान करण्याचा फॉर्म्युला आहे. ही पंतप्रधानांची खुर्ची आहे की मातूराम यांची जिलेबी हे त्यांना विचारा, असा सवाल मोदी यांनी केला होता.

असा आहे गोहाना जिलेबीचा इतिहास

हरियणा विधानसभा निवडणुकीत चर्चेत आलेली गोहाना जिलबीची सुरुवात १९५८ साली दिवगंत मातूराम यांनी केली. सध्या हा व्यवसाय त्यांचे नातू रमण गुप्ता आणि नीरज गुप्ता चालवत आहेत. ही जिलेबी शुद्ध तुपात बनवली जाते. कुरकुरीत आणि मऊ असलेल्या एका जिलेबीचे वजन २५० ग्रॅम आहे. चार जिलेबीच्या एका बॉक्सची किंमत ३२० रुपये आहे.

हा जिलेबीचा बॉक्स एक आठवड्यापेक्षा जास्त टिकतो, अशी माहिती रमण गुप्ता यांनी दिली आहे. गोहाना हे धान्याचे मोठे मार्केट आहे. शेतकरी अगदी प्रतिकूल हवामानातही शेतामध्ये भरपूर कष्ट करतात. आमची शुद्ध तुपातील मोठी जिलेबी त्यांना आवश्यक कॅलरी देते. त्याचबरोबर ती दीर्घकाळ टिकत असल्याने त्यांना ती नंतर कधीही खाता येते. सुरुवातीला हे लहान दुकान होते. पण, हळूहळू जिलेबी प्रसिद्ध झाली. त्यानंतर गोहानाजवळून जाणारे प्रमुख राजकीय नेतेही जिलेबीचा आस्वाद घेण्यासाठी इथे आवर्जून येतात, असेही त्यांनी सांगितले. वृत्तसंंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest